Monday 3 May 2021

कारवाँ, सराई आणि हमाम

 

इराण मध्ये आल्यापासून हे तिन्ही शब्द सतत कानांवर पडतात. पहिले दोन शब्द हे इथे एकत्रच म्हणतात, म्हणजे 'कॅरॅव्हॅनसराई' असे!!!!

मी लहान असताना, 'कारवाँ' नावाचा एक सिनेमा पाहिला होता.पण मला 'कारवाँ' या शब्दाचा अर्थ तेव्हा कळला नव्हता. मग मोठे झाल्यावर, इतर गाणी ऐकताना, काही हिंदी कविता वाचताना, या शब्दाचा अर्थ 'काफिला' किंवा 'तांडा' आहे, असे समजले. मुख्यत्त्वे हा शब्द उंटाच्या समूहाला उद्देशून वापरतात हे कळले.

'सराई' या शब्दाचा अर्थ धर्मशाळा असा आहे, हे हिंदी/मराठी धडे, कविता वाचताना कळले. वाटसरुंचे रात्री मुक्काम करण्याचे ठिकाण म्हणजे सराई. पूर्वी भारतातही लोक मजल-दरमजल करीत चालत वा घोड्यांवरून प्रवास करीत असत. त्याकाळी रात्री उतरण्याकरिता या सरायांचा वापर होत असे. अनेक सरदार, मोठे श्रीमंत लोक अशा सराया बांधत असत.

'हमाम' या नावाचा एक साबण आमच्या लहानपणी होता. पण या शब्दाचा अर्थ काय याचा मी कधी विचारच केला नव्हता. पण मध्यपूर्वेत फिरताना हे दोन्ही शब्द कानांवर पडतात आणि या दोन्ही जागा वारंवार पाहायला मिळतात.

'इस्फाहान' या इराणमधील सुंदर शहरात गेलो असताना, एक अतिशय देखणी कॅरॅव्हॅनसराई पाहिली. आज या ठिकाणी इराण मधले सगळ्यात जुने व सगळ्यात सुंदर हॉटेल आहे. या हॉटेलचे नाव 'हॉटेल अब्बासी' असे आहे. हे जवळ जवळ ४०० वर्षे जुने हॉटेल आहे. सफाव्हिद राजांच्या काळात म्हणजे पंधराव्या शतकात 'इस्फाहान' शहरात पर्शियाची राजधानी होती. साहजिकच अनेक व्यापारी या शहरात येत असत. इराणमध्ये ५०% हून अधिक भाग डोंगराळ आहे आणि २५% भागात वाळवंट आहे. या भागात पूर्वी प्रवास उंटावरूनच व्हायचा. या व्यापाऱ्यांसाठी बांधलेली ही देखणी सराई! मध्यभागी मोकळी जागा आणि चारी बाजूंनी देखण्या ओवऱ्या! या ओवऱ्यांत व्यापारी रहात असत आणि मधल्या भागांत उंट बांधत असत.


सध्याचे हॉटेल अब्बासी पण खरे तर इस्फाहान मधील ४०० वर्षे जुनी देखणी कॅराव्हानसराई

 

इस्फाहानमध्ये 'हमाम' ही आहेत. अधिक खोलात जाऊन वाचले असता समजले की, काशगर ते इस्तंबूल हा जुना सिल्क रूट आहे. या रूटवरील मुख्य रहदारी उंटांमार्फतच चालायची. तब्रिझला गेलो असताना, कापादोकीयाला गेलो असतानाही अशा सुरेख कॅरॅव्हानसराया पाहिल्या. उंट एका दिवसांत साधारण ४० किलोमीटर चालू शकतात, त्यामुळेच दर ४० किलोमीटरवर या सराया बांधलेल्या आहेत. जनावरांना बांधण्यासाठी छप्पर असलेल्या मोठ्या सराया ह्या रूटवर आहेत.

 

इतिहासाचा मागोवा घेण्याचा हा प्रवास मनोरंजक वाटला. ह्या डोंगराळ, वाळवंटी, खडतर अशा भागातून व्यापार करणाऱ्या त्या धाडसी मुशाफिरांचेही कौतुकच वाटले. या सिल्क रूटवर 'हमाम'ही आढळतात. शिराझ, इस्फाहान, तब्रिझ, मग तुर्कस्तान या सर्व ठिकाणचे 'हमाम' पाहण्यासारखे आहेत. हे 'हमाम' म्हणजे फक्त आंघोळीची जागा ह्यापुरते मर्यादित नाहीत. इथे गरम पाणी, मालिश, पाण्यात सुवासिक अत्तरे टाकण्याची सोय...अशा सर्व सोयी आहेत. काही हौद अनेकांसाठी तर काही काही फक्त एकाच माणसासाठी अशी रचना आहे. छोट्या मोठ्या अनेक खोल्या असतात. बाहेर ओवऱ्या असतात.

कॅरॅव्हॅनसरायांचा उद्देश समजला. पण हे देखणे हमाम कशासाठी बांधले? असा प्रश्न पडला. या विचारात असतानाच आम्ही समोरच असलेल्या अरास नदीपाशी गेलो. इथल्या नद्या ओढ्यासारख्या असतात. आपण हिमालयातील उगमापाशी नदी बघतो ना तशीच साधारण इथली जमिनीवरची नदी असते. भारतासारखी नदीत सूर मारून पोहणारी मुले इथे दिसणे अशक्य. कारण तशी मोठी नदीच नाही ह्या सिल्क रूटवर. मध्य आशियात सगळं भाग डोंगराळ आणि रेताड आहे. प्रवास करताना खुरटी झुडपे तेवढी नजरेस पडतात. पण हिरवा रंग औषधालाही दिसत नाही. सतत बाहेर पाहिल्यावर डोळेही थकतात.


जोल्फा ह्या इराण मधील अझरबैजान सरहद्दीलगतचा खोराश पास येथील देखणा हमाम

 

बाहेर बघता बघता, मी डोळ्यांपुढे ३००/४०० वर्षांपूर्वीचा उंटांचा तांडा आणला. डोंगराळ भागातून उन्हात/थंडीत प्रवास करणारे व्यापारी आणले. अशा वाळवंटी भागातून चालताना चालताना ते किती थकत असतील हे जाणवले. आणि मग 'हमाम' ह्या हवेलीसारख्या वास्तुचे महत्त्व उमगले. हे हमाम त्या व्यापाऱ्यांना ताजेतवाने करत असतील. आज आपण या वास्तुकडे एक प्राचीन वास्तु म्हणून पाहत असलो तरी या ठिकाणीच त्या काळात ह्या थकल्या-भागल्या व्यापाऱ्यांना, तांड्यातील मजुरांना विसावा मिळत असणार हे नक्की!


अरास नदी - नदीपलीकडे अझरबैजान आहे.

भटकंती करत असताना, एक हात इतिहासाच्या हातात असेल, तर प्रत्येक वास्तूशी आपण एक माणूस म्हणून भावनिक संबंध जोडू शकतो.इराण, इस्तंबूल येथे फिरताना म्हणूनच मला या 'कॅरॅव्हॅनसराई' आणि 'हमाम' ह्या जागांचे आकर्षण वाटले. वास्तुकलेवर प्रेम करणारे वेगळ्या दृष्टीकोनातून य जागांकडे पाहतील. मला मात्र त्यातून माणसाची विजीगिषु वृत्ती दिसते. अनेक अडचणींवर मात करत व्यापार उदीम करणारा मानव दिसतो. नुसता व्यापारच नाही, तर नविन गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सुक असणारा, त्यासाठी अपार कष्ट, धोके अंगावर घेणारा माणूस दिसतो.

आजच्या काळात सुखाने मोटारीतून फिरताना, त्या काळी चीनमधून इस्तंबूलपर्यंत व्यापार करणारे उंटांचे तांडे डोळ्यांसमोर येतात. बरोबरच्या वस्तूंसोबत उंटांचीही काळजी करणारे व्यापारी दिसतात. खडतर रस्ता, थकवणारे हवामान आणि यांवर मात करणारे हे भगीरथाचे पुत्र! गंगा नही पण आपल्या देशासाठी गंगाजळी आणणारे!

स्नेहा केतकर