Saturday 1 January 2022

आवरण

 


'आवरण' ही कादंबरी २००७ मध्ये प्रकाशित झाली आणि कन्नड भाषेत या कादंबरीच्या २० हून अधिक आवृत्त्या निघाल्या आहेत. मराठी भाषेत ह्या कादंबरीचा अनुवाद २००९ मध्ये प्रकाशित झाला. मराठीतही दहा आवृत्या निघाल्या आहेत आजपर्यंत!!! असं काय आहे ह्या कादंबरीत, की जिचे वाचक दिवसागणिक वाढत आहेत? 

एखादी कपोलकल्पित अशी ही कहाणी नाही. लेखकानेच सांगितल्याप्रमाणे 'विस्मरणाने सत्य झाकोळून टाकणाऱ्या मायेला आवरण म्हणतात. विस्मरण कुणाचे? कशाचे? का झाले? या सगळया प्रश्नांची उत्तरे आवरण मध्ये मिळतात. आपल्या प्राचीन संस्कृतीचा, इतिहासाचा, जी आपली उज्ज्वल परंपरा आहे, तिचेच विस्मरण आपल्याला झाले? कसे झाले? का झाले

असत्य बिंबवणाऱ्या कार्याला विक्षेप म्हणतात असेही भैरप्पांनी म्हटले आहे. पण असे असत्य बिंबवणाचा अट्टाहास कशासाठी आणि कुणी केला?

कादंबरीची सुरवात रझिया उर्फ लक्ष्मी हिच्या निवेदनाने होते. हंपीवर एक लघुपट - documentary काढायची म्हणून ती आणि तिचा नवरा तिथे आलेले असतात. पण थातुर-मातुर लिहून लघुपटाचे निवेदन तिला लिहिता येत नाही. तिलाच हंपी येथील उद्वस्त शिल्पे, देवाच्या मूर्ती पाहून अनेक प्रश्न पडायला लागतात. तिचे प्रश्न आपल्यालाही पडायला लागतात. आणि मग कादंबरी पुढे जात रहाते. यात अनेक पात्रे येतात. विविध धर्मांची, धर्मांतर केलेली. जसा लक्ष्मीने उर्फ रझियाने धर्म बदलला आहे तसाच. मग ह्या कथानकातून आपल्याच ह्या प्राचीन संस्कृतीची आपल्याला नव्याने ओळख होत जाते.

मुसलमानांनी हिंदुंवर धर्म बदलण्याकरिता केलेले अनन्वित अत्याचार समोर येतात. या अत्याचारांवर आवरण घालणारे प्रोफेसर शास्त्रींसारखे बुद्धीवादी, पुरोगामी विचारवंत येतात. लक्ष्मीच्या वडिलांसारखे ह्या विषयावर सखोल अभ्यास करणारे, संशोधन करणारे अभ्यासकही येतात. शहरी, ग्रामीण, प्राचीन, अर्वाचीन, ऐतिहासिक असे संदर्भही येतच राहतात. डॉ.भैरप्पांनी सांगितलेल्या ह्या कहाणीत आपण गुंगून जातो. टिपू सुलतानाचे धर्मांध रूप समोर येते. कर्नाटकातील कहाणी असल्याने हा संदर्भ येणे अपरिहार्यच होते.  पण ह्या सगळया गोष्टींना अनेक ऐतिहासिक संदर्भ वाचून, तपासून पुढे आणले आहे. ह्या निवेदनाला इतिहासाचा आधार आहे.

वाराणसीचे वर्णन अंगावर काटा आणणारे आहे. औरंगजेबाने काशी-विश्वेश्वराचे मंदिर कसे उध्वस्त केले ह्या घटनेचे वर्णन आतपर्यंत हलवून टाकते आपल्याला. जणू आपल्यासमोरच घडतेय ती घटना असे वाटते. त्यावरील बुद्धीवाद्यांनी टाकलेले भ्रमाचे आवरणही काढून टाकतात भैरप्पा! आठशे वर्ष मुसलमानांनी व दोनशे वर्ष ब्रिटिशांनी येथे राज्य करूनही हिंदू धर्म संपला नाही, त्यांना तो संपवायला जमला नाही, हे वाचताना प्रसिद्ध कवी इक्बालच्याच ओळी मनात येतात.......

 

यूनान मिस्र रूमा सब मिट गए जहाँ से

अब तक मगर है बाक़ी नाम-ओ-निशाँ हमारा

कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी

सदियों रहा है दुश्मन दौर-ए-ज़माँ हमारा

 

आपण या अतिशय क्रूर शत्रूंना तोंड कसे दिले? कधी कणखरपणे, तर कधी लपून-छपून हे ही समोर येते. येथली विद्यापीठे, पाठशाला सर्व बेचिराख केल्यावरही आपला धर्म कसा राहिला? ह्याचे उत्तर समोर येते. आश्चर्य म्हणजे संत परंपरेचा अभ्यास करताना हे शिकविले नव्हते आम्हांला कधी. भारतातील संतांची परंपरा, मग महाराष्ट्रातील संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम व रामदास असोत, पंजाबातील शीख धर्मगुरू असोत, राजस्थानातील मीराबाई, उत्तरप्रदेशातील तुलसीदास, सूरदास, कबीर, रहीम असोत, ही परंपरा कशी जन्माला आली? का जन्माला आली? जनमानसात कशी रुजली अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ह्या कादंबरीत मिळतात.

 

गर्व से कहो हम हिंदु है - हे एक घोषणा वाक्य होते माझ्यासाठी. पण आज त्या मागील अर्थ, हा धर्म टिकवण्याकरिता केलेला संघर्ष सगळे सगळे समोर येते माझ्या.

 

काशीचे गागाभट्ट रायगडावर कां आले, महाराजांना छत्रपती होण्याची गळ कां घातली? ह्यातील दडलेला अर्थ समोर आला आहे. त्याचबरोबर आपल्या मराठ्यांच्या इतिहासातील अनेक सोनेरी पानेही समोर उलगडली. छत्रपती शिवाजी महाराज असोत, बाजीराव पेशवे असोत की आपल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई असोत, ह्या मराठ्यांनी आपल्या हिंदू धर्माची पताका काशीतही फडकत ठेवली हे समजते. आजही तिथे गंगेवरील अगणित घाट मराठ्यांनी बांधलेले आढळतात.

आपल्याच गौरवशाली आणि विलक्षण कष्टप्रद अवस्थेतील धर्माचे चित्रण, आणि ह्या संकटालाही पुरून उरलेला आपला प्राचीन धर्म ह्याचे यथार्थ विवेचन पुरोगामी, बुद्धीवादी का करत नाहीत असे प्रश्न पडायला लागतात मग. या कादंबरीतील पात्रेही भेटतात आपल्याला सध्याच्याही जगात.

खरे तर ही कादंबरी नाहीच आहे. यात आहे आपला  इतिहास, जो लेखकाने अनेक अभ्यास ग्रंथ वाचून, पारखून घेतला आहे. आणि एक आरसा आहे. आपल्याच समाजाचे प्रतिबिंब दाखवणारा! आणि ह्या दोन्ही गोष्टी सजग, जागरूक वाचकासाठी गरजेच्या आहेत.

 

स्नेहा केतकर

No comments:

Post a Comment

Share your views also ---