Sunday 10 August 2014

सरहद्द अशीही !!!!

कोणत्याही देशाची सीमा बघणे हा एक रोमांचक अनुभव असतो. मी पाहिलेली पहिली ‘सरहद्द’ म्हणजे अमेरिका आणि कॅनडा! “या विंडसर नदीच्या पलीकडे कॅनडा.” असे मला सांगितले, तेव्हा मी अगदी आश्चर्यचकित झाले. म्हणजे तसे फारसे काहीच बदलत नाही भौगोलिक परिस्थितीत! पण तरीही बाकी परिमाणे बदलतातच.
आपल्या मनात ‘बॅार्ड़र’ ‘सीमा’, ‘सरहद्द’ असे म्हटले की, वेगळ्याच भावना येतात आणि डोळ्यांसमोर येते ती भारत-पाकिस्तान सीमारेषा! ६७ वर्षांनंतर देखील ही सीमारेषा धगधगत आहे. तिसऱ्याच देशाच्या माणसाने नकाशावर रेघ काढून केलेले हे विभाजन अजूनही वेदना देते आहे.
बहारिन आणि सौदी अरेबिया या देशांची सरहद्द पाहीली. बहारिन हा नकाशातला चिमुकला ठिपका! सौदी अरेबियाच्या आधी इथे तेल सापडले. पण सौदीच्या राजांनी बहारिनच्या राजाशी करार करून त्यांना मोठ्या प्रमाणावर तेल न काढण्यास सांगितले. त्याची आर्थिक भरपाई अर्थातच सौदी राजे करतात. बहारिन व सौदी दरम्यान समुद्र आहे. तिथे मोठा पूल बांधून आता गाडीने सौदी अरेबियात वा तिथून बहारिन मध्ये जाणे-येणे करता येते. एकूण हा देखील अमेरिका-कॅनडा सारखाच मैत्रीचा मामला आहे.
भारतालाही अनेक देशांच्या सीमा लागून आहेत. अरुणाचल येथे चीनची सीमा लागून आहे तर प. बंगालशी बांगलादेशची सीमा लागून आहे. म्यानमारची सीमा ही भारताला लागून आहे. पण या देशांतील राजकीय स्थिती लक्षात घेता, सहजासहजी जाणे-येणे आतापर्यंत तरी शक्य नव्हते. भारत-नेपाळ सीमेवर जाणे-येणे होत असते. पण ही सीमा पाहण्याचा योग मला अजून आलेला नाही. लडाखला गेलो असताना ‘पॅन गाँन्ग लेक’ चा पुढचा भाग चीनमध्ये येतो हे माहिती होते. पण त्या दिशेने आम्ही नजर फिरविली इतकेच! चीन चा भूभाग दिसणे शक्यच नव्हते.
सिंगापूरला राहत असताना आगगाडीने मलेशियाला जाण्याचा योग आला. पण सिंगापूर इतके लहान आहे की, आम्ही मलेशियात कधी प्रवेश केला ते कळलेच नाही. आसपास हिरवीगार शेती दिसायला लागली आणि सीमा ओलांडल्याची जाणीव झाली.
स्वित्झर्लंड येथे झरमॅट या गावी गेलो असताना, “या डोंगराच्या पलीकडे इटलीची सरहद्द आहे” असे आमच्या बरोबरच्या स्विस जोडप्याने आम्हांला सांगितले. आणि गमतीत पुढे म्हणाले, “ह्या बाजूला अगदी शिस्तशीर वातावरण असते. पण स्कीईंग करत इटलीत गेल्यावर तिथे भारतासारखा गडबड-गोंधळ असतो. लोक गाणी गात असतात, नाचत असतात. आम्हालाही छान वाटते. तिथे थोडा वेळ काढून मग आम्ही परत इथे येतो.” यूरोपातल्या या जवळ जवळ असलेल्या सरहद्दीचे प्रथम आश्चर्य वाटते, आणि मग लक्षात आले की, जेव्हा आपण बंगलोरहून दिल्लीला जातो तेव्हा युरोपच्या हिशेबाने ४-५ देश ओलांडूनच जातो की!!
यावेळी मात्र आम्हाला अचानक एक सरहद्द मैलोगणती पाहायला मिळाली. आम्ही इराण मधील तब्रिझ या गावी गेलो होतो. इराणच्या उत्तरेला हे शहर येते. हजार वर्षांपूर्वीच्या “सिल्क रूट” वरचे हे महत्वाचे ठिकाण! तब्रिझहून दोन तासांच्या अंतरावर जोल्फा हे गाव आहे. या गावातून अरास नदी वाहते. या अरास नदीच्या पलीकडे अझरबैजान आहे. म्हणजे ही पूर्वीच्या रशियाची हद्द! मी अवाक् होऊन पाहतच राहिले. दोन्ही बाजूला बोडके डोंगर आणि मधून वाहणारी ही अरास नदी! दिवसभर आम्ही एक प्राचीन चर्च, एक धबधबा आणि खोराश पास येथला हमाम पाहण्यासाठी गाडीतून भटकत होतो. अरास नदीच्या काठानेच रस्ता जात होता. पलीकडे सतत अझरबैजानचे डोंगर दिसत होते. जोल्फाहून अझरबैजानला ट्रेनने जाता येते. दोन्ही देशांच्या दरम्यानचा “iron bridge” ही आम्ही पाहिला. पण “बॅार्ड़र” म्हटल्यावर जे चित्र डोळ्यांसमोर येते, सैनिक-चौक्या, तारेचे कुंपण असे काहीही इथे नव्हते. आजची ही शांत सरहद्द पाहून बरे वाटले. कारण काही काळापूर्वी ही सरहद्दही धगधगत होती. मला एकदम साहिरचे गाणे आठवले 

मालिक ने हर इन्सान को इन्सान बनाया, हमने उसे हिंदू या मुसलमान बनाया
कुदरत ने तो बख्शी थी हमें एक ही धरती, हमने कहीं भारत कहीं इरान बनाया

साहिरच्या गाण्याशी सहमत होत, खळखळ करीत चाललेली अरास नदी दोन्ही तीरांवर हिरवळ फुलवत होती. अशीच शांतता सर्व सरहद्दीवर असावी अशी आजच्या काळात अशक्य वाटणारी इच्छा करत आम्ही अझरबैजानच्या सरहद्दीचा निरोप घेतला.
मनात मात्र साहिरचेच शब्द होते.............अजूनही तो सगळ्यांना सांगतोच आहे............

नफरत जो सिखाये वो धरम तेरा नही है
    इन्साँ को जो रौंदे वो कदम तेरा नही है.......
***********************

Sunday 27 April 2014

रस्किन बाँन्ड

रस्किन बाँन्ड

रस्किन बाँन्ड या लेखकाची आणि माझी ओळख तशी ‘उशीरा’ झाली. ‘उशीरा’ म्हणजे रस्किन बाँन्ड यांच्या कथा प्रामुख्याने लहान मुलांसाठी वा लहान मुलांच्या असतात. पण त्यांची – माझी भेट माझ्या चाळीशीत झाली. अर्थात भेट व्हायला कारण माझाच लहान मुलगा होता. आमच्या पुस्तक भिशीत रस्किन बाँन्डचे पुस्तक पाहिल्यावर तो म्हणाला, “ए आई, या लेखकाची एक कथा आमच्या पुस्तकातही आहे. छान आहे.”
मुलाच्या शिफारसीने पुस्तक हातात घेतले, आणि कथांमागून कथा वाचताना मी त्यात कधी गुंगून गेले, मला कळलंच नाही. कथा इंग्रजीत होत्या पण मराठीत असाव्या त्याच पद्धतीने, तशाच आपुलकीने मनाला भिडल्या.

रस्किन बाँन्डचा जन्म भारतातलाच! जामनगर इथला! तेव्हा आपल्यावर ब्रिटीशांचे राज्य होते. रस्किनचे आजी-आजोबा, वडील, काका, सगळेच भारतात रहात होते. वडील रॉयल एअर फोर्स मध्ये होते. रस्किन लहान असतानाच त्याच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. रस्किनचे बालपण त्याच्या आजी-आजोबांजवळ देहरादून मध्ये गेले. रस्किनच्या कथांतील हिमालय वा तिथली गावे ही अशी चाळीस/पन्नासच्या दशकांतील आहेत. त्यामुळे या कथा वाचताना, आपल्याला एखादा जुना ब्लॅक आणि व्हाईट सिनेमा पाहिल्यासारखा वाटतो. जुना भारत डोळ्यांसमोर येतो.

सगळ्या गोष्टी हिमालयातल्या! तिथला निसर्ग जिवंतपणे डोळ्यांसमोर उभ्या करणाऱ्या! रस्किन बाँन्डच्या कथेतील निसर्ग हा त्यांच्या कथेत एक व्यक्तिरेखा म्हणूनही समोर येतो. रविवारी क्रिकेटची मॅच खेळताना रमलेली मुले, त्यांचे वडिल, गावातील इतर माणसे, समोर वाहणारी नदी, डोलणारी शेते, त्यातच मॅच पाहायला नदीतून काठावर आलेली मगर! आणि नंतर उडालेला गोंधळ! सगळेच लोभस आणि मजेदार वाटते. “दी चेरी ट्री” मध्ये रमत-गमत चालणारा राकेश, त्याचे आजोबा, त्यांची बाग हे सगळं वाचताना आपण त्यांच्यापैकीच एक होऊन जातो. जी.एं.ची शब्दकळा जशी प्रभावी आहे, तशीच रस्किन बाँन्डची ही आहे, पण लोभसवाण्या अर्थाने! रस्किन बाँन्डच्या कथेत रमायला आपल्याला आवडते. “Our Trees still grow in Dehra” – या कथेतून तर रस्किन बाँन्डचे सगळे आयुष्यच आपल्यासमोर अलगद उलगडते. कथेच्या शेवटी १५/२० वर्षांपूर्वी रस्किन बाँन्डने आणि त्याच्या वडिलांनी लावलेली झाडे आता बहराला आली आहेत, मोठी झाली आहेत. रस्किन त्यांना पाहतो आणि त्याला वाटतं, की त्या झाडांनी आपल्याला ओळखलं आहे. जणू ती त्याला प्रेमाने जवळ घेत आहेत. मुख्य म्हणजे हे नुसतेच लिहिणे नाही, ही भावना वाचताना ती आपल्याला आत खोलवर जाणवते!

रस्किन बाँन्डच्या कथांतून जाणवणारा वेगळा भाग म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाला तो काळ. तो काळ भारतीयांना आनंदाचा होता. पण ब्रिटीशांच्या जीवनातील प्रचंड उलथापालथीचा काळ होता तो! रस्किन बाँन्डच्या कथांत या काळाचे चित्रण आले आहे. त्यांच्या ‘’Escape from Java” या कथेतील वर्णन वाचून या काळाची कल्पना येते. दुसऱ्या महायुद्धात बेचिराख झालेला, आणि सिंगापूर, जपान, जावा येथून हरलेला इंग्लंड! या सर्व ठिकाणांहून परतणारे ब्रिटीश! “भारताला स्वातंत्र्य मिळाले की आपल्याला भारत सोडावा लागेल. कारण माझी नोकरी जाईल” असे वडिलांनी सांगितल्यावर रस्किन विचारात पडतो. कारण तोपर्यंत भारतातच वाढलेल्या रस्किनला इंग्लंडच परका देश होता.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर रस्किनच्या वडीलांचे मलेरियामुळे निधन होते. आजी आजोबांबरोबर रस्किन बाँन्डला इंग्लंडला जावे लागते. तिथे रस्किन बाँन्ड काही वर्षे राहिले पण रमले मात्र नाहीत. त्यावेळच्या आठवणी लिहिताना, रस्किन म्हणतो, की, “मी अबोल होतो, हे मला इंग्लंडला येईपर्यंत कळलेच नव्हते. कारण भारतात असताना ही गोष्ट मला कधी जाणवलीच नाही.” त्यांच्या कथांत अनेकवेळा गाडीचा प्रवास, बसचा प्रवास याची वर्णने आली आहेत. बोलले नाही तरीही संभाषणात दुसऱ्याला नकळत ओढून घेणारी अनेक भारतीय माणसे त्यांच्या मनात घर करून होती, हे जाणवते.

शिक्षण संपल्यावर मग तरुण रस्किन भारतात परत आले आणि मग ते इथेच राहिले. आज सत्तरीच्या घरात असलेले रस्किन बाँन्ड भारतीयांहूनही अधिक भारतीय आहेत. भारताच्या साहित्य जगताशी निगडीत आहेत. आज राजदरबारी आणि साहित्य जगातही त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या दोन कादंबरीवर सिनेमेही निघाले आहेत. मला तर असं वाटतं, की ते पहिले भारतीय लेखक आहेत जे इंग्रजीतून लिहितात!!!

तुम्ही वाचल्या आहेत का रस्किन बाँन्डच्या कथा? नसतील वाचल्या तर जरुर वाचा आणि परत आपल्या बालपणीचा निरागसपणा अनुभवा!!!
*******************

Thursday 20 February 2014

अज़नबी शहर के

साधारण तीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. लग्न करून मी एका वर्षाकरिता अमेरीकेला गेले. मुंबईतल्या लहानशा उपनगरातून एकदम अमेरिकेतील डेट्रॉईट शहर हा मोठाच बदल होता माझ्यासाठी! नवे शहर, नव्या पद्धती! घर मिळवणे, सजवणे आणि घरातील सगळी कामे करणे. या नव्या जीवन शैलीशी जुळवून घेतानाच एकदा एका मित्राच्या घरी एक गाणे/गज़ल ऐैकली.

अज़नबी शहर के, अज़नबी रास्ते, मेरी तनहाई पर मुस्कुराते रहे
मै बहोत देर तक यूंही चलता रहा, तुम बहोत देर तक याद आते रहे

गझल एकदम आवडून गेली. जणू माझेच विचार या गाण्यात मांडले आहेत असं वाटलं. तसे पाहिले, तर मी तिथे मजेतच होते. सगळे नवे अनुभव असोशीने घेत होते. गाडी चालवायला शिकणे, गाडी चालविणे या पासून ते नवे मित्र-मैत्रिणी जोडणे – या सगळ्याच गोष्टींची मजा मी घेत होते. पण तरीही कधी कधी एकदम एकटं वाटायचं. त्यावेळी भारतात फोन करणे, म्हणजे खूपच महाग होते. त्यात माझ्या माहेरी फोन ही नव्हता. आजच्यासारखे मेल, स्काईप असे काहीच नव्हते तेव्हा! शिवाय घरात सतत काम करावे लागायचे. दोनच माणसे! पण तेव्हा तो स्वैपाकही मला करताना मोठं कामच वाटायचं. आणि भाजी आणण्यापासून ते जेवण झाल्यावर भांडी घासण्यापर्यंत सगळं आपणच करायचं.

ज़िंदगी भी हमें आज़माती रही, और हम भी उसे आज़माते रहें

अशी स्थिती होती.

डेट्रॉईटमध्ये winter सुरु झाला आणि अधिकच नैराश्य आले. बाहेर जाणे कमी झाले. आणि गेलो, तर फक्त कामासाठीच! मुख्यतः कपडे धुण्यासाठी! आजच्यासारखे तेव्हा घराघरात washer/dryer नव्हते. कपडे धुतल्यानंतर पुन्हा घड्या घालणे, इस्त्री करणे! ही न संपणारी कामे एखाद्या अजगरासारखी मला गिळून टाकतील असे वाटायचे. आणि ही कामे मीच करायची असेही मी मनात धरून चालले होते, त्यामुळे यातून सुटका नव्हती.

तीन वाजल्यापासून बाहेर अंधार दाटून यायचा! रस्त्याभोवती असलेले बर्फाचे ढ़ीग, बोडकी झाडे! सूर्य प्रकाश आपल्याला केवढी ऊर्जा देतो ते तेव्हा मला कळले. आणि या सगळ्या उदास वातावरणात कधी कधी ‘आपला’ वाटणारा नवरा, काही वादांमुळे क्षणात ‘परका’ होऊन जायचा. डोळे भरून यायचे आणि ते पुसायलाही कोणी मायेचं जवळ नसायचं!

ज़ख्म जब भी कोई ज़हन-ओ-दिल पर लगा, ज़िंदगी की तरफ इक दरिचा खुला
हम भी गोयां किसी साज़ के तार है, चोट खाते रहे, गुनगुनाते रहे


या गाण्याने अशी सतत साथ दिली तेव्हा! गाणी, पुस्तके आणि अमेरीकेतील टी.व्ही.ने अक्षरशः तारुन नेले मला या काळात!

आमचा प्रोजेक्ट संपला आणि आम्ही भारतात परतलो. त्यानंतरही अनेक नव्या देशात, नव्या शहरात आम्ही राहिलो. घरे केली आणि सजविली, मित्र-मैत्रिणी जोडले. पण या बदलांशी जुळवून घेताना मला तेवढा त्रास झाला नाही. मात्र ही गझल मधूनच आठवत रहायची.

ही ‘गझल’ आहे, म्हणजे जगजीत सिंगचीच असणार असे गृहीत धरून, हे गाणे मी गेले कित्येक वर्षे शोधीत होते. जगजीत सिंग चा नवा अल्बम आला की त्यातील गाणी तपासून पाहत होते. पण मला हे गाणे कुठेच मिळत नव्हते. आम्हाला दोघांनाही आवडणारे हे गाणे कुठे गेले, काहीच कळत नव्हते. ज्या मित्राकडे या गाण्याची कॅसेट होती, त्याचाही पत्ता नव्हता आमच्याकडे!

पण या नव्या तंत्रज्ञानाला मनापासून धन्यवाद! ”you tube” वर शोधूया, असं म्हणून हे गाणे शोधायला गेले तर एका मिनिटांत सापडले. गाणे पुन्हा पुन्हा ऐकले. डेट्रॉईटचे सगळे दिवस आठवले. गायक आणि कवी हे ‘सलमान अल्वी’ आहेत, हे समजले. अगदी एखादी जिवलग मैत्रीण, अनेक वर्षांनी भेटावी तसे मला वाटले. माणसांप्रमाणेच अशी गाणीही कधी कधी आपली सुहृद बनतात हे जाणवले.

सलमान अल्वींचा पत्ता काही मला माहित नाही. पण त्यांच्या गाण्यात म्हटल्याप्रमाणेच –

तुम बहोत देर तक याद आते रहे

तुम बहोत देर तक याद आते रहे


**************