Wednesday 19 January 2022

मन 'रोम' रंगी रंगले

 

इटली देशांत जेव्हा आपण जातो, तेव्हाच हा एक छोटा देश नाही तर ह्या देशाला मोठा इतिहास आहे हे जाणवते. प्राचीन रोमन साम्राज्याची पायाभरणी इथूनच झाली याच्या खुणा इथे पदोपदी दिसतात. त्या काळात रोमन साम्राज्य जवळजवळ पूर्ण युरोपभर पसरले होते. ख्रिस्ती धर्माचा प्रसार इथूनच साऱ्या युरोपात झाला. म्हणूनच इतिहासाची आवड असलेल्या प्रत्येकाला ह्या देशाला भेट देणे अत्यावश्यक आहे असे वाटते.

सर्वात प्रथम रोम शहरालाच भेट दिली. अतिशय देखणे आहे हे शहर!!!

रोम शहरात जवळ जवळ दीड हजार कारंजी आहेत. एकेकाळी ह्या कारंज्यातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हायचा सगळ्यांना. त्या काळातील लोकांपर्यंत पाणी पोचवण्याचे त्यांचे हे ज्ञान वाखाणण्याजोगेच म्हणायला हवे. आजही ती सगळी कारंजी आहेतच. पण त्यांचे पाणी पिण्याजोगे नसते. ते रिसायकल केलेले असते. मात्र शहरात अनेक ठिकाणी पाण्याचे नळ आहेत आणि त्यातले पाणी तुम्ही पिण्यासाठी वापरू शकता.

रोममधील भव्य इमारत म्हणजे "कोलोझियम"!! सगळया जगाला ग्लॅडिएटर सिनेमामुळे माहिती असलेली!! हजारो माणसे येथे बसून खेळ, युद्धे बघत असत. याच ठिकाणी जिंकलेल्या युद्धाचे नाट्यमय सादरीकरण होत असे. कैदेत असलेल्या गुन्हेगारांकडून ही युद्धे खेळविली जात असत. पुरूषच नव्हे, तर बायकाही या क्रूर खेळांचा आनंद घेत असत. जमावाला खिळवून ठेवण्याची किमया या ठिकाणी साधली जात होती. आणि राज्यकर्त्यांना हेच हवे होते. युद्धे, स्पर्धा यांकडे तेव्हाही मानव आकर्षित होत होता. पण कोलोझियम मध्ये क्रौर्याची परिसीमा गाठली जात असे आणि याला कोणाचाही त्या काळात विरोध नव्हता. दोन हजार वर्षांपूर्वी बांधलेली ही इमारत आज जागतिक ठेवा आहे.

युद्ध म्हटले की हार-जीत आली. जित आणि जेते आले. आणि मग जिंकलेल्यांनी आपले वर्चस्व स्थापन करणे हे ओघाने आलेच. काही वर्षांपूर्वी इस्तम्बूलला गेले असताना तिथे 'आया सोफिया' नावाचे प्रसिद्ध चर्च पाहिले होते. चौदाशे वर्षांपूर्वी ते बांधले होते. तेव्हा इस्तम्बूल हे कॉन्स्टन्टिनोपल होते. रोमन राजा कॅान्स्टन्टाईनने ते जिंकले होते. ऑटोमन साम्राज्यात 'आया सोफिया' चे मशिदीत रुपांतर करण्यात आले. काही काळ ही वास्तू संग्रहालय - म्युझियम म्हणून प्रसिद्ध होती. आता परत एर्दोगान यांनी नुकतेच 'आया सोफिया'चे मशिदीत रुपांतर केले आहे.




तसेच रोममध्ये 'पॅन्थिऑन' नावाचे प्राचीन देऊळ आहे. इसविसन पूर्व २७ ते ३५ या दरम्यान हे देऊळ बांधले होते. प्राचीन काळी 'पॅगनिझम' या पंथाचा प्रभाव होता. निसर्गालाच देव मानणारा हा पंथ असे याचे थोडक्यात वर्णन करता येईल. या देवळात मूर्तीपूजा ही होत असे अशा इतिहासात नोंदी आहेत. आता याच 'पॅन्थिऑन'चे चर्च झाले आहे. रोम शहरामध्ये अनेक प्राचीन देवळे आहेत. ज्या देवळांवर क्रॉस उभारला गेला, ती वाचली/टिकली. बाकीची मात्र नष्ट झाली. सम्राट कॅान्स्टन्टाईनने ख्रिस्ती धर्म स्वीकारल्याने साऱ्या देशाचा हाच धर्म झाला. ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मपीठ व्हॅटिकन ही येथेच आहे. इथुनच ख्रिश्चन धर्म युरोपात पसरला असे म्हणायला हरकत नाही.

रोम शहर हे मला आपल्या दिल्लीसारखे वाटले. इतिहासाच्या खुणा जागोजाग दिसतात येथे. अर्थात दिल्लीच्या मानाने रोम हे लहान शहर आहे. रोमची लोकसंख्या २७ लाख आहे. याठिकाणी फिरताना भारत व इटली /रोम यातील अनेक संबंध सहजच आठवत होते. सोनिया आणि राहुल गांधींची आठवण येणे स्वाभाविक होते. सावरकरांची ही आठवण आली. जोसेफ मॅझिनी या इटालियन विचारवंताचा त्यांच्यावर खूपच प्रभाव होता. मॅझिनीचा प्रभाव फक्त सावरकरांवर नव्हे, तर भारत व जगातील अनेक नेत्यांवर होता. भारत शोधता शोधता अमेरिकेला पोचलेला कोलंबस इथलाच. इटलीतील जेनोआ गावाचा. आणि शेकस्पिअरच्या अनेक कथात /नाटकात इटली आहेच. 'दी मर्चंट ऑफ व्हेनिस' मधील 'शायलॉक' आठवतोय ना? 'ऑथेल्लो' नाटकातही पार्श्वभूमी व्हेनिसचीच आहे. रोमिओ -ज्यूलियेट आठवतायत का? हे नाटकही एका रोमन कथेवर आधारित आहे. ही प्रेमकथा घडते 'वेरोना' या इटलीतील गावी.

इतिहासकार व व्यापारी मार्कोपोलो, गॅलिलीओ, मायकेल अँजेलो या विचारवंत, कलाकारांनी इटलीच नव्हे तर जगालाही समृद्ध केले आहे. नुसतेच इतिहासात नाही तर आपल्या भाषेतही अनेक वाक्प्रचार या देशाशी/शहराशी निगडीत आहेत. उदाहरण द्यायचे तर, 'Rome was not built in a day' किंवा " When in Rome, do as Roman's do.", किंवा 'All roads lead to Rome" ह्या सगळया म्हणी त्या काळातील रोमचे, इटलीचे महत्वच सांगतात. रोम जळत असताना फिडल वाजवणारा नीरो इथलाच. नीरो हा जवळजवळ दोन हजार वर्षांपूर्वी होऊन गेला. पण एका उन्मत्त राजसत्तेचे प्रतीक म्हणून आजही तो आठवला जातो.

एकेकाळी रोम हे फक्त इटलीचेच नव्हे तर युरोपचेही सत्ताकेंद्र होते. फक्त रोम नव्हे, तर व्हेनिस ही व्यापारात अत्यंत महत्वाचे केंद्र होते. आशिया खंडाला जवळचे असल्याने युरोपचा सारा व्यापार व्हेनिस मार्गे चालायचा. एकेकाळी राजसत्तेएवढीच धर्मसत्ताही इथे प्रभावी होती. येथील वैभवशाली चर्चेस पाहून हे लक्षात येते. पण इथली चर्चेस, आपल्या देशांत दिसणाऱ्या चर्चेसपेक्षा वेगळी दिसतात. इथल्या चर्चला गोल घुमट आहे. आणि प्रत्येक चर्च शेजारी एक मनोराही आहे. पिसाचा मनोरा हा असाच चर्चच्या प्रांगणात आहे. मशिद आणि मीनारासारखेच इथे चर्च व त्याचा मनोरा दिसतात. इस्लाम व ख्रिश्चन या दोन्ही धर्मांचा उगम जवळ जवळ एकाच स्थानी झाला आहे. या दोन्ही धर्मांनी आपल्या अस्तित्वासाठी आणि प्रसारासाठी एकमेकांशी असंख्य धर्मयुद्धे केली. त्यामुळे या दोन्ही धर्मांच्या प्रार्थनास्थलांमधील साम्याने मात्र आश्चर्य वाटते.

सुब्रमण्यम स्वामींचीही यासंदर्भात आठवण होते. आपापल्या धर्मविस्तारासाठी इस्लाम व ख्रिस्ती धर्मानी आधीच्या धर्मांचे, पंथांचे अस्तित्वच कसे पुसून टाकले हे पटते. शांती आणि दयेचा वारसा सांगणारे हेच ते धर्म का असा प्रश्न आपल्याला पडतो.

इटली देश हा कलेच्या क्षेत्रातही अग्रेसर होता. युरोपातील पुनर्निर्मिती व प्रबोधन काळाची वाटचाल या देशातून झाली. लिओनार्दो-दा-व्हिन्सी, मायकेल अँजेलो, राफेल आणि असे अनेक कलावंत इथलेच. रोमन साम्राज्याची चढती कमान असल्याने सर्व कला या काळात बहरून आल्या इथे. रोम असो, व्हेनिस असो, फ्लॉरेन्स असो किंवा एखाद्या सिएना सारख्या छोट्या गावातले चर्च असो, सर्वकडे अप्रतिम कलेचे दर्शन घडते. फ्लॉरेन्स या शहरात तर इतकी म्युझियम्स आहेत, की ती सगळी नुसती पहायची ठरवली तरी तिथे महिनाभर मुक्काम ठोकावा लागेल.

एक वेगळा अनुभव या देशांत आल्यावर आपल्याला नक्की मिळतो.

- स्नेहा केतकर.


No comments:

Post a Comment

Share your views also ---