Thursday 17 October 2013

इंग्लिश विंग्लिश – लढाई फक्त इंग्लीशशी ?

इंग्लिश विंग्लिश – लढाई फक्त इंग्लीशशी ?


हल्लीच प्रदर्शित झालेला “इंग्लिश विंग्लिश” चित्रपट बराच चर्चेत होता. श्रीदेवीचा ‘come back’ सिनेमा, जिव्हाळ्याचा विषय आणि गौरी शिंदे या मराठी मुलीने दिग्दर्शित केलेला चित्रपट !
आज खरंतर या चित्रपटाविषयी लिहिण्याचा माझा हेतू नाही. अर्थात चित्रपट चांगला आहेच आणि एक दोन प्रसंगात श्रीदेवीचा उत्कृष्ट अभिनयही मनाला भिडून जातो. एका मराठी गृहिणीला इंग्रजी नीट बोलता येत नसतं. तिला त्याची जाणीव असते, पण भारतात तिचं फारसं काही अडत नाही. परदेशात गेल्यावर तिला ते अधिक जाणवते आणि ती बोलीभाषण करण्याएवढे इंग्रजी शिकते. तसा सोप्पा प्रश्न आणि तसच सोप्पे उत्तरही !
पण मला वाटत, की केवळ प्रश्न इंग्रजी पुरता मर्यादित आहे का ? म्हणजे आपल्यापैकी अनेकजण, ज्यांना इंग्रजी नीट बोलता येत नसेल, ते या सिनेमाशी नक्की नाळ जोडतील. आणि इतर कशाला, एकेकाळी मलाही ‘ इंग्रजी नीट बोलता येत नाही ’ असा न्यूनगंड होता.
तर मुळात प्रश्न या  ‘न्युनगंडाचा‘ आहे. एखादी गोष्ट असली वा आली म्हणजे आपण जिंकलो असे वाटण्याचा आहे. आजच्या काळात अनेकांना अनेक गोष्टींमुळे न्यूनगंड येताना मी पाहते. काहींना आपण जाड आहोत म्हणून, तर काहींना आपण फारच बारीक आहोत म्हणून ! काहींना रंगामुळे तर काहींना उंचीमुळे ! आपण ज्या जाहिराती पाहतो त्यादेखील आपल्याला सतत बदलण्याचा सल्ला देत असतात. ह्या क्रीममुळे गोरे व्हाल, तर या शाम्पूमुळे केस लांब होतील, मऊ होतील इ. आपण अपूर्ण आहोत हेच सतत जाणवत राहते.
सिनेमा पाहताना सारखे जाणवते ते शशीच्या नवऱ्याचे आणि मुलीचे तिला टोमणे मारणे. तिच्याजवळ असलेल्या गुणांपेक्षाही तिच्या दोषांवर बोट ठेवणे. तिच्या चुकांवर हसणे. तिच्या जवळची, मायेची माणसे ! पण तिला दुखवण्यात समाधान मानणारी ! किंबहुना आपण तिला दुखावतोय, याचीदेखील जाणीव नसणारी. तिच्या चांगल्या गोष्टींची कदर नसणारी पण तिच्या दोषांवर बोट ठेवणारी ! रात्री उशिरा आल्यावर नवऱ्याला झोपेतून उठून वाढणारी शशी ! पण तिच्या छोट्याशा आनंदातही सहभागी न होणारा तिचा नवरा !  या सर्व छोट्या गोष्टी शशीचा न्यूनगंड वाढवणाऱ्या !  कॅफेमधील ती संवेदनाशून्य बाई ! शशीला इंग्रजी येत नाही हे समजूनही तिला घाबरवून टाकते. आपल्या जवळ “काय नाही“ हेच सांगणारी ही माणसे !
आज रोजच्या जगातही आपल्याजवळ काय नाही, याची जाणीव आपल्याला अनेकजण करून देत असतात. आता असं वाटतंय, की हे एक दुष्टचक्रच आहे. लोक आपल्याला असं म्हणतात, मग आपण पण दुसऱ्यात काय उणीव  आहे, हे त्यांना सांगत राहतो. मात्र सगळेचजण या वर्तनामुळे ताण घेत असतात हे कोणाच्याही लक्षात येत नाही.
चित्रपटात आपल्या भाचीच्या खांद्यावर डोकं ठेवून मन मोकळं करताना शशी म्हणते, “मला प्रेम नकोय ग! मला थोडा respect हवाय !” आत्मसन्मान असणे हे किती महत्वाचे आहे ना ? शशीच्या स्वैपाकाचेही थोडया तुच्छतेने कौतुक करणारा सतीश ! त्याच्याकडूनही शशीला respect मिळत नाही ही गोष्ट तिला दुखवणारी आहे.
त्यामुळे “मी फक्त शशीसाठी क्लासमध्ये येतो. तिला पाहायला ! ती मला आवडते “ असे लोरेंने मोकळेपणाने सांगितल्यावर शशीही कावरीबावरी होते. कारण आपण कोणाला आवडतोय, आवडू शकतो, ही जाणीवच तिला नाहीये, किंवा ती हे विसरूनच गेली आहे.
मुलगा पडल्यावर ती जवळ नसते, तेव्हा एखाद्या गुन्हेगाराकडे पहावे तशी सतीशची तिच्यावरची नजर ! अगदी छोट्या गोष्टी पण मनावर आघात करणाऱ्या ! मग या अशा अनेक गोष्टींसाठी आपण आपल्याला दोषी मानायला लागतो. मुलांच्या आयुष्यात काही चुकीचे घडले तरी आपण स्वतःचा दोष मानतो. मनातला न्यूनगंड वाढीस लागतो.
गौरीने शशीला इंग्लीश बोलता येते हे सिनेमाच्या शेवटी दाखवले आहेच. पण इंग्लीश शिकताना, तिला मदत करणाऱ्या भाचीच्या रूपाने, आपण कसं वागावं याचाही पाठ दिला आहे. इंग्रजीच्या क्लासमधले सगळेजण तिथे मजेत तोडकं मोडकं इंग्रजी बोलत असतात. प्रत्येकाला तिथे यायची ओढ वाटते, कारण ते या एका “इंग्रजी न बोलता येणाच्या धाग्याने” बांधले गेले आहेत. इथे कोणी कुणावर हसत नाही. सगळे समान आहेत.
खरं तर, आपल्या रोजच्या जगण्यातही आपण असंच मजेत जगायला काय हरकत आहे? प्रत्येकाने स्वतःला आपल्या परीने परिपूर्ण मानलं तर हे सहज शक्य आहे. स्वतःकडे आणि दुसऱ्याकडे काय नाही यापेक्षा काय आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला तर ?
विद्याधर पुंडलिकांच्या ‘चक्र’ नावाच्या एकांकिकेत, द्रौपदी अश्वत्थाम्याच्या जखमेवर तेल घालते, आणि त्याला म्हणते, “आपण हे सूडाचे दुष्टचक्र आता थांबवूया !”
‘ इंग्लीश विंग्लिश ‘ सिनेमा पाहिल्यावर असेच काहीसे माझ्याही मनात आले.
**************

No comments:

Post a Comment

Share your views also ---