Friday, 20 December 2024

पुन्हा एकदा पुलं......जावे त्यांच्या देशा

 

पुन्हा एकदा पुलं......जावे त्यांच्या देशा

परवा पुण्याला गेले असताना पुस्तकांच्या दुकानात पुलंची पुस्तके पाहिली. सर्व पुस्तके वाचली असतानाही परत एकदा हाताळाविशी वाटतात. कुठलेही पान उघडून वाचायला लागले तरी ओठांवर हसू येते. जुन्या आठवणी येतात. ह्यावेळी समोर ‘जावे त्यांच्या देशा’ हे पुस्तक आले. पुस्तक चाळताना इटली, फ्लॉरेन्स, हंगेरी, नायगारा – असे ओळखीचे शब्द वाचले आणि एक कुतूहल वाटले. पुलं ह्या सर्व ठिकाणी जवळ जवळ पन्नास वर्षांपूर्वी जाऊन आले आहेत. कारण हे सर्व लेख १९७३ मध्ये प्रकाशित झाले आहेत. त्यावेळी परदेशप्रवास हे एखाद्या परग्रहावर जाण्याइतके दुर्लभ होते. गेल्या पन्नास वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. आता परदेश प्रवास हे अप्रूप राहिलेले नाही. त्यामुळे पुलंना काय वाटले हे मला माझ्या अनुभवांशी ताडून पाहावेसे वाटले म्हणून पुलंचे ‘जावे त्यांच्या देशा हे पुस्तक परत हातात घेतले.

पुस्तकातील पहिला लेख ‘दर्शन हा आहे. सुरवात व्हेनिसच्या वर्णनाने होते. व्हेनिसच्या वार्षिक नौका महोत्सवाच्या दिवशी पुलं तिथे होते. तिथल्या त्या सर्व नौका महोत्सवाचे वर्णन पुलंनी मस्तच केले आहे. व्हेनिस पाहिले असल्याने सर्व डोळ्यांसमोर उभेच राहते. पुलंनी ‘वाईन’ला दिलेला ‘वारुणी’ हा प्रतिशब्द मला फारच आवडला. Red wine ला रक्त वारुणी आणि White Wine ला श्वेत वारुणी! सजवलेले गोंडोला, सुंदर तरुणी, देखणे तरुण आणि पाण्यावर झुलणारी व्हेनिस नगरी..... ह्या सर्व देखाव्याचे इतके मनोहर दर्शन पुलंनी घडवले आहे की ते रसिकांनी जरूर वाचावे. आपल्याला वाटते हेच दर्शन पुलंना घडवायचे आहे. पण खरे दर्शन तर पुढेच आहे.

                                                                the tramp - चार्ली चॅप्लीन

त्याच दिवशी व्हेनिस चित्रपट महोत्सवाचाही शेवटचा दिवस असतो. चार्ली चॅप्लीनचा ‘सिटी लाईट्स’ हा सिनेमा सेंट मार्क्स स्क्वेअरला दाखवण्यात येणार असतो. पुलं तिथे सिनेमा पाहायला म्हणून जातात आणि त्यांना तिथे साक्षात ‘चार्ली चॅप्लीन’चे दर्शन घडते. पुलं सोबत आपणही हा प्रसंग अक्षरश: अनुभवतो. पुलंनी ‘चार्ली चॅप्लीन’चे ‘समाजातल्या underdog चे चित्रण करणारा’ असे केलेले वर्णन तंतोतंत पटले. ‘रस्त्याच्या काठी जगणाऱ्या त्या केविलवाण्या कुत्र्यासारखाच केविलवाण्या डोळ्यांनी पाहणारा असे जेव्हा पुलं चार्ली चॅप्लीनचे वर्णन करतात, तेव्हा पुलंच्या प्रतिभेला दाद द्यावीशी वाटते. चार्ली चॅप्लीनच्या सिनेमातल्या त्या गणंग व्यक्तिरेखेचे इतके अचूक वर्णन दुसऱ्या कुणी केले असेल तर ते मला माहिती नाही. चार्लीच्या दर्शनाने उजळून गेलेल्या प्रकाशात पुलं त्यांच्यासोबत आपल्यालाही नेतात हीच त्यांच्या शब्दांची किमया!

‘निळाई’ हा लेख ही मस्तच. ‘नेपल्स’ला जर इटालियन भाषेत ‘नापोली म्हणत असतील, तर ‘दापोलीचे खरे नाव काय बरं असावे असा एक भाषाशास्त्रीय प्रश्न मनाला चाटून गेला!!!! – ही पुलंची कॉमेंट तर खासच.....त्याचप्रमाणे इटालियन स्पॅगेटीच्या विविध रूपांचे ....मॅक्रोनी, टोटॅलिनी, रॅव्हीओली, कॅनेलोनी....वर्णन करताना पुलं म्हणतात, ‘एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति’ म्हणजे काय हे इटालियन शेवयीची नाना स्वरूपे पाहिल्यावर कळते. हे वाचल्यावर हसू फुटल्याशिवाय राहत नाही. ह्या लेखात एका रेस्तराँमध्ये गेल्यावर माशाचे किती प्रकार आणले ह्यावर पूर्ण परिच्छेद आहे. मत्स्यप्रेमींनी तो जरूर वाचावाच. पुलं अमाल्फी कोस्टवरील सोरेंटो ह्या गावी राहत होते. ह्या परिसराचे वर्णनही वाचण्यासारखे. पण ह्या समुद्राला नारळीच्या वनांचा किनारा नाही....ह्याचे पुलंना वाईट वाटते. 

                                                                नील कुहर

पण ह्या लेखात पुलंनी मुख्यत्वे काप्री बेटाजवळील Blue Grotto ह्या जागेचे वर्णन केले आहे. पुलंना मोहात पाडणारी निळाई इथलीच...पुलंनी या जागेचे मराठीत नील कुहर असे नामकरण केले आहे. या नील कुहरात जाण्यासाठी होड्यांची रांग लागलेली असते. छोट्याशा होडीतून अगदी आडवे होऊनच या नीलकुहरात प्रवेश करावा लागतो. दीडशे फूट लांब, पन्नास फूट रुंद आणि शंभर फूट उंच अशा गुहेत आपण पोचतो. आत शिरायला आणि बाहेर पडायला दोन छोटी नैसर्गिक दारे आहेत. ह्या जागेतून पडणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे दिसणारे नेत्रदीपक दृश्य ह्या जागेला ‘अपूर्व’ बनवते. “सूर्यप्रकाशाचे इथे निळे पाणी झालेले वाटते. त्या निळ्यातील ती चंदेरी झळाळी तर अपूर्व, असा नीलिमाच नव्हे, तर अशी शीतल पण तेज:पुंज शुभ्रताही मी पाहिली नव्हती. असे पुलंनी लिहिले आहे. सूर्यप्रकाश त्या पाण्यात तळापासून शिरतो. परावर्तित प्रकाशाची ही किमया आहे असे म्हणतात. वैज्ञानिक स्पष्टीकरण असले तरीही आपल्या लक्षात राहतो तो भारून टाकणारा अनुभवच. या पुल-अनुभवासाठी तरी ‘निळाई’ लेख जरूर वाचावा.


                                    फ्लॉरेन्स मधील प्रसिद्ध द्युओमो - फ्लॉरेन्स कॅथिड्रल

फ्लॉरेन्स मध्ये भेटलेल्या डॉ.उगुच्चिओनि यांना पुलंनी ‘आद्य शंकराचार्य’ असे म्हटले आहे. कारण लेख वाचल्यावर वाचकांना कळेलच. पण फ्लॉरेन्ससारख्या नितांतसुंदर शहरावरचा लेख मला थोडा निराश करून गेला. मर्दानी लावण्याचा आविष्कार असलेल्या मायकेल अँजेलोच्या जगप्रसिद्ध डेव्हीडचा उल्लेखही या लेखात नाही. उफिझी, अकेडेमिया ह्या जगप्रसिद्ध म्युझियम्सचा उल्लेख नाही. आपल्याला इतिहासात नेणाऱ्या फ्लॉरेन्सच्या गल्लीबोळांची वर्णने नाहीत. द्युओमोचे वर्णन मात्र मस्त केले आहे. फ्लॉरेन्स ह्या कलासक्त नगरीला घडवणाऱ्या ‘मेडिची’चाही उल्लेख नाही. मला वाटते, डॉ.उगुच्चिओनि यांच्यावर आणि फ्लॉरेन्सवर असे दोन लेख लिहायला हवे होते पुलंनी. असो.


                                                               Alps - Jung Frau

उदंड जाहले पाणी या लेखात नायगरा धबधबा, कॅनडातील Thousand islands यांचे वर्णन आहे तसेच रोम मध्ये अचानक झालेल्या मुसळधार पावसाचेही वर्णन आहे. “हिमराशी होऊन आकाशापर्यंत पोहोचणारा आल्पस पाहिल्यावर थोडक्याच दिवसात जलराशींनी पाताळात घेतलेली झेप पहायचा योग आला......” अशा शब्दात नायगाराचे वर्णन पुलं करतात. या लेखात ’jung frau’ या युरोपातील शिखराला पुलं ‘हिमगौरी’ संबोधतात आणि तिला पाहून त्यांना आपल्या ‘कन्याकुमारीची आठवण येते. ते म्हणतात,ही स्विस कन्याकुमारी आपल्या चिरयौवनाचे आव्हान देत एका महापर्वताच्या शिखरावर उभी, तर आमची भारतीय ‘युंगफ्राऊ’ आपल्या त्या भणंग प्रियकराच्या पायी सर्वस्व वाहण्याची समोरच्या महासागराच्या साक्षीने शपथ घेऊन युगानुयुगे तिष्ठत राहिलेली.” तसं पाहिलं तर पार्वती आणि युंगफ्राऊ दोघीही पर्वतकन्याच की! खरं सांगायचं तर हे साम्य मला जाणवले नव्हते आधी. पण या विचारामुळेच परदेशी युंगफ्राऊ मला जवळची वाटायला लागली. या लेखातले पुलंचे आल्प्सच्या भुयारी रेल्वे प्रवासाचे वर्णही खासच!

हंगेरी – माझा नवा स्नेही’ हा लेख खूपच आवडला मला. पुलं ह्या ठिकाणी बरेच दिवस राहिले. बहुतेक ते सांस्कृतिक आदान-प्रदान अंतर्गत तिथल्या सरकारच्या आमंत्रणामुळे गेले असावेत. अशा प्रकारच्या भेटी ७०/८० च्या दशकांत होत असत. मुख्यत: ह्या भेटी सोविएत गटातील देशांत होत असत. हंगेरीत पुलं अनेक ठिकाणी फिरले. छोट्या छोट्या गावांत फिरले. येथील नृत्य, नाटक, संगीत या संदर्भातल्या अनेक घटना पुलंनी या लेखात वर्णन केल्या आहेत. बुडापेस्ट कल्चरल सेंटर पाहून पुलं भारावले नसते तरच नवल. यात चित्र, शिल्प, नाट्य, संगीत, कळसूत्री बाहुल्यांचे खेळ अशा अनेक कला शिकण्याची सोय होती. तेथील नॅशनल लायब्ररीतले संस्कृत भाषा पंडित प्रोफेसर योशेफ बेकेर्डी यांनाही ते भेटले. अगदी खेड्यापाड्यातील कलाकारांनाही ते भेटले. हा लेख आपल्याला ‘हंगेरी या देशाचे दर्शन घडवतो. पण वाचकांनी हे आवर्जून लक्षात ठेवावे की हा पन्नास वर्षांपूर्वीचा ‘हंगेरी’ आहे. साम्यवादी विचारसरणीचा आणि रशियाची नियमावली पाळणारा हा देश होता तेव्हा. आजचा हंगेरी निश्चितच वेगळा आहे.

येथील बालातोन सरोवरात रवींद्रनाथ टागोरांचा पुतळा आहे. ही माहिती मी अमृता प्रीतम यांच्या ‘रसीदी टिकट’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकातही वाचली होती. १९२० साली रवींद्रनाथ बालातोन सरोवराजवळ गरम पाण्याचा झरा आहे, तिथे औषधोपचारासाठी आले होते. प्रकृती सुधारल्याच्या कृतज्ञतेपोटी त्यांनी तिथे लिंडन वृक्षाचे रोप लावले. तिथे जवळच उभारलेल्या रवींद्रनाथांच्या पुतळ्यापाशी त्यांची कविता आणि त्या ओळींचा  हंगेरियन भाषेत केलेला अनुवाद कोरला आहे. याच ओळींचा ‘रसीदी टिकट’ मध्ये दिलेला अनुवाद इथे देण्याचा मोह मला आवरत नाही. पुलंनी केलेल्या अनुवादापेक्षा हा अनुवाद सरस आहे.

                                        बालातोन येथील रवींद्रनाथ टागोर यांचा पुतळा 

ज्यावेळी मी या पृथ्वीवर नसेन

त्यावेळीही माझा हा वृक्ष

तुमच्या वसंत ऋतूला नवी पालवी देईल

आणि रस्त्याने जाणाऱ्या पांथस्थांना सांगेल,

की एका कवीने या भूमीवर प्रेम केलं होतं.

रवींद्रनाथ टागोर

(अनु.-मुरलीधर शहा)

या पुस्तकातील आणखी दोन लेख अमेरिकेवर आहेत. ‘मि.सॅनफ्रान्सिस्को’ आणि ‘एक बेपत्ता देश.

सॅनफ्रान्सिस्को’ शहरावरचा लेख फार सुंदर आहे. मी हे शहर पाहिले नसल्याने एकदा तरी हे शहर पहावे असे नक्कीच वाटले. येथल्या प्रचंड पुलांचे वर्णन, तेथील संध्याकाळच्या दिव्यांची किमया, तिथला तो रोदँचा ‘थिंकर हा जगप्रसिद्ध पुतळा! (मूळ पुतळा माझ्या माहितीप्रमाणे लूव्र म्युझियम मध्ये आहे.) तेथील रहिवाशांनी प्रेमाने जतन केलेली ट्राम, तेथील केबल कार, तेथील नाट्यगृहे, जगभरातील खाद्यपदार्थ खिलवणारे तेथील रेस्तराँ – ह्या सर्वामुळे पुलं ह्या शहराच्या प्रेमात पडले. त्यांच्या मते, हे शहर आपल्याला बिघडवून टाकते, धुंद करते, आणि यासाठी कोणत्याही अंमली पदार्थाची गरज नसते. येथील विविध देशांतील खाद्यपदार्थ देणारी उपाहारगृहे, नाट्यगृहे, सिनेमागृहे, इथल्या ‘वायनरी’, शहरालगतचा सागर तीर आणि या शहराचे हवामान हे देखील इथल्या रहिवाशांना वरदानच आहे. पुलंसारख्या एका रसिक व्यक्तीला जे आवडेल ते इथे आहेच. त्याचप्रमाणे इथली दोन महत्त्वाची विद्यापीठे बर्कले आणि स्टॅनफोर्ड ही देखील ह्या शहराची शान आहेत. खरंतर वाचकांनी हा लेख मुळातूनच वाचावा इतका मस्त आहे.

‘एक बेपत्ता देश हे ‘सॅनफ्रान्सिस्को’सारखे शहर असलेल्या देशाचे वर्णन आहे, हे पचायला जड जाते. अमेरिकेतील व्यसनाधीनता, वृद्ध लोकांचे एकटे जीवन, तरुणाचे बेछूट जीवन, बेताल लोकांच्या हातात असलेली शस्त्रे – त्यामुळे निर्माण झालेल्या समस्या, मरणे स्वस्त पण जगणे महाग असलेला हा देश – पुलंना बेपत्ता का वाटला हे लेख वाचूनच उमजेल.

तर असे हे ‘जावे त्यांच्या देशा हे पुस्तक. रसिकांनी पुन्हां एकदा वाचायला, चाळायला हरकत नाही. आपल्याला आलेले अनुभव एकदा पुलंच्या आठवणींसोबत पडताळून पाहावेत. वाचताना पुलंनी हे देश पन्नास वर्षांपूर्वी पाहिलेत हे मात्र ध्यानात ठेवावे. एक कलासक्त, रसिक माणूस कोणत्याही गोष्टीकडे, जागेकडे, अनुभवाकडे कशा रीतीने पाहतो हे उमगेल. आणि ही उमजही आपल्याला समृद्ध करून सोडेल.

स्नेहा केतकर

10 comments:

  1. अतिशय रंजक माहिती!

    ReplyDelete
  2. Very very interesting , after all pu la is pu la.

    ReplyDelete
  3. Very good article

    ReplyDelete
  4. Khupach chhan interesting

    ReplyDelete
  5. I have been to all the places he has written about. So can relate very well the description and humor both. He had been the great writer and Sneha, you have expressed his great writing profoundly!!

    ReplyDelete
  6. Though I have read this book some 10 15 Times and it is in there in my book collection ;Sneha;u r writing made my understanding better and gave me new insight to view this writing. Really a good article.

    ReplyDelete
  7. सुरेख..एक मस्त जमून आलेला ब्लॉग..छान काहीतरी वाचल्याचे समाधान देणारा लेख!

    ReplyDelete
  8. Very interesting article, just like P L. I am so thrilled that I purchased the book. Jave thyanchya Desha. 😚😊

    ReplyDelete
  9. खूपच छान 🤗

    ReplyDelete

Share your views also ---