Friday, 31 January 2025

२०२५.......... सम्राट सायरस

मानवाधिकार आणि सम्राट सायरस 

ह्या येणाऱ्या वर्षाचे स्वागत तर करायला हवे. पण ह्या वर्षाच्या सुरवातीलाच लॉस एंजेलिस येथील ज्वाळांनी पेपरांतील मथळे भरून गेले. युक्रेन आणि रशियातील युद्धाच्या ज्वाळा अजून विझलेल्या तर नाहीतच पण आता तर त्या तीव्र होतात की काय अशी भीती वाटू लागली आहे. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतल्यावर लगेचच आपण पॅरिस येथे झालेल्या हवामान करारातून बाहेर पडणार आहोत असे जाहीर केले. लोकांना दिलेले इशारे दुर्लक्ष केल्यामुळेच लॉस एंजेलिस येथे इतक्या मोठ्या प्रमाणावर आग लागली. 

कॅलिफोर्नियामध्ये आग लागण्याच्या बहुतांश घटना विजेमुळे घडतात. याशिवाय बदलते हवामान हे देखील एक कारण मानले जात आहे. कॅलिफोर्नियामध्ये उन्हाळ्यात तापमान खूप जास्त होते. त्यामुळे जंगलातील झाडे, झुडपे सुकतात. एक छोटीशी ठिणगी देखील आगीचे कारण बनू शकते. अनियंत्रित वाऱ्यामुळे आग शेकडो एकरपर्यंत पसरू शकते. वाऱ्याचा वेग व दिशा यामुळे आग आटोक्यात आणण्यात अडचणी निर्माण होतात. या परिसरात बांधलेल्या घरातही चटकन पेट घेणारे साहित्य वापरले गेले असल्याचे उघडकीस आले आहे. 

गाझा पट्टीत सध्या तरी शांतता आहे, पण तेथील विध्वंस पाहून अतिशय वाईट वाटते. युक्रेन सारखा देशही उद्ध्वस्त झाला आहे. माणसे, त्यांचे अधिकार ह्यांना जणू कचऱ्याच्या टोपलीत टाकण्याचे अनेकांनी ठरवले आहे. ह्यातील दोषी म्हणाल तर सर्वच जण आहेत. झेलेन्स्की यांचा NATO त सामील होण्याचा हट्ट, त्यांना सामील करून घेण्याचा युरोप व अमेरिकाचा दुराग्रह, रशियाचा कट्टर विरोध ...आणि पॅलेस्टाईन आणि इस्रायल हा संघर्ष तर जुनाच आहे. पण त्यापायी किती जणांची आयुष्ये किती वर्ष दावणीला बांधायची ह्याचा कोणी विचार तरी करतोय कां?

असो..... हे असेच विचार तुमच्याही मनात येत असणार हे नक्की. 

वर्षाच्या सुरवातीला मला मात्र तुम्हांला एका अशा सम्राटाबद्दल सांगायचे आहे ज्याने मानवी मूल्ये जपण्यासाठी पहिले पाऊल उचलले. हा आहे पर्शियन सम्राट सायरस.

शिराझहून जवळच पासरगड येथे इराणच्या इतिहासातील हे महत्वाचे ठिकाण आहे. जगात इतक्या प्राचीन काळातल्या, म्हणजे अडीच हजार वर्षांपूर्वीच्या फारच कमी वास्तू उरल्या आहेत. अडीच हजार वर्षांपूर्वी अकिमेनिअन घराण्यातल्या ‘सायरस’ या पर्शियन राजाने मेडिअन्स ह्या इराणच्या मध्यभागातील जमातींचा पराभव करून, पर्शियन साम्राज्य उभे केले. या ‘सायरस’ राजाची समाधी पासरगडला आहे. आजही या ठिकाणी ‘सायरस’ राजाच्या राजवाड्याचे भग्नावशेष आहेत. आम्ही ते दुरुनच पाहिले.

सम्राट सायरसने आपले पर्शियन साम्राज्य स्थापले. मात्र हे साम्राज्य त्याने मानवतेच्या दृष्टीकोनातून वाढवले. ५५० बी.सी. या काळात त्याने स्वतः जिंकलेल्या राज्यांमध्ये धर्म बदलाची सक्ती केली नाही. हरलेल्यांचे शिरकाण केले नाही. उलट सर्वांना सहृदयतेने वागवावे असे त्याने लिहून ठेवले व तसेच तो वागलाही! जिंकलेल्या राज्यांतील माणसे, संपत्ती या कशाचाही त्याने विध्वंस केला नाही. बाबेल जिंकल्यानंतर, तिथल्या ज्यू लोकांना जेरुसलेमला परतायला त्याने आडकाठी घेतली नाही. लोकांना मारले तर नाहीच पण आपण जिंकलेल्या राज्यातील जनतेला त्याने गुलामही बनवले नाही. आपले हे सारे विचार त्याने एका झाडाच्या खोडावर कोरून ठेवले आहेत. त्यालाच आज ‘सायरस सिलिंडर’ असे म्हणतात. सायरसने लिहिलेल्या विचारांना ‘नैसर्गिक कायदा – Natural Law’ असे संबोधतात. युनायटेड नेशन्सच्या मानवाधिकार समितीने लिहिलेल्या मसुद्याचे मूळ या सम्राट सायरसच्या नैसर्गिक कायद्यात आहे. आजही या ‘सायरस सिलिंडर’ची प्रतिकृती युनायटेड नेशन्सच्या इमारतीत आहे. मूळ सिलिंडर मात्र ब्रिटनच्या संग्रहालयात आहे.

पासरगड येथे सम्राट सायरसची समाधी आहे. सहा पायऱ्या असलेली ही समाधी तशी छोटीच आहे. पण इराणमधील इतर इमारतींप्रमाणेच प्रमाणबध्द व देखणी आहे. त्याने आपल्या छोटयाशा समाधीसाठीही काही ओळी लिहून ठेवल्या आहेत. त्या अशा –

 

O Man, whoever you are and

Wherever you can come from,

For I know you will come,

I am Cyrus, who won the Persians

their Empire.

Do not therefore, begrudge me,

This bit of earth, that covers my bones.

 

आज आपला इराणकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. पण ह्याच देशातल्या एका सुसंकृत राजाने, सम्राटाने जगाला मानव कल्याणाचा मार्ग दाखवला होता. ह्या मार्गावरून चालण्याची साऱ्या जगाला गरज आहे. 

सम्राट सायरस म्हणल्याप्रमाणे कोणीतरी,कधीतरी ह्या मार्गावरून जाईल अशी आशा करूया.

स्नेहा केतकर  




3 comments:

Share your views also ---