Tuesday 12 November 2013

करवा चौथ

करवा चौथ

“करवा चौथ’’ हा सण नुकताच मोठ्या आनंदात साजरा केला गेला. खरं तर, हा सण नाही. पण यश चोप्रा, करण जोहर आणि तमाम टी.व्ही. channels च्या कृपेने हा एक सण बनला आहे.परवा एका छोटयाशा city news नावाच्या पत्रिकेतही एका दाक्षिणात्य मुलीने आपण “करवा चौथ” हा कसा साग्रसंगीत साजरा केला हे सांगितले होते. हे सगळे वाचून, पाहून मनात अनेक विचार येतात.

आपल्या संस्कृतीत अनेक सण आहेत आणि अनेक रीतीभाती! जे सण म्हणून आपण साजरे करतो त्याचा संबंध आहे आपल्या शेतीप्रधान जीवनप्रणालीशी! उदा: दिवाळी. पावसाळ्यानंतर धन-धान्य घरात आल्यानंतरचा हा सण. या वेळी आपण आनंद साजरा करतो, दिवे लावतो, लक्ष्मीची म्हणजेच धान्याची पूजा करतो. यावेळी ऋतूही बदलतो. जाणाऱ्या ऋतूला प्रेमाने निरोप आणि येणाऱ्या ऋतूचे स्वागत करण्यासाठी हा सण साजरा होतो. त्याचप्रमाणे चैत्री पाडवा, संक्रांत हे ही ऋतुबदलाचे स्वागत करतात. काही सण आभार मानण्यासाठीही साजरे केले जातात. जसे पोळा हा सण खास बैलांचे आभार मानण्यासाठी शेतकरी साजरा करतो.

मात्र स्त्रियांचे सण? हळदी-कुंकू, मंगळागौर, करवा चौथ, वट पौर्णिमा, हरतालिका, श्रावणी सोमवार, शुक्रवारची सव्वाष्ण, रक्षा बंधन, भाऊबीज ................हे खरं तर सण नाहीत तर रीती-रिवाज आहेत. या सगळ्या रीतींचा कुणी गंभीरपणे विचार केला आहे का? यातील सगळे सण विवाहित महिलांचे आहेत. यातील अनेक रीती या लग्नानंतर सुरु होतात. सगळ्या रीतींचा उद्देश हा एकच! नवऱ्याची भरभराट व्हावी, त्याला आरोग्य लाभावे, त्याला उदंड आयुष्य मिळावे. हरतालिकेचा उपास करायचा तोही चांगला नवरा मिळावा म्हणून! मुलांसाठीचे उपास ही बायकांनीच करायचे. या रीतीत बायकांनी उपास करायचा, मग नवऱ्याला, भावाला ओवाळायचे. त्यांच्या पाया पडायचे अशा प्रथा आहेत.

कोणी बनवल्या या रीती? हे उपास-तापास? लग्नानंतर सुरु होणाऱ्या या रीतीतून स्त्रियांच्या मनावर हे बिम्बवण्यात येते की नवरा/भाऊ/मुलगा/वडील महत्वाचे! थोडक्यात काय तर पुरुष महत्वाचा. त्याचे आरोग्य, आयुष्य महत्वाचे! भावाला, नवऱ्याला ओवाळणे, भावाने भेट देणे – या सगळ्यात ‘देणारा’ हा पुरुष आहे आणि ‘स्वीकारणारी’ स्त्री आहे. या रीती-भातीतून पुरुष प्रधान संस्कृतीची वारंवार ‘reinforcement’ केली जाते. त्याला मग नटण्या-मुरडण्याचे गोंडस रूप दिले जाते. नव्या कोऱ्या साड्या दिल्या जातात. मात्र हे वरचे रूप आहे हे आपणच ओळखायला हवे. आजही लग्नानंतर मुलीकडून नावापासून ते आवडीनिवडीपर्यंत सगळे बदलण्याचा अट्टाहास केला जातो.

अनेक ठिकाणी स्त्री कर्तबगार असली तरीही केवळ पुरुष म्हणून नवऱ्याचा किंवा भावाचा मान केला जातो. त्याचा मान जपला जातो. आजही जगात जवळ-जवळ सगळ्या ठिकाणी कायदे बनवणारे पुरुषच आहेत. मग ती धर्मसत्ता असो वा राजसत्ता! त्यामुळे जगभरात आजही प्रत्येक कायद्यात, प्रत्येक नियमात पुरुषाला झुकतं माप आहे. बायकांनी कोणते कपडे घालावे यापासून ते तिने कोणत्या गोष्टी कराव्यात कोणत्या नाही या प्रत्येक बाबतीतले नियम पुरुषांनी बनवलेले आहेत. त्यामुळेच आज २१ व्या शतकातही गर्भपात करता न आल्यामुळे सविता हलाप्पानवर सारख्या डॉ. बाईलाही आपला जीव गमवावा लागला. थोडक्यात ही स्थिती सर्व धर्मात आहे. हिंदू असो वा ख्रिश्चन वा मुसलमान, सर्व धर्मात नियम बनविण्याचा मक्ता हा पुरुषांचाच आहे. या ठिकाणी ते स्त्रियांना घुसुही देत नाहीत.

त्यामुळेच आपण साऱ्या महिलांनी अनेक गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. “न स्त्री स्वातंत्र्य अर्हति” असे म्हणणारा मनु पुराणात होता हे खोटे आहे. आजही तो जिवंत आहे, पुरुषांच्या मानसिकतेतही आणि रुढींचे आंधळे अनुकरण करणाऱ्या, पुरुषांना श्रेष्ठ मानणाऱ्या स्त्रियांच्या मनातही!


जगातील निम्मी लोकसंख्या ही स्त्रियांची आहे. आपणच आता ठरवायचे की स्वतःच्या हक्कासाठी लढायचे की “scheduled caste” म्हणून पितृसत्ताक पद्धतीत स्वतःचेच शोषण होऊ द्यायचे.

Tuesday 22 October 2013

पु.लं. आणि थ्री इडियटस


पु.लं. आणि थ्री इडियटस

परवा पुलंचे ‘बिगरी ते matric ” ऐकत होते. हात कामात होते, पण मन मात्र पुलंच्या शब्दात रंगले होते. मला माझ्या बालपणात घेऊन जात होते. अगदी हसत हसत, विनोदाच्या माध्यमातून पुलंनी मांडलेला विचार, प्रश्न आजच्या काळाशीही किती निगडीत आहे, हे जाणवले. इतिहासासारखा मनोरंजक विषय पण शाळेमध्ये सनावळ्यात, तहाच्या कलमात कसा हरवून जायचा ते आठवले. आज उत्साहाने गुगलवर जाऊन वेगवेगळ्या ठिकाणचे नकाशे पाहणारी मी, शाळेत मात्र भूगोलाला घाबरायचे. कारण कोणत्या ठिकाणी कोणते पीक येते, कोणती खनिजे आहेत हे मला जाम लक्षात राहायचे नाही. पुलंच्या लेखातल्या शेवटच्या ओळीही मनावर आघात करून गेल्या. “आमचं बालपण करपून गेलं” हे हसत सांगणारे पुलं स्वतःची व्यथाच सांगून गेले.

या शिकलेल्या विषयांची पुढच्या आयुष्यात कशी जरुरी पडली नाही, हे ऐकताना मला एकदम ‘शिक्षणाच्या आयचा घो’ मधला लाचार बाप आठवला. “शिल्पकला शिकणाऱ्या विद्यार्थ्याला गणितात पास होण्याची सक्ती कशाला” असे तळमळीने मुख्यमंत्र्यांना विचारणारा! मुलाच्या चांगल्यासाठीच पण शिस्त लावण्याच्या नादात त्याच्या मनावर आणि शरीरावरही आघात करणारा!

मार्क, अडमिशन, नोकरी – या चक्रात अडकलेली आपण सारी! मुलांना काय आवडतं, त्यांना कशात गती आहे, हे आपल्या ध्यानातही नसते. आठवी आली की मुले आणि पालक शिकवण्या, प्रवेश परीक्षांच्या बुद्धिबळात गुरफटून जातात. या शिक्षण पद्धतीत आपण सारीच प्यादी बनलेलो आहोत. कारण आज ‘यश’ ‘सुख’ या संकल्पनाही शिक्षण, नोकरी, पगार यांच्याशीच जोडल्या गेल्या आहेत. या गदारोळात मग एखादी चांगली गाणारी मुलगी वा मुलगा, एखादा लेखनाची आवड असणारा मुलगा किंवा एखादा चित्रकलेत गती असणारा विद्यार्थी हा आपली कलाही नाकारू शकतो, कारण या कलागुणांना काहीही “किंमत” नाही हेच त्यांच्या सतत कानी कपाळी सांगितले जाते.

‘कॅनव्हास’ नावाच्या एका मराठी सिनेमात एक चित्रकार, आपल्या शिक्षक वडिलांच्या आवडत्या विद्यार्थ्यांना ठार मारतो. कारण वडिलांनी सतत त्याचा पाणउतारा केलेला असतो. आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुरस्कार मिळवूनही वडिलांना त्यांचे डॉक्टर, इंजिनियर झालेले विद्यार्थीच प्रिय असतात.
आपल्या शिक्षण पद्धतीत आपल्याला निवडीचे स्वातंत्र्य नाही. गणितात हुशार असलेल्या मुलाला, गती नसली तरी भाषेत वा इतिहासात भरपूर मार्क मिळवण्याची सक्ती आपली ही पद्धती करते. सर्व विषय आलेच पाहिजेत या विचारांमुळे नावडते विषयही मुलांना शिकावेच लागतात. याचाही मुलांवर ताण पडतोच.

तुम्ही भारतातून परदेशात शिकायला गेलेल्या मुलांचे लेख कधी वाचलेत? त्यात पहिल्याच परिच्छेदात लिहिलेले असते की, “तिथे न आपण आपले विषय निवडू शकतो”. याचाच आनंद मुलांना इतका होतो, की मग तो त्यांच्या साऱ्या शिक्षणावरच नव्हे, तर व्यक्तिमत्वावरही परिणाम करतो. स्वतः निवडलेले विषय मग अधिक आवडीने, जबाबदारीने, मन लावून अभ्यासले जातात.
चेतन भगत यांच्या ‘five point someone’ मध्ये हीच व्यथा मांडली आहे. “I.I.T.” सारख्या संस्थेतही फक्त मार्कांना महत्व आहे. येथेही नव्या विचारांना, कल्पनांना स्थान नाही.

3 idiots मधला रान्चो म्हणतो, “काबिल बनने के लिये पढो. फिर कामयाबी तुम्हारे पिछे भागेगी” . पण आजही चित्र बदललेले नाही. आयुष्याला अर्थ देणाऱ्या, समृद्ध करणाऱ्या भाषा, इतिहास, समाजशास्त्र, चित्रकला, शिल्पकला, नाट्यकला, साहित्य – या विषयांना “option” ला टाकले जाते. हे विषय घेऊनही करीयर करता येते याची अनेकांना जाणीवही नाही. किंवा असली तरी यातून पैसा मिळणार नाही हेच मनावर ठसवले जाते.
‘पुलं’ पासून ‘चेतन भगत’ पर्यंत सगळ्यांना या एकांगी शिक्षण पद्धतीची सल जाणवते. पण ती दूर कशी करायची हा प्रश्न आहे. तिथपर्यंत आपली मुले अशीच “well trained” राहणार “well educated” होणार नाहीत!

Thursday 17 October 2013

इंग्लिश विंग्लिश – लढाई फक्त इंग्लीशशी ?

इंग्लिश विंग्लिश – लढाई फक्त इंग्लीशशी ?


हल्लीच प्रदर्शित झालेला “इंग्लिश विंग्लिश” चित्रपट बराच चर्चेत होता. श्रीदेवीचा ‘come back’ सिनेमा, जिव्हाळ्याचा विषय आणि गौरी शिंदे या मराठी मुलीने दिग्दर्शित केलेला चित्रपट !
आज खरंतर या चित्रपटाविषयी लिहिण्याचा माझा हेतू नाही. अर्थात चित्रपट चांगला आहेच आणि एक दोन प्रसंगात श्रीदेवीचा उत्कृष्ट अभिनयही मनाला भिडून जातो. एका मराठी गृहिणीला इंग्रजी नीट बोलता येत नसतं. तिला त्याची जाणीव असते, पण भारतात तिचं फारसं काही अडत नाही. परदेशात गेल्यावर तिला ते अधिक जाणवते आणि ती बोलीभाषण करण्याएवढे इंग्रजी शिकते. तसा सोप्पा प्रश्न आणि तसच सोप्पे उत्तरही !
पण मला वाटत, की केवळ प्रश्न इंग्रजी पुरता मर्यादित आहे का ? म्हणजे आपल्यापैकी अनेकजण, ज्यांना इंग्रजी नीट बोलता येत नसेल, ते या सिनेमाशी नक्की नाळ जोडतील. आणि इतर कशाला, एकेकाळी मलाही ‘ इंग्रजी नीट बोलता येत नाही ’ असा न्यूनगंड होता.
तर मुळात प्रश्न या  ‘न्युनगंडाचा‘ आहे. एखादी गोष्ट असली वा आली म्हणजे आपण जिंकलो असे वाटण्याचा आहे. आजच्या काळात अनेकांना अनेक गोष्टींमुळे न्यूनगंड येताना मी पाहते. काहींना आपण जाड आहोत म्हणून, तर काहींना आपण फारच बारीक आहोत म्हणून ! काहींना रंगामुळे तर काहींना उंचीमुळे ! आपण ज्या जाहिराती पाहतो त्यादेखील आपल्याला सतत बदलण्याचा सल्ला देत असतात. ह्या क्रीममुळे गोरे व्हाल, तर या शाम्पूमुळे केस लांब होतील, मऊ होतील इ. आपण अपूर्ण आहोत हेच सतत जाणवत राहते.
सिनेमा पाहताना सारखे जाणवते ते शशीच्या नवऱ्याचे आणि मुलीचे तिला टोमणे मारणे. तिच्याजवळ असलेल्या गुणांपेक्षाही तिच्या दोषांवर बोट ठेवणे. तिच्या चुकांवर हसणे. तिच्या जवळची, मायेची माणसे ! पण तिला दुखवण्यात समाधान मानणारी ! किंबहुना आपण तिला दुखावतोय, याचीदेखील जाणीव नसणारी. तिच्या चांगल्या गोष्टींची कदर नसणारी पण तिच्या दोषांवर बोट ठेवणारी ! रात्री उशिरा आल्यावर नवऱ्याला झोपेतून उठून वाढणारी शशी ! पण तिच्या छोट्याशा आनंदातही सहभागी न होणारा तिचा नवरा !  या सर्व छोट्या गोष्टी शशीचा न्यूनगंड वाढवणाऱ्या !  कॅफेमधील ती संवेदनाशून्य बाई ! शशीला इंग्रजी येत नाही हे समजूनही तिला घाबरवून टाकते. आपल्या जवळ “काय नाही“ हेच सांगणारी ही माणसे !
आज रोजच्या जगातही आपल्याजवळ काय नाही, याची जाणीव आपल्याला अनेकजण करून देत असतात. आता असं वाटतंय, की हे एक दुष्टचक्रच आहे. लोक आपल्याला असं म्हणतात, मग आपण पण दुसऱ्यात काय उणीव  आहे, हे त्यांना सांगत राहतो. मात्र सगळेचजण या वर्तनामुळे ताण घेत असतात हे कोणाच्याही लक्षात येत नाही.
चित्रपटात आपल्या भाचीच्या खांद्यावर डोकं ठेवून मन मोकळं करताना शशी म्हणते, “मला प्रेम नकोय ग! मला थोडा respect हवाय !” आत्मसन्मान असणे हे किती महत्वाचे आहे ना ? शशीच्या स्वैपाकाचेही थोडया तुच्छतेने कौतुक करणारा सतीश ! त्याच्याकडूनही शशीला respect मिळत नाही ही गोष्ट तिला दुखवणारी आहे.
त्यामुळे “मी फक्त शशीसाठी क्लासमध्ये येतो. तिला पाहायला ! ती मला आवडते “ असे लोरेंने मोकळेपणाने सांगितल्यावर शशीही कावरीबावरी होते. कारण आपण कोणाला आवडतोय, आवडू शकतो, ही जाणीवच तिला नाहीये, किंवा ती हे विसरूनच गेली आहे.
मुलगा पडल्यावर ती जवळ नसते, तेव्हा एखाद्या गुन्हेगाराकडे पहावे तशी सतीशची तिच्यावरची नजर ! अगदी छोट्या गोष्टी पण मनावर आघात करणाऱ्या ! मग या अशा अनेक गोष्टींसाठी आपण आपल्याला दोषी मानायला लागतो. मुलांच्या आयुष्यात काही चुकीचे घडले तरी आपण स्वतःचा दोष मानतो. मनातला न्यूनगंड वाढीस लागतो.
गौरीने शशीला इंग्लीश बोलता येते हे सिनेमाच्या शेवटी दाखवले आहेच. पण इंग्लीश शिकताना, तिला मदत करणाऱ्या भाचीच्या रूपाने, आपण कसं वागावं याचाही पाठ दिला आहे. इंग्रजीच्या क्लासमधले सगळेजण तिथे मजेत तोडकं मोडकं इंग्रजी बोलत असतात. प्रत्येकाला तिथे यायची ओढ वाटते, कारण ते या एका “इंग्रजी न बोलता येणाच्या धाग्याने” बांधले गेले आहेत. इथे कोणी कुणावर हसत नाही. सगळे समान आहेत.
खरं तर, आपल्या रोजच्या जगण्यातही आपण असंच मजेत जगायला काय हरकत आहे? प्रत्येकाने स्वतःला आपल्या परीने परिपूर्ण मानलं तर हे सहज शक्य आहे. स्वतःकडे आणि दुसऱ्याकडे काय नाही यापेक्षा काय आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला तर ?
विद्याधर पुंडलिकांच्या ‘चक्र’ नावाच्या एकांकिकेत, द्रौपदी अश्वत्थाम्याच्या जखमेवर तेल घालते, आणि त्याला म्हणते, “आपण हे सूडाचे दुष्टचक्र आता थांबवूया !”
‘ इंग्लीश विंग्लिश ‘ सिनेमा पाहिल्यावर असेच काहीसे माझ्याही मनात आले.
**************

Friday 27 September 2013

मैत्र


संवादासाठी...........
अलिकडे मला वारंवार निदा फाझली यांच्या प्रसिद्ध गझल मधल्या ओळी आठवतात .

कभी किसीको मुकम्मल जहाँ नहीं मिलता
कहीं जमीं तो  कहीं आसमां नहीं मिलता

आयुष्यात पन्नाशीचा टप्पा पार केल्यानंतर, तर या ओळी खूपच उमजतात . तारुण्यात  मनाला येईल ते करून दाखवण्याची उर्मी असते . आणि तस करता येईलच , अशी खात्रीही असते . मात्र जसजसे आपण मोठे होतो,अनुभव येऊ लागतात, तसतसे लक्षात येते, की प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी घडून येत नाही . मुळात आपल्याला जे वाटत तेच बरोबर असत असही नाही . प्रत्येक गोष्टीकडे अनेक दृष्टीकोनातून  पहाता येते. यश , कर्तृत्व , आनंद , सुख याच्या हजारो व्याख्या असू शकतात , आणि त्या वैयक्तिक दृष्टीने खऱ्याही असतात .
वयाने , अनुभवाने मोठे,झाल्यावर मग आणखी एक गरज भासते , ती म्हणजे संवादाची ! आपले अनुभव , भावना दुसय्राला सांगाव्याशा वाटतात . इतरांच्या अनुभवाच्या कसोटीवर त्या खऱ्या उतरतात का हे तपासून पाहावेसे वाटते . इथे पुन्हा निदा फाझली यांच्याच ओळी समोर येतात .
जिसे भी देखिये वो अपने आपमे गुम है
जुबां मिली है मगर हमजुबां नहीं मिलता
अस  वाटले , की किती खऱ्या आहेत या ओळी , विशेषतः आजच्या जमान्यात !

मध्ये पेपरात एक फोटो आला होता. एक फोनवर बोलत होता, एक मेसेज करत होता, एक आपल्या laptop वर काम करत होता, आणि चौथा कानात earphones घालून बहुतेक गाणी ऐकत होता. आज सगळेचजण या चक्रात अडकलेले दिसतात. उत्साहाने कोणाला काही सांगायला गेले तर, हीच स्थिती आढळते. आणखी दुसऱ्याला कशाला काही म्हणायचं? आपण पण कधी कधी असेच वागतो की!
संवादाचे हे तुटलेपण कधी कधी अस्वथ करते. एखादा चांगला लेख वाचला, की कोणाला तरी सांगावसं वाटते. कोणाशीतरी बोलावेसे वाटते. एखादा सिनेमा, एखादं पुस्तक, गाण्याची एखादी ओळ, घडलेला प्रसंग मनात असंख्य विचार घेऊन येतात. हे विचार कोणाला तरी सांगावेसे वाटतात. पण .........
मग मनात विचार आला, की कधी कधी दुरावा आणणारी ही technology माणसांना जोडते देखील !
ब्लॉगच्या माध्यमातून मी माझ्या काही निवडक मित्र-मैत्रिणींशीच नव्हे तर अनेकांशी संवाद साधू शकेन. मनात येणारे विचार अधिक मोकळेपणाने मांडू शकेन.
आणि हाच विचार करून ‘ मैत्र ‘ हा ब्लॉग चालू करायचे ठरवले.
मनातले सांगण्यासाठी आणि ऐकण्यासाठीही !!!!!!!
******************