महाकुंभ – एक चिंतन
“महाकुंभ” या जवळ जवळ चाळीस दिवस चाललेल्या धार्मिक सोहळ्याची आज सांगता झाली. काल महाशिवरात्रीला पवित्र स्नान करून भाविकांनी काशी येथील येथील विश्वेश्वराच्या मंदिरात गर्दी केली आणि श्रद्धेने विश्वेश्वराला नमन करून प्रयागराज, बनारस हा परिसर सोडला असेल. गेले चाळीस दिवस पेपरमध्ये, टीव्हीवर, आप्तस्वकीयांकडून, सोशल मिडियावरून ‘महाकुंभ’ आपल्या सर्वांच्याच विचारांत घुसलेला होता.
एक पत्रकार असल्याने या सर्व घडामोडींकडे मी तटस्थपणेच पाहत होते. सुरवातीच्या दिवसांत हळुहळू गर्दीच्या बातम्या यायला लागल्या. “आजपर्यंत इतक्या कोटी लोकांनी गंगेत डुबकी घेतली”, असेही रोज ऐकायला येऊ लागले. बातम्यांत हिंदू धर्माबद्दल आस्था असणारे विदेशी भाविकही दाखवत होते. त्यांच्या मुलाखतीत त्यांनी “आम्ही कुंभसाठीच भारतात आलो आहोत” असेही आवर्जून सांगितले. सुधा मूर्ती, अनुपम खेर यांच्यापासून ते राष्ट्रपती, पंतप्रधान , गृहमंत्रींपासून अनेक केंद्रीय मंत्रीगणांनी संगमावर स्नान केले. देशांतील अनेक मुख्यमंत्र्यांनी ही आपल्या मंत्रिमंडळातील कांही सदस्यांसकट पवित्र स्नान केले. उत्तरप्रदेशच्या पूर्ण मंत्रिमंडळाने संगम स्नान करून एकप्रकारे व्यवस्था चोख आहे ना हे प्रत्यक्षच अनुभवले.
आतापर्यंत मामला दूरचा होता. पण मग मैत्रीणी, नातेवाईक, शेजारपाजारचे पण महाकुंभला जाऊन आले किंवा जाणार आहेत अशा बातम्या यायला लागल्या. मी महाकुंभला गेले नाही, पण मैत्रिणीने प्रेमाने आणलेल्या गंगेचे काही पाणी माझ्याही वाट्याला आले. अनेकजणांचे डुबकी घेतानाचे फोटो पाहिले. आता तर संगमस्नान घेतलेल्यांची संख्या ६० कोटींच्या आसपास गेली आहे असे म्हणतात. यांत काही तपशीलाचा फरक असेल कदाचित, पण महाकुंभला जाऊन आलेल्यांची संख्या प्रचंड आहे हे नक्की.
या दरम्यान दोन दुख:द घटनाही घडल्या. प्रयागराज मधील चेंगराचेंगरी आणि दिल्ली स्टेशनवरील झालेल्या गडबडीत काही जणांचे मृत्यू झाले. या घटना दुर्दैवीच म्हणायला हव्या. या घटनांचे पडसाद सर्व माध्यमांत उमटलेच. आता लोकांचा महाकुंभला जायचा उत्साह कमी होणार की काय असे वाटले. पण तसे घडले नाही. उत्तरप्रदेश सरकारनेही थोडे बदल करून व्यवस्था नीट राखण्याची पराकाष्ठा केली. यासाठी सर्व उत्तरप्रदेशातील महाकुंभला कामाला असलेल्यांचे कौतुक करायलाच हवे. याचे मोठे श्रेय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आहे. सरकारी कर्मचारी आणि ह्या कामासाठी नव्याने नियुक्त केलेले लोक यांना ह्या भल्यामोठ्या आयोजनासाठी काम करायला उद्युक्त करणे, motivate करणे आणि हे motivation कुंभमेळ्याच्या तयारीपासून आजपर्यंत टिकवून ठेवणे हे सोपे काम नाही.
Unity in Diversity, गंगा-जमनी तहजीब असे शब्द आपण राजकीय चर्चातून नेहमीच ऐकत आलोय. पण ह्याचा प्रत्यय या महाकुंभ मेळ्यात आला असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. मुळात ह्या मेळ्याचे आयोजन करण्यात कुशल तंत्रज्ञ, व्यवस्थापन कुशल अधिकारी, पोलीस व्यवस्था, शासकीय कर्मचारी ते सफाई कामगारापर्यंत अनेकांचे कष्ट आहेत. प्रत्येकाने आपले काम चोख केले म्हणूनच हा सोहळा संपन्न झाला. मेळ्याला सर्वोच्च पदावरील व्यक्ती, सर्वात श्रीमंत उद्योगपती ते देशाच्या खेड्यापाड्यातून आलेले गरीब लोक – सर्वांनी हजेरी लावली. उच्चशिक्षित, अशिक्षित, गरीब, श्रीमंत सारेच सारख्याच भक्तिभावाने गंगेत डुबकी घेत होते. सर्वच भाविकही नव्हते, काही FOMO मुळे आलेले होते, तर काही बघुया तरी काय आहे अशा उत्सुकतेने आले होते. पण सर्वांना सारख्याच प्रेमाने गंगा माईने जवळ केले.
भाजपला विरोध करायचा म्हणून अनेक विरोधी पक्ष हिंदू धर्मावर, त्यातील चालीरीतींवर कठोर टीका करतात. त्यांनी महाकुंभ सोहळ्यावर विषारी टीकाही केली. पण त्यांना भारतीय जनमानसाची नस अजून ओळखता आली नाही असेच खेदाने म्हणावेसे वाटते. महाकुंभ म्हणजे काय? फक्त पापक्षालनासाठी वा पुण्य मिळवण्यासाठी इतके सारे जण तिथे गेले? तर तसं वाटत नाही. धर्माच्या नावाखाली निर्माण केलेली ही एक सांस्कृतिक व्यवस्था आहे. याची पाळेमुळे हजारो वर्षांच्या आपल्या जडणघडणीत रुजली आहेत. ‘तत्वमसि’ नावाचे ध्रुव भट्ट लिखित पुस्तक वाचताना याचा उलगडा होतो. आसेतु हिमाचल पसरलेल्या, प्रत्येक प्रदेशाची वेगळी भाषा, वेगळ्या चालीरीती, वेगळी संस्कृती, वेगळे खानपान असलेल्या या महाप्रचंड देशाला एकत्र बांधून ठेवण्यासाठी निर्माण केलेला हा एक बंध आहे.
वेगवेगळ्या प्रदेशांमधील माणसे एकमेकांना भेटायला हवीत. त्यांनी प्रवास करायला हवा. पण इतकी दूरवर पसरलेली ही माणसे, कुठे वाळवंट तर कुठे अरण्य, कुठे डोंगर तर कुठे दऱ्या, कुठे समुद्र किनारा ....अशा प्रदेशातून एकत्र येणार तरी कुठे? आणि कधी भेटणार? शिवाय आपला देश शेतीप्रधान, शेताच्या कामांतूनही वेळ मिळायला हवा, प्रवासासाठी पैसा हवा.. म्हणून मग ही तीर्थक्षेत्रे, मेळे, तीर्थयात्रा, पवित्र स्नान या ठिकाणांना भेटी देण्याची धार्मिक परंपराच निर्माण करण्यात आली. ठिकाणे ठरवण्यात आली आणि ह्या ठिकाणी भेट देण्याच्या वेळाही ठरवण्यात आल्या. त्याही आपल्या पंचांगानुसार आणि आपल्या शेतीच्या कामानुसार. जसे उत्तरायण सुरु झाले आणि महाकुंभला सुरवात झाली. माघ महिन्यातील स्नान महत्वाचे असते. आपली पंढरपूरची वारीही पेरणी झाली की त्याच सुमारास सुरु होते. शेताला पाणीही देण्याचे काम नसते, कारण पावसाळाच असतो तेव्हा.
ह्या सोबतच धर्मशाळा उभारल्याने, अन्नदान केल्याने पुण्य मिळते, धनवान व्यक्तीने ते करावे असे संकेतही निर्माण करण्यात आले. आज आपण विमानाने, बसने, आगगाडीने प्रवास करतो, पण हजारो वर्षांपूर्वी चालत, सोबत सामान-सुमान घेऊन लोकं प्रवास करत होती. त्यांना ह्या धर्मशाळा, अन्नछत्रे यांची नितांत गरज असायची. भारतीय संस्कृतीची पाळंमुळं ही अशी ह्या तीर्थयात्रा, मेळ्यांना जाणे, तीर्थाटन करणे यांत खोलवर गुंतलेली आहेत. प्रवासाने मनाची कवाडं खुली होतात. एकमेकांना मदत करत सोबतीने यात्रा होतात. ज्या धर्मशाळेत आपण राहतो, जिथे जेवतो, त्या प्रती एक कृतज्ञता भाव मनात राहतो. आज ही म्हणजे अगदी आजच्याच दिवशी योगीजींनी महाकुंभ मेळ्यासाठी काम केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार केला, त्यांचे आभार मानले असे बातम्यांत सांगत होते. महाकुंभला जाऊन आलेल्या सर्व सुहृदांपैकी कोणीही कशावरही टीका केलेली मी ऐकली नाही. सर्वांच्या बोलण्यात समाधान, कृतार्थता जाणवली. ज्यावेळी लोक चालत, जनावरांच्या पाठीवर सामान लादून ही यात्रा करत असतील तेव्हा कुठली शक्ती त्यांना ताकद देत असेल?
‘तत्वमसि’ पुस्तकात एक प्रसंग आहे. एक थोडासा चिडका परिक्रमावासी आश्रमात येतो आणि प्रत्येक गोष्टीला नावे ठेवू लागतो. तिथे असलेली सुप्रिया (सुपरिया) शांतपणे त्याच्याशी बोलत राहते, मदत करते. “अशा माणसाला मदत करून तुला कोणते पुण्य मिळणार आहे?” असे विचारले असता, ती म्हणते, की “हजारो वर्षे चालत आलेली परिक्रमा करण्याची परंपरा जतन करण्याचा मी प्रयत्न करतेय. त्या परंपरेची मी सेवा करत्येय.” परिक्रमा करणे, तीर्थयात्रा करणे, कुंभमेळ्याला जाणे या सर्व हजारो वर्षे चालत आलेल्या धार्मिक-सांस्कृतिक परंपरा आहेत. ही परंपरा जिवंत ठेवण्यातील मोठा वाटा ह्या कुंभमेळ्याला आवर्जून गेलेल्या भारतीयांनी उचलला आहे.
ह्या कुंभ मेळ्याची आता पूर्तता झाली असली, तरी ह्या सोहळ्याची चर्चा थांबणार नाही. आर्थिक, राजकीय, धार्मिक, श्रद्धा-अंधश्रद्धा अशा अनेक दृष्टीकोनातून ह्यावर चर्चा होईल. मात्र आसेतु हिमाचल पसरलेल्या भारताच्या आणि भारतीयांच्या मनात गंगा नदी, प्रयाग संगम, महादेव – याबद्दल असलेली आस्थेची, श्रद्धेची, भक्तीची तेवत असलेली ज्योत अधिक तेजाने तेवत राहणार हे नक्की!!!!!!
स्नेहा केतकर
२७ फेब्रुवारी २०२५
मीना, लेख आवडला. छान लिहिला आहेस.
ReplyDeleteVery precise and well written article.
ReplyDeleteकुंभमेळा किंवा तत्सम अन्य उत्सवांचा पूर्वकालीन आणि आधुनिक काळाचा सामाजिक अर्थ तुझ्या लेखा मुळे समजतोय स्नेहा. भारतातील हिंदूंना एकत्र करण्याचं ही मोठ काम यातून होतंय. असे लेख आणिक वाचायला आवडतील मीना.
ReplyDeleteकुंभमेळ्याचा वेगळ्या दृष्टिकोनातून घेतलेला आढावा, खूप छान !!
ReplyDeleteछान लेख स्नेहाताई...
ReplyDeleteखूप छान लिहीलं आहेस. कुंभ किंवा इतरही प्रथा आणि च्या मागचा विचार पटणाराच आहे.
ReplyDeleteKhup chan lekh Meena tatvamasi pustakacha ethe sadharbh dilas mhanun pustak vachayala awadel
ReplyDeleteमीना खूप छान लेख आहे मला आवडला लिहिला पण चांगला आहेस
ReplyDeleteIn this mahakumbh,Muslims were not allowed but they helped the stampede victims.That was the real Unity in Diversity, गंगा-जमनी तहजीब.https://timesofindia.indiatimes.com/city/lucknow/post-stampede-compassion-bridges-faiths-in-prayagraj/articleshow/117802348.cms
ReplyDeleteMany muslims were there and they were helping people to drop and pick them up from the ghats earning good money. Nobody minded.....and they were as excited as everybody.
Deleteयोगीजींनी महाकुंभ मेळ्यासाठी काम केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार केला, त्यांचे आभार मानले.However I am not sure if he acknowledged the support extended by Muslims and Sikhs
ReplyDeleteI don't think he acknowledged people religion wise. He acnowledged everyone who were working there......सफाई कामगारांबरोबर त्यांनी काल भोजन ही केले.
DeleteSorry I guess your comnent about honouring muslims and,sikhs was deleted by mistake ....my response is there though.
DeleteThe Muslims who helped the stampede victims were not working there.They are residents of the city of Prayagraj.It would have been graceful if Yogi had SPECIFICALLY acknowledged their gesture.Also Yogi is known to make religion based statements therefore it would have been all right to mention the contribution of Muslims in accommodating the helpless victims
DeleteKumbh chi Barich mahiti gelya kititari divsaat milali. Parampara Japane important...punya ...mahit nahi. Parantu 60 crore is surely a big number!!!
ReplyDeleteछान लिहिले आहे स्नेहा, खरंच ह्या महाकुंभ चा महौल च वेगळा होता. प्रत्यक्ष भेट दिलेल्यांसाठी तर होताच पण घरी बसून दूरदर्शन बघणाऱ्यांसाठी पण एक वेगळेच वातावरण तयार करण्यात माध्यमे सफल झाली असे म्हणावे लागेल.
ReplyDeleteलेख वाचून समाधान वाटले कुंभमेळ्याला जाता आले नाही ही खंत थोडी कमी झाली श्रीराम ढवळीकर
ReplyDeleteSneha, The article is very well written
ReplyDeleteअत्यंत सुंदर विश्लेषण. आपल्या परंपरा फार छान समजावून सांगत आहेत.
ReplyDeleteवेगळा दृष्टिकोन. छान लेख !
ReplyDeleteखुप छान लेख आहे.
ReplyDeleteVery informative!!
स्नेहाताई नेहमीप्रमाणेच छान लेखन , अभ्यासपूर्ण.
ReplyDeleteलेख माहितीपूर्ण, तरीही नेटका आहे, कंटाळवाणा नाही. स्नेहाताई खूप खूप शुभेच्छा
ReplyDelete