Thursday 28 September 2017

काहे तुम गोकुल जाओ ?.......

रेनकोट नावाचा एक सिनेमा आला होता. सिनेमाच्या सुरवातीलाच ' मथुरा नगरपती काहे तुम गोकुल जाओ?' हे गाणे आहे. हे गाणे सुरु होताना एका पावसाळी दिवसाचे चित्रण आहे. म्हणजे ढग दाटून आले आहेत. पाऊस कधीही पडेल असे वाटतेय. आधीही चिक्कार पाऊस पडून गेलाय. त्यामुळे सूर्यप्रकाश स्वच्छ नाही. या ढगाळ, कुंद वातावरणात एक आगगाडी हळूहळू जातेय आणि मागे हे गाणे ऐकू येतेय. आपल्या प्रेयसीला, जिचे आता लग्न झाले आहे, तिला भेटायला नायक जातो आहे. त्याच्या मनातला/पावलातला जडपणा या साऱ्या निसर्गातून ही जाणवतोय.

'मथुरा नगरपती काहे तुम गोकुल जाओ?' या गाण्याचा अर्थ उलगडायला सुरवात होते. कृष्ण आपल्या मथुरेच्या राजमहालात अस्वस्थ आहे. बेचैन आहे. राहून राहून त्याला आज गोकुळाची, तिथल्या माणसांची, गोपींची आणि राधेची आठवण येतेय. मनाच्या या बेचैनीतच त्याचा रथ गोकुळाकडे वळतो. पण त्याला ज्या गोकुळाची आठवण येतेय, ते गोकुळ आता पार बदललंय. त्या गोपी, ती राधा आता अस्तित्वातच नाहीत. आता जी राधा आहे तिने मोठ्या कष्टाने मागच्या आठवणी पुसून टाकल्या आहेत. ती आता दही-दुधाचा व्यापार करणारी गौळण आहे. कृष्णप्रिया नाही. त्या गोपी, ती यमुना आता सारे काही बदलले आहे.

फार पूर्वी मी 'कृष्ण किनारा' ही अरुणा ढेरे यांची कादंबरी वाचली होती. यात राधा कृष्णाला भेटायला द्वारकेला येते असे दाखवले होते. आयुष्याच्या संध्याकाळी दोघेही भेटतात आणि मनातील व्यथा एकमेकांना सांगतात.

खरे तर कृष्ण चरित्रात असे कधीच घडले नाही. कृष्णाने आपल्या आयुष्यात कधीही मागे वळून पाहिले नाही. त्याने गोकुळ सोडले, तिथे तो परत गेला नाही. त्याने मथुरा सोडली, तिथून पळून तो मथुरेपासून खूप दूर गुजरातेत आला. तिथे त्याने द्वारका बेटावर द्वारका नगरी वसवली. आणि प्रलयात ही नगरी देखील समुद्राच्या पोटात गडप झाली. थोडक्यात, योगेश्वर कृष्ण आपले आयुष्यही एखाद्या योग्याप्रमाणेच जगले. कृष्ण कधी राजा झाला नाही. महाभारतातील युद्धातही प्रत्यक्षात कृष्णाने हातात शस्त्र घेतले नाही. कृष्ण पुढेच जात राहिला, कारण एकदा हातातून निसटलेली गोष्ट, माणूस, क्षण परत आपल्या आयुष्यात येत नाही हे तो जाणून होता.

'मौनराग' नावाच्या महेश एलकुंचवार यांच्या पुस्तकात पॉम्पेईवर एक लेख आहे. हे गाव व्हेसुव्हियस ज्वालामुखीच्या स्फोटामुळे जसे होते तसे लाव्हेखाली दबले गेले. गाडले गेले. लेखक या गावात जेव्हा जातो, तेव्हा त्याला एक विचित्र जाणीव होते. जीवनाच्या अनेक खुणा त्यात दिसत असल्या तरी त्यात जिवंतपणा जाणवत नाही. 

आपल्यालाही असं कधी कधी वाटतं नाही का? कधी काळी ज्या शहरात, गावात आपण राहिलो, तिथे कालांतराने गेल्यावर सगळे अनोळखी भासते. म्हणजे तिथे सगळे काही असले तरी त्याच्याशी आपली नाळ तुटलेली असते.
कृष्णाला हे माहिती होतं म्हणूनच त्याच्या उभ्या आयुष्यात एकदा सोडलेल्या ठिकाणी तो परत गेला नाही. 

महाभारताचे युद्ध संपल्यावर तो बहुतेक परत हस्तिनापुरला ही गेला नसावा. 'मृत्युंजय' कादंबरीत कर्णाला त्याच्या जन्माचं सत्य कृष्ण सांगतो आणि पांडवांकडे चलण्याचे आवाहन करतो. पण कर्ण म्हणतो, की " मधुसूदना, तू जसे यशोदा मातेला अंतर दिलेस, तसे मी राधामातेला अंतर देणार नाही."

खरं आहे! ज्या आईने कृष्णाला लहानाचं मोठं केलं, तिलाही सोडून कृष्ण मथुरेला गेला. सगळे म्हणतात, जीवन कसे जगावे याचे तत्वज्ञान कृष्णाने गीतेत सांगितले आहे. पण मला वाटतं, कृष्णाने स्वतःच्या जगण्यातून 'जगावे कसे' हे शिकविले. तो जिथे जेव्हा होता, ज्या व्यक्तीसोबत होता, ते नाते पूर्णत्वाने जगला. म्हणूनच कोणीही कृष्णाची आई कोण असे विचारले तर आपले उत्तर 'यशोदा' हेच असते. 'प्रेम' हा शब्द उच्चारला, की आपल्याला राधा कृष्णाचीच आठवण होते. गोपींची कान्हावरची अनन्य भक्ती विसरणे शक्य आहे का? आजही मैत्रीचे उदाहरण देताना कृष्ण-सुदामाची आठवण होते. मैत्रीचे नाते जपत आणि मित्राचा मान राखत कृष्णाने त्याला केलेली मदत आठवते. कृष्ण आणि द्रौपदीचे नातेही असेच! कोणतेही नाव न देता येणारे! तरीही सर्व नात्यांपेक्षा जवळचे.

कृष्णाने त्याच्या आयुष्यातील प्रत्येक नाते नुसते जपले नाही, तर प्रत्येक नात्यांना कृष्णाने पूर्णत्वाने निभावले. ठिकाण असो वा नाते, एकदा सोडल्यानंतर त्याकडे जरी परत वळून पाहिले नाही, तरी प्रत्येक जागेशीही कृष्णाने एक अजोड नाते जोडले. कारण जेव्हा तो तिथे होता तेव्हा तो पूर्णत्वाने तिथेच होता. यमुना, तिच्या काठचे वृन्दावन, तिथला परिसर, मथुरा नगरी आणि नंतर द्वारका नगरी!

आपले आयुष्य ही असेच असते. पण कृष्णाप्रमाणे आपण ज्या ठिकाणी असतो, तिथे पूर्णपणे असत नाही. घरात असलो तर ऑफिसची आठवण येते. माहेरी असलो, की सासरच्या गप्पा मारतो. मुलगी जवळ असेल तर मुलाची आठवण काढतो. नवरयासोबत असताना मुलांची आठवण काढून झुरतो. थोडक्यात आपण शरीराने जिथे असतो, तिथे मनाने असतोच असे नाही.

रेनकोट सिनेमात जरी कृष्ण गोकुळात जाण्याचा विचार करतोय असे गाण्यात म्हटले आहे, तरीही ती केवळ कवी कल्पना आहे. गोकुळ हे आपल्या आयुष्यातील सुंदर क्षणांचे प्रतीक आहे. आनंदाच्या गोष्टींची आपण नेहमी आठवण काढतो. पण तिथे परत जाता येत नाही आपल्याला. तसेच श्रीकृष्णाच्या आयुष्यातील गोकुळ. ह्या ठिकाणी भरभरून आयुष्य जगला तो. मात्र या गोकुळातही परत गेला नाही तो. पुढेच जात राहिला. पण मागे सोडलेल्या सर्व नात्यांना, सुहृदांना, ठिकाणांना अजरामर करून गेला. अगदी नंतरच्या आयुष्यात कधीही हाती न धरलेल्या बासुरीलाही!



स्नेहा केतकर