Tuesday 10 October 2017

अहिल्या !

कोण होती अहिल्या ? पंचकन्यापैकी एक. ब्रह्माची निर्मिती. एक अप्रतिम सौंदर्यवती. गौतम ऋषींची पत्नी. एक पतिव्रता स्त्री! पण तिच्या सौंदर्यावर इंद्रदेव भाळले आणि त्याचा दोषही तिलाच लागला. अहिल्येच्या या गोष्टीत सगळीकडे पुरूषच आहेत. ब्रह्माने तिला निर्माण केली. या आपल्या कन्येसाठी गौतम ऋषी हेच योग्य वर आहेत, असे वाटून अहिल्येचे तिच्याहून वयाने खूप मोठ्या असणारया या तपस्व्याशी ब्रह्माने लग्न लावून दिले. या ऋषींनी, आपल्या या सौन्दर्यवती पत्नीच्या सौंदर्याला एक पुरुष म्हणून, पती म्हणून न्याय दिला असेल? कल्पना नाही. या सौन्दर्यवतीवर इंद्रदेव मोहित झाले. ही सगळी गोष्ट आपल्याला माहित आहेच.

पण आज ही गोष्ट आठवण्याचे कारण? सुजॉय घोष या बंगाली दिग्दर्शकाची ' अहिल्या' नावाची एक शॉर्ट फिल्म आहे. चौदा मिनिटांची छोटीशी फिल्म ! पण खूप विचार करायला लावते. याही सिनेमात एक सुंदर स्त्री आहे. तिचा वयस्कर नवरा आहे. त्याचे नाव गौतम साधू ! आणि इंद्र सेन नावाचा एक पोलीस अधिकारीही आहे. नायिकेचे नाव अहिल्या आहे .फिल्मचे नावही अहिल्या आहे.

इंद्र सेन हा पोलीस अधिकारी एका अर्जुन नावाच्या बेपत्ता झालेल्या माणसाच्या शोधार्थ गौतम साधू या कलाकाराच्या घरी येतो. तिथे त्याला अर्जुनसारखीच दिसणारी एक छोटी बाहुली दिसते. तशा तिथे अजून पाच-सहा बाहुल्याही दिसतात. सर्व बाहुल्या या पुरुषांच्याच असतात. या सर्व कलाकृतींचे / बाहुल्यांचे श्रेय गौतम साधू आपल्या पत्नीला देतात. असं का? हे फिल्म पाहिल्यावरच समजेल सर्वांना.

ही फिल्म पाहून अनेकांच्या मनात अनेक विचार आले असणार. मला मात्र ही फिल्म पाहून अहिल्येला काव्यात्म न्याय मिळाला असे वाटले. अहिल्येचे दगडात रुपांतर होण्याचा शाप गौतम ऋषींनी तिला दिला. खरे तर, इंद्राचे मन अहिल्येकडे आकृष्ट झाले होते. तिच्या कडून नकळत चूक झाली होती. पण दगडात रुपांतर मात्र अहिल्येचे होते. ती पावन होते ती देखील रामाच्या पदस्पर्शाने! या फिल्ममध्ये मात्र  नायिकेवर आकृष्ट होऊन तिला भोगणाऱ्या सर्व पुरुषांची बाहुली बनते. आणि याला उ:शाप नाही.

अहिल्येच्या पुराणातल्या गोष्टीत 'अहिल्या' आहे, ती फक्त नावाने! एक जिवंत, हाडामांसाची स्त्री म्हणून ती कुठेच दिसत नाही. तिला दगडात रुपांतर होण्याचा शाप गौतम ऋषी देतात. पण मुळात तिच्या असण्याचा, तिच्या भावभावनांचा ते कधी विचार करतात का? रामाच्या पदस्पर्शाने ती पावन होते, म्हणजे परत जिवंत होते. पण पुढे काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पुराणातून मिळत नाहीतच.

' अहिल्या' या शॉर्ट फिल्ममध्ये मात्र बाहुली झालेले पुरुष पाहून आजच्या काही अंशी बदलत्या पुरुषी मानसिकतेचे दर्शन घडते. फिल्म एका पुरुषानेच लिहिली व दिग्दर्शित केली आहे हे विशेष!

पुराणातल्या पंचकन्यांना देवत्वाची उपाधि देऊन एका बाहुलीत त्यांचे रुपांतर केले आहे. पण आजच्या अहिल्येला तरी एक हाडामांसाची जिवंत स्त्री म्हणून जगता यावे अशी आशा करायला हरकत नसावी. अहिल्या, गौतम, इंद्र, पुरुषी मानसिकता, स्त्रीची लैंगिकता याचा पुनर्विचार या चौदा मिनिटांच्या शॉर्ट फिल्ममुळे झाला, हे ही नसे थोडके!!! 
                             
असे म्हणतात, की कलाकृती आस्वादकाच्या नजरेतून खुलते. कलाकृती ही एखाद्या लोलकासारखी असते. प्रत्येकाला त्यातून नवे काही सापडू शकते. सगळयांनी ही फिल्म पाहून जरूर तुमची मते कळवा. बघू तुम्हांला काय जाणवते.

https://www.youtube.com/watch?v=m-mjkgBgStc


स्नेहा केतकर 

Thursday 28 September 2017

काहे तुम गोकुल जाओ ?.......

रेनकोट नावाचा एक सिनेमा आला होता. सिनेमाच्या सुरवातीलाच ' मथुरा नगरपती काहे तुम गोकुल जाओ?' हे गाणे आहे. हे गाणे सुरु होताना एका पावसाळी दिवसाचे चित्रण आहे. म्हणजे ढग दाटून आले आहेत. पाऊस कधीही पडेल असे वाटतेय. आधीही चिक्कार पाऊस पडून गेलाय. त्यामुळे सूर्यप्रकाश स्वच्छ नाही. या ढगाळ, कुंद वातावरणात एक आगगाडी हळूहळू जातेय आणि मागे हे गाणे ऐकू येतेय. आपल्या प्रेयसीला, जिचे आता लग्न झाले आहे, तिला भेटायला नायक जातो आहे. त्याच्या मनातला/पावलातला जडपणा या साऱ्या निसर्गातून ही जाणवतोय.

'मथुरा नगरपती काहे तुम गोकुल जाओ?' या गाण्याचा अर्थ उलगडायला सुरवात होते. कृष्ण आपल्या मथुरेच्या राजमहालात अस्वस्थ आहे. बेचैन आहे. राहून राहून त्याला आज गोकुळाची, तिथल्या माणसांची, गोपींची आणि राधेची आठवण येतेय. मनाच्या या बेचैनीतच त्याचा रथ गोकुळाकडे वळतो. पण त्याला ज्या गोकुळाची आठवण येतेय, ते गोकुळ आता पार बदललंय. त्या गोपी, ती राधा आता अस्तित्वातच नाहीत. आता जी राधा आहे तिने मोठ्या कष्टाने मागच्या आठवणी पुसून टाकल्या आहेत. ती आता दही-दुधाचा व्यापार करणारी गौळण आहे. कृष्णप्रिया नाही. त्या गोपी, ती यमुना आता सारे काही बदलले आहे.

फार पूर्वी मी 'कृष्ण किनारा' ही अरुणा ढेरे यांची कादंबरी वाचली होती. यात राधा कृष्णाला भेटायला द्वारकेला येते असे दाखवले होते. आयुष्याच्या संध्याकाळी दोघेही भेटतात आणि मनातील व्यथा एकमेकांना सांगतात.

खरे तर कृष्ण चरित्रात असे कधीच घडले नाही. कृष्णाने आपल्या आयुष्यात कधीही मागे वळून पाहिले नाही. त्याने गोकुळ सोडले, तिथे तो परत गेला नाही. त्याने मथुरा सोडली, तिथून पळून तो मथुरेपासून खूप दूर गुजरातेत आला. तिथे त्याने द्वारका बेटावर द्वारका नगरी वसवली. आणि प्रलयात ही नगरी देखील समुद्राच्या पोटात गडप झाली. थोडक्यात, योगेश्वर कृष्ण आपले आयुष्यही एखाद्या योग्याप्रमाणेच जगले. कृष्ण कधी राजा झाला नाही. महाभारतातील युद्धातही प्रत्यक्षात कृष्णाने हातात शस्त्र घेतले नाही. कृष्ण पुढेच जात राहिला, कारण एकदा हातातून निसटलेली गोष्ट, माणूस, क्षण परत आपल्या आयुष्यात येत नाही हे तो जाणून होता.

'मौनराग' नावाच्या महेश एलकुंचवार यांच्या पुस्तकात पॉम्पेईवर एक लेख आहे. हे गाव व्हेसुव्हियस ज्वालामुखीच्या स्फोटामुळे जसे होते तसे लाव्हेखाली दबले गेले. गाडले गेले. लेखक या गावात जेव्हा जातो, तेव्हा त्याला एक विचित्र जाणीव होते. जीवनाच्या अनेक खुणा त्यात दिसत असल्या तरी त्यात जिवंतपणा जाणवत नाही. 

आपल्यालाही असं कधी कधी वाटतं नाही का? कधी काळी ज्या शहरात, गावात आपण राहिलो, तिथे कालांतराने गेल्यावर सगळे अनोळखी भासते. म्हणजे तिथे सगळे काही असले तरी त्याच्याशी आपली नाळ तुटलेली असते.
कृष्णाला हे माहिती होतं म्हणूनच त्याच्या उभ्या आयुष्यात एकदा सोडलेल्या ठिकाणी तो परत गेला नाही. 

महाभारताचे युद्ध संपल्यावर तो बहुतेक परत हस्तिनापुरला ही गेला नसावा. 'मृत्युंजय' कादंबरीत कर्णाला त्याच्या जन्माचं सत्य कृष्ण सांगतो आणि पांडवांकडे चलण्याचे आवाहन करतो. पण कर्ण म्हणतो, की " मधुसूदना, तू जसे यशोदा मातेला अंतर दिलेस, तसे मी राधामातेला अंतर देणार नाही."

खरं आहे! ज्या आईने कृष्णाला लहानाचं मोठं केलं, तिलाही सोडून कृष्ण मथुरेला गेला. सगळे म्हणतात, जीवन कसे जगावे याचे तत्वज्ञान कृष्णाने गीतेत सांगितले आहे. पण मला वाटतं, कृष्णाने स्वतःच्या जगण्यातून 'जगावे कसे' हे शिकविले. तो जिथे जेव्हा होता, ज्या व्यक्तीसोबत होता, ते नाते पूर्णत्वाने जगला. म्हणूनच कोणीही कृष्णाची आई कोण असे विचारले तर आपले उत्तर 'यशोदा' हेच असते. 'प्रेम' हा शब्द उच्चारला, की आपल्याला राधा कृष्णाचीच आठवण होते. गोपींची कान्हावरची अनन्य भक्ती विसरणे शक्य आहे का? आजही मैत्रीचे उदाहरण देताना कृष्ण-सुदामाची आठवण होते. मैत्रीचे नाते जपत आणि मित्राचा मान राखत कृष्णाने त्याला केलेली मदत आठवते. कृष्ण आणि द्रौपदीचे नातेही असेच! कोणतेही नाव न देता येणारे! तरीही सर्व नात्यांपेक्षा जवळचे.

कृष्णाने त्याच्या आयुष्यातील प्रत्येक नाते नुसते जपले नाही, तर प्रत्येक नात्यांना कृष्णाने पूर्णत्वाने निभावले. ठिकाण असो वा नाते, एकदा सोडल्यानंतर त्याकडे जरी परत वळून पाहिले नाही, तरी प्रत्येक जागेशीही कृष्णाने एक अजोड नाते जोडले. कारण जेव्हा तो तिथे होता तेव्हा तो पूर्णत्वाने तिथेच होता. यमुना, तिच्या काठचे वृन्दावन, तिथला परिसर, मथुरा नगरी आणि नंतर द्वारका नगरी!

आपले आयुष्य ही असेच असते. पण कृष्णाप्रमाणे आपण ज्या ठिकाणी असतो, तिथे पूर्णपणे असत नाही. घरात असलो तर ऑफिसची आठवण येते. माहेरी असलो, की सासरच्या गप्पा मारतो. मुलगी जवळ असेल तर मुलाची आठवण काढतो. नवरयासोबत असताना मुलांची आठवण काढून झुरतो. थोडक्यात आपण शरीराने जिथे असतो, तिथे मनाने असतोच असे नाही.

रेनकोट सिनेमात जरी कृष्ण गोकुळात जाण्याचा विचार करतोय असे गाण्यात म्हटले आहे, तरीही ती केवळ कवी कल्पना आहे. गोकुळ हे आपल्या आयुष्यातील सुंदर क्षणांचे प्रतीक आहे. आनंदाच्या गोष्टींची आपण नेहमी आठवण काढतो. पण तिथे परत जाता येत नाही आपल्याला. तसेच श्रीकृष्णाच्या आयुष्यातील गोकुळ. ह्या ठिकाणी भरभरून आयुष्य जगला तो. मात्र या गोकुळातही परत गेला नाही तो. पुढेच जात राहिला. पण मागे सोडलेल्या सर्व नात्यांना, सुहृदांना, ठिकाणांना अजरामर करून गेला. अगदी नंतरच्या आयुष्यात कधीही हाती न धरलेल्या बासुरीलाही!



स्नेहा केतकर

Thursday 10 August 2017

इस मोड से जाते हैं.......

                        इस मोड से जाते हैं,
                        कुछ सुस्त कदम रस्ते,
                        कुछ तेज कदम राहें.............

गुलझार यांनी लिहिलेले हे गाणे! १९७५मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आंधी' सिनेमातील. खूप गाजलेला सिनेमा. त्यातील आशयासाठी, अभिनयासाठी आणि गाण्यांसाठी सुद्धा! हे गाणे मी अनेकदा ऐकलंय आणि पाहिलंय. अप्रतिम संगीत, आणि तितकेच सुंदर चित्रीकरण. संजीवकुमारच्या चाहत्यांना  त्याचा उमदा, खट्याळ चेहरा मोहवून जातो.

पण कधी कधी अनेकदा ऐकलेली गाणी खूप वर्षांनी उमजतात आपल्याला. आज सहज हे गाणे डोळे मिटून ऐकत होते आणि गुलझार यांच्या शायरीच्या परत प्रेमात पडले. या संपूर्ण गाण्यात रस्त्यांचे वर्णन केले आहे. कसे आहेत हे रस्ते?

                        कुछ सुस्त कदम रस्ते,
                        कुछ तेज कदम राहें.............

वळण घेऊन येणारे हे कधी रस्ते असतात तर कधी राहें. प्रासादतुल्य घरे असोत, देखणी घरकुले असोत किंवा छोटे घरटे असो!  यांच्याकडे आपल्याला हे रस्तेच तर घेऊन जातात ना?

एखादा रस्ता वादळातून पार करावा असा. तर एखादा हळूच नजरेच्या टप्प्यात येऊन मनाला मोहवून जाणारा.
कधी रस्ता दुरून दिसतोय, जवळ येतोय असं वाटतं, पण अचानक दिशा बदलून तो वळतो. एखादा रस्ता एकदम निर्मनुष्य. ज्याच्यावर जीवनाच्या, जगण्याच्या काहीच खुणा नाहीत असा. हा रस्ता कुठे जातोय, कुठून येतोय हेच कळत नाही.

वाट कशाही असल्या, मोठ्या, छोट्या, उंच-सखल, रुंद-अरुंद, कधी जिवंत, कधी आल्हाददायक, कधी मृतवत, कधी त्रासदायक, तरीही यापैकी मला तुझ्यापर्यंत घेऊन जाणारी एखादी वाट असेलच ना?

गाण्याचा अर्थ मनाला अगदी भिडला. आयुष्य जगण्याची खरी मजा आहे, जर आपल्यावर प्रेम करणारे कुणी असेल. कुठॆतरी, एखाद्या छोट्या घरकुलात वाट पाहणारे कुणी असेल.

तरुण असताना, जसे आपण बेभान होऊन चालत असतो, काहीतरी मिळवण्यासाठी, काही जिंकण्यासाठी. पण असे करताना, प्रत्येकानेच या प्रेमाच्या रस्त्याचाही शोध घेत राहायला हवा. खरे ना?

                        इक राह तो वो होगी,
                        तुम तक जो पहुचती है ....  
                        इस मोड से जाते है..........

https://www.youtube.com/watch?v=STOM6NZfcrs



स्नेहा केतकर.

Saturday 13 May 2017

Cuddly

तुम्हांला IOT म्हणजे काय हे माहिती आहे? अहो, म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स! अगदी सोप्या शब्दांत सांगायचे, तर आता आपल्या घरात असणारी छोटी, छोटी उपकरणे आता आपल्या स्मार्ट फोन सारखी 'स्मार्ट' होणार आहेत.
म्हणजे बघा हं, तुम्ही घरात शिरलात की तुमच्या हॉलमधला दिवा लागेल. तुम्हांला हव्या त्या वेगाने पंखा लागेल. AC असला, तर AC लागेल. तुमचं आवडतं संगीत घरात वाजू लागेल. तुमचं रात्रीचं जेवण जर फ्रीज मध्ये असेल, तर त्याच compartment मध्ये ते कमी थंड झाले असेल. मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये असेल, तर गरम झाले असेल.इ.इ.
सध्याची तरुण पिढी या विचारांनी भारली आहे अगदी! अशीच एक मुलगी आपल्याला भेटते, cuddly या शॉर्ट फिल्ममध्ये! तिने म्हणजे तिच्या कंपनीने एक पाळणा/झुला तयार केलाय. अर्थात त्याला पाळणा म्हणायला ती तयार नाही. कारण त्याचे नाव कंपनीने ठेवलंय cuddly!
लहान मुले आणि आईच्याही सोयीसाठी बनवलेला हा पाळणा. याला चाके आहेत. यामुळे आई बाळाला घेऊन कुठेही फिरू शकते. यात बाळासाठी सर्व उत्कृष्ट दर्जाच्या गोष्टी वापरल्या आहेत. त्याला कोणताही त्रास होऊ नये म्हणून काळजी घेतली आहे. यातील गादी अगदी मऊ आहे. बाळाला हवा तसा आकार घेणारी आहे. बाळाला आरामदायी असणाऱ्या सर्व गोष्टी यात आहेत. सुमारे ४० भाषांतील अंगाई गीते यात रेकॉर्ड केली आहेत. भाषा निवडली की त्या भाषेतील मधुर स्वरातील अंगाई गीत चालू होईल. आणि बाळाला गाढ झोप लागेल.
आपल्या कंपनीच्या या अभिनव प्रोडक्टची माहिती मुलगी आईला देत असते. आईला अर्थातच अनेक प्रश्न पडत असतात. पण मुलगी या नव्या प्रोडक्टने भारलेली असते. बोलता बोलता, ती थकून आईच्या मांडीवर डोके ठेवते. आई प्रेमाने तिच्या डोक्यावरून, केसांतून हात फिरवत रहाते आणि आपले प्रश्न मुलीला विचारत असते. पण दोनच मिनिटांत ती मुलगी गाढ झोपी जाते.
फिल्म ही एवढीच. जेमतेम पाच मिनिटांची. पण खूप काही सांगून जाणारी. स्मार्ट फोन उराशी कवटाळणारी ही आजची पिढी, प्रेमाच्या, मायेच्या ओलाव्याला दुरावलीय का? सुंदर साडी नेसलेला फोटो मुलीने पाठवल्यावर, तिला मिठीत घ्यावंसं नाही वाटत का आपल्याला? की thumbs up केले की आपल्या भावना पोचतात तिला? स्पर्श करणे, मुलांना जवळ घेणे म्हणजे लाड असतात की प्रेम दाखवण्याची एक पध्दत? बाळाला कुशीत घेणे, कडेवर घेणे हा कोणत्याही आईसाठी अगदी परमोच्च आनंदाचा क्षण. पण हा आनंद हरवला तर जाणार नाही ना, अशी भीती ही फिल्म पाहिल्यावर वाटते. 'मदर्स डे' च्या मिनित्ताने तयार केलेली ही फिल्म तशी जुनीच आहे. पण यातील भावना मात्र गेल्या वर्षी काय, या वर्षी काय, किंवा पुढच्या वर्षी काय, जुन्या न होणारया! बरंच काही सांगणाऱ्या आणि बरंच काही विचारणाऱ्या!
https://www.youtube.com/watch?v=XxlujFhJUAo
1.      

स्नेहा केतकर