Sunday 10 August 2014

सरहद्द अशीही !!!!

कोणत्याही देशाची सीमा बघणे हा एक रोमांचक अनुभव असतो. मी पाहिलेली पहिली ‘सरहद्द’ म्हणजे अमेरिका आणि कॅनडा! “या विंडसर नदीच्या पलीकडे कॅनडा.” असे मला सांगितले, तेव्हा मी अगदी आश्चर्यचकित झाले. म्हणजे तसे फारसे काहीच बदलत नाही भौगोलिक परिस्थितीत! पण तरीही बाकी परिमाणे बदलतातच.
आपल्या मनात ‘बॅार्ड़र’ ‘सीमा’, ‘सरहद्द’ असे म्हटले की, वेगळ्याच भावना येतात आणि डोळ्यांसमोर येते ती भारत-पाकिस्तान सीमारेषा! ६७ वर्षांनंतर देखील ही सीमारेषा धगधगत आहे. तिसऱ्याच देशाच्या माणसाने नकाशावर रेघ काढून केलेले हे विभाजन अजूनही वेदना देते आहे.
बहारिन आणि सौदी अरेबिया या देशांची सरहद्द पाहीली. बहारिन हा नकाशातला चिमुकला ठिपका! सौदी अरेबियाच्या आधी इथे तेल सापडले. पण सौदीच्या राजांनी बहारिनच्या राजाशी करार करून त्यांना मोठ्या प्रमाणावर तेल न काढण्यास सांगितले. त्याची आर्थिक भरपाई अर्थातच सौदी राजे करतात. बहारिन व सौदी दरम्यान समुद्र आहे. तिथे मोठा पूल बांधून आता गाडीने सौदी अरेबियात वा तिथून बहारिन मध्ये जाणे-येणे करता येते. एकूण हा देखील अमेरिका-कॅनडा सारखाच मैत्रीचा मामला आहे.
भारतालाही अनेक देशांच्या सीमा लागून आहेत. अरुणाचल येथे चीनची सीमा लागून आहे तर प. बंगालशी बांगलादेशची सीमा लागून आहे. म्यानमारची सीमा ही भारताला लागून आहे. पण या देशांतील राजकीय स्थिती लक्षात घेता, सहजासहजी जाणे-येणे आतापर्यंत तरी शक्य नव्हते. भारत-नेपाळ सीमेवर जाणे-येणे होत असते. पण ही सीमा पाहण्याचा योग मला अजून आलेला नाही. लडाखला गेलो असताना ‘पॅन गाँन्ग लेक’ चा पुढचा भाग चीनमध्ये येतो हे माहिती होते. पण त्या दिशेने आम्ही नजर फिरविली इतकेच! चीन चा भूभाग दिसणे शक्यच नव्हते.
सिंगापूरला राहत असताना आगगाडीने मलेशियाला जाण्याचा योग आला. पण सिंगापूर इतके लहान आहे की, आम्ही मलेशियात कधी प्रवेश केला ते कळलेच नाही. आसपास हिरवीगार शेती दिसायला लागली आणि सीमा ओलांडल्याची जाणीव झाली.
स्वित्झर्लंड येथे झरमॅट या गावी गेलो असताना, “या डोंगराच्या पलीकडे इटलीची सरहद्द आहे” असे आमच्या बरोबरच्या स्विस जोडप्याने आम्हांला सांगितले. आणि गमतीत पुढे म्हणाले, “ह्या बाजूला अगदी शिस्तशीर वातावरण असते. पण स्कीईंग करत इटलीत गेल्यावर तिथे भारतासारखा गडबड-गोंधळ असतो. लोक गाणी गात असतात, नाचत असतात. आम्हालाही छान वाटते. तिथे थोडा वेळ काढून मग आम्ही परत इथे येतो.” यूरोपातल्या या जवळ जवळ असलेल्या सरहद्दीचे प्रथम आश्चर्य वाटते, आणि मग लक्षात आले की, जेव्हा आपण बंगलोरहून दिल्लीला जातो तेव्हा युरोपच्या हिशेबाने ४-५ देश ओलांडूनच जातो की!!
यावेळी मात्र आम्हाला अचानक एक सरहद्द मैलोगणती पाहायला मिळाली. आम्ही इराण मधील तब्रिझ या गावी गेलो होतो. इराणच्या उत्तरेला हे शहर येते. हजार वर्षांपूर्वीच्या “सिल्क रूट” वरचे हे महत्वाचे ठिकाण! तब्रिझहून दोन तासांच्या अंतरावर जोल्फा हे गाव आहे. या गावातून अरास नदी वाहते. या अरास नदीच्या पलीकडे अझरबैजान आहे. म्हणजे ही पूर्वीच्या रशियाची हद्द! मी अवाक् होऊन पाहतच राहिले. दोन्ही बाजूला बोडके डोंगर आणि मधून वाहणारी ही अरास नदी! दिवसभर आम्ही एक प्राचीन चर्च, एक धबधबा आणि खोराश पास येथला हमाम पाहण्यासाठी गाडीतून भटकत होतो. अरास नदीच्या काठानेच रस्ता जात होता. पलीकडे सतत अझरबैजानचे डोंगर दिसत होते. जोल्फाहून अझरबैजानला ट्रेनने जाता येते. दोन्ही देशांच्या दरम्यानचा “iron bridge” ही आम्ही पाहिला. पण “बॅार्ड़र” म्हटल्यावर जे चित्र डोळ्यांसमोर येते, सैनिक-चौक्या, तारेचे कुंपण असे काहीही इथे नव्हते. आजची ही शांत सरहद्द पाहून बरे वाटले. कारण काही काळापूर्वी ही सरहद्दही धगधगत होती. मला एकदम साहिरचे गाणे आठवले 

मालिक ने हर इन्सान को इन्सान बनाया, हमने उसे हिंदू या मुसलमान बनाया
कुदरत ने तो बख्शी थी हमें एक ही धरती, हमने कहीं भारत कहीं इरान बनाया

साहिरच्या गाण्याशी सहमत होत, खळखळ करीत चाललेली अरास नदी दोन्ही तीरांवर हिरवळ फुलवत होती. अशीच शांतता सर्व सरहद्दीवर असावी अशी आजच्या काळात अशक्य वाटणारी इच्छा करत आम्ही अझरबैजानच्या सरहद्दीचा निरोप घेतला.
मनात मात्र साहिरचेच शब्द होते.............अजूनही तो सगळ्यांना सांगतोच आहे............

नफरत जो सिखाये वो धरम तेरा नही है
    इन्साँ को जो रौंदे वो कदम तेरा नही है.......
***********************