Sunday 26 June 2016

मैं कासे कहुं ...........

मैं कासे कहुं ...........

काही काही गाणी मनात घर करून राहतात. हे गाणं असंच !!!!!
माई री, मैं कासे कहुं पीर अपने जियाकी.....................
जिवाची तगमग होतेय, काहीतरी सांगावसं वाटतंय, पण कसं सांगू? अगदी जन्मदात्या आईलाही सांगावं की नाही असा प्रश्न पडतोय!

मला लहानपणापासून हे गाणे अतिशय आवडायचं. सूर मन भारून टाकायचे आणि हुरहूरही वाटायची. गाणे ऐकताना त्यातील आर्तता जाणवायची पण शब्दांचा अर्थ लागला तरीही गाणे पूर्णत्वाने समजले असे वाटायचे नाही.

'दस्तक' या सिनेमातील हे गाणे! मजरूह सुलतानपुरी यांचे शब्द, मदन मोहन यांचे अप्रतिम संगीत आणि तेवढाच अप्रतिम लताचा आवाज! हा सिनेमा आला तेव्हा मी शाळेत होते. 'फक्त प्रौढांसाठी' असलेला हा सिनेमा मी पाहण्याचा प्रश्नच नव्हता. रेहाना सुलतान, संजीवकुमार आणि मदनमोहन यांना या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. माझा आणि या सिनेमाचा संबंध यांतील गाण्यांसाठी होता. या चित्रपटातील सर्वच गाणी लाजवाब! पण 'माई री ' हे गाणे मात्र कळूनही मला कळत नव्हतं. याच गाण्यात म्हटल्याप्रमाणे 'पाकर भी नहीं, उनको मैं पाती' असं वाटायला लावणारे!

काही महिन्यांपूर्वी अचानक 'दस्तक' हा सिनेमा दूरदर्शनवर लागला. यांतील गाण्यांसाठी हा सिनेमा पाहायला बसले. मुंबईतील एका भागात संजीवकुमार आणि रेहाना सुलतान हे नवीनच लग्न झालेले जोडपे राहायला येते. ज्या घरात ते राहायला येतात, त्या घरात पूर्वी एक गाणारी बाई राहत असते. (म्हणजे तवायफ किंवा वेश्या). आसपासच्या लोकांना रेहाना पण तशीच आहे असं वाटतं. घरावर सतत कोणीतरी थाप देतं. खिडक्यांतून अनेक डोळे रोखले आहेत असं या जोडप्याला वाटत रहाते. साहजिकच या तरुण जीवांची कुचंबणा होते.गाण्याची आवड असून गायला तिला सक्त मनाई केली जाते.

'ना तडपने की इजाजत है ना फरियाद की है, घुट के मर जाउं, ये मर्जी मेरे सैयाद की है'

असं व्याकुळ होऊन म्हणत, तंबोरा उराशी कवटाळून ती तरुणी रडते. आणि हे गाणे सुरु होते. त्या दोघांची शारीरिक आणि मानसिक कुचंबणा व्यक्त करणारे!!!!

या नवविवाहित दाम्पत्याला एका घरात राहूनही एकमेकांजवळ येता येत नाही. ' पडी नदिया के किनारे मै प्यासी ' असी दोघांची गत झाली आहे. या गाण्यात जोरजोरात वाजणाऱ्या घंटा आणि सुसाट धावत सुटलेली रेहाना हे दृश्य पडद्यावर पाहताना अंगावर काटा येतो. धावत धावत एका कड्याच्या टोकाशी ती येते. परत मागे फिरून समुद्राच्या दिशेने धावत सुटते. शरीराचा हा आवेग तिला सहन होत नाहीये! घुसमटण्याची परिसीमा झाली आहे.

रेहाना सुलतानचे पाण्याने भरलेले डोळे, कासावीस होऊन तिचे तंबोरयाला कवटाळणे, नकळत गाण्याच्या ओळी ओठांवर आल्या आल्या कोणीतरी खालून आवाज करणे आणि भयभीत होऊन तिचे थरथरणे !!
हे सर्व पाहताना या गाण्याचा अर्थ मला कळला. आईलाही सांगू शकता येणार नाही अशी ही घुसमट!
आतापर्यंत मनाला भिडणाऱ्या सुरांतून अर्थही उलगडू लागला.

'ओस नयन की उनके मेरी लगी को बुझाए ना, तन मन भिगो दे आके ऐसी घटा कोई छाए ना,
मोहे बहा ले जाए ऐसी लहर कोई आए ना ,पडी नदिया के किनारे मै प्यासी !!!'

त्याच्या डोळ्यातल्या दवबिंदुंनी माझे समाधान होत नाही, माझ्या तनमनाला कवेत घेईल अशी कोणती लाट येत नाही, सर्वस्व उधळून द्यावे असा क्षण अजूनही येत नाही, ....................

एका स्त्रीच्या अतृप्त लैगिक इच्छेचे इतके अचूक वर्णन आणि तेही कुठेही मर्यादा न सोडता व बीभत्स न वाटता केलेले मी आजपर्यंत पाहिलेले /वाचलेले नाही. एक माणूस म्हणून तिच्याकडे पाहिल्याने ते चूकही वाटत नाही. हातात तंबोरा असून वाजवायचे नाही, गळ्यात सूर असून गायचे नाही आणि प्रियकर जवळ असूनही त्याच्याजवळ जायचे नाही अशी विलक्षण केविलवाणी अवस्था या गाण्यातून व्यक्त होते.

या गाण्याचे शब्द, संगीत, स्वर, अभिनय आणि चित्रीकरण यांचा एकत्रित अनुभव म्हणजे एक विलक्षण अनुभूती आहे. काळाच्या ओघात टिकणारी ती श्रेष्ठ कला असे म्हणतात. हे गाणे म्हणजे अशीच एक कलाकृती आहे.

----------------------------------------------