Thursday, 10 August 2017

इस मोड से जाते हैं.......

                        इस मोड से जाते हैं,
                        कुछ सुस्त कदम रस्ते,
                        कुछ तेज कदम राहें.............

गुलझार यांनी लिहिलेले हे गाणे! १९७५मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आंधी' सिनेमातील. खूप गाजलेला सिनेमा. त्यातील आशयासाठी, अभिनयासाठी आणि गाण्यांसाठी सुद्धा! हे गाणे मी अनेकदा ऐकलंय आणि पाहिलंय. अप्रतिम संगीत, आणि तितकेच सुंदर चित्रीकरण. संजीवकुमारच्या चाहत्यांना  त्याचा उमदा, खट्याळ चेहरा मोहवून जातो.

पण कधी कधी अनेकदा ऐकलेली गाणी खूप वर्षांनी उमजतात आपल्याला. आज सहज हे गाणे डोळे मिटून ऐकत होते आणि गुलझार यांच्या शायरीच्या परत प्रेमात पडले. या संपूर्ण गाण्यात रस्त्यांचे वर्णन केले आहे. कसे आहेत हे रस्ते?

                        कुछ सुस्त कदम रस्ते,
                        कुछ तेज कदम राहें.............

वळण घेऊन येणारे हे कधी रस्ते असतात तर कधी राहें. प्रासादतुल्य घरे असोत, देखणी घरकुले असोत किंवा छोटे घरटे असो!  यांच्याकडे आपल्याला हे रस्तेच तर घेऊन जातात ना?

एखादा रस्ता वादळातून पार करावा असा. तर एखादा हळूच नजरेच्या टप्प्यात येऊन मनाला मोहवून जाणारा.
कधी रस्ता दुरून दिसतोय, जवळ येतोय असं वाटतं, पण अचानक दिशा बदलून तो वळतो. एखादा रस्ता एकदम निर्मनुष्य. ज्याच्यावर जीवनाच्या, जगण्याच्या काहीच खुणा नाहीत असा. हा रस्ता कुठे जातोय, कुठून येतोय हेच कळत नाही.

वाट कशाही असल्या, मोठ्या, छोट्या, उंच-सखल, रुंद-अरुंद, कधी जिवंत, कधी आल्हाददायक, कधी मृतवत, कधी त्रासदायक, तरीही यापैकी मला तुझ्यापर्यंत घेऊन जाणारी एखादी वाट असेलच ना?

गाण्याचा अर्थ मनाला अगदी भिडला. आयुष्य जगण्याची खरी मजा आहे, जर आपल्यावर प्रेम करणारे कुणी असेल. कुठॆतरी, एखाद्या छोट्या घरकुलात वाट पाहणारे कुणी असेल.

तरुण असताना, जसे आपण बेभान होऊन चालत असतो, काहीतरी मिळवण्यासाठी, काही जिंकण्यासाठी. पण असे करताना, प्रत्येकानेच या प्रेमाच्या रस्त्याचाही शोध घेत राहायला हवा. खरे ना?

                        इक राह तो वो होगी,
                        तुम तक जो पहुचती है ....  
                        इस मोड से जाते है..........

https://www.youtube.com/watch?v=STOM6NZfcrs



स्नेहा केतकर.

Saturday, 13 May 2017

Cuddly

तुम्हांला IOT म्हणजे काय हे माहिती आहे? अहो, म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स! अगदी सोप्या शब्दांत सांगायचे, तर आता आपल्या घरात असणारी छोटी, छोटी उपकरणे आता आपल्या स्मार्ट फोन सारखी 'स्मार्ट' होणार आहेत.
म्हणजे बघा हं, तुम्ही घरात शिरलात की तुमच्या हॉलमधला दिवा लागेल. तुम्हांला हव्या त्या वेगाने पंखा लागेल. AC असला, तर AC लागेल. तुमचं आवडतं संगीत घरात वाजू लागेल. तुमचं रात्रीचं जेवण जर फ्रीज मध्ये असेल, तर त्याच compartment मध्ये ते कमी थंड झाले असेल. मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये असेल, तर गरम झाले असेल.इ.इ.
सध्याची तरुण पिढी या विचारांनी भारली आहे अगदी! अशीच एक मुलगी आपल्याला भेटते, cuddly या शॉर्ट फिल्ममध्ये! तिने म्हणजे तिच्या कंपनीने एक पाळणा/झुला तयार केलाय. अर्थात त्याला पाळणा म्हणायला ती तयार नाही. कारण त्याचे नाव कंपनीने ठेवलंय cuddly!
लहान मुले आणि आईच्याही सोयीसाठी बनवलेला हा पाळणा. याला चाके आहेत. यामुळे आई बाळाला घेऊन कुठेही फिरू शकते. यात बाळासाठी सर्व उत्कृष्ट दर्जाच्या गोष्टी वापरल्या आहेत. त्याला कोणताही त्रास होऊ नये म्हणून काळजी घेतली आहे. यातील गादी अगदी मऊ आहे. बाळाला हवा तसा आकार घेणारी आहे. बाळाला आरामदायी असणाऱ्या सर्व गोष्टी यात आहेत. सुमारे ४० भाषांतील अंगाई गीते यात रेकॉर्ड केली आहेत. भाषा निवडली की त्या भाषेतील मधुर स्वरातील अंगाई गीत चालू होईल. आणि बाळाला गाढ झोप लागेल.
आपल्या कंपनीच्या या अभिनव प्रोडक्टची माहिती मुलगी आईला देत असते. आईला अर्थातच अनेक प्रश्न पडत असतात. पण मुलगी या नव्या प्रोडक्टने भारलेली असते. बोलता बोलता, ती थकून आईच्या मांडीवर डोके ठेवते. आई प्रेमाने तिच्या डोक्यावरून, केसांतून हात फिरवत रहाते आणि आपले प्रश्न मुलीला विचारत असते. पण दोनच मिनिटांत ती मुलगी गाढ झोपी जाते.
फिल्म ही एवढीच. जेमतेम पाच मिनिटांची. पण खूप काही सांगून जाणारी. स्मार्ट फोन उराशी कवटाळणारी ही आजची पिढी, प्रेमाच्या, मायेच्या ओलाव्याला दुरावलीय का? सुंदर साडी नेसलेला फोटो मुलीने पाठवल्यावर, तिला मिठीत घ्यावंसं नाही वाटत का आपल्याला? की thumbs up केले की आपल्या भावना पोचतात तिला? स्पर्श करणे, मुलांना जवळ घेणे म्हणजे लाड असतात की प्रेम दाखवण्याची एक पध्दत? बाळाला कुशीत घेणे, कडेवर घेणे हा कोणत्याही आईसाठी अगदी परमोच्च आनंदाचा क्षण. पण हा आनंद हरवला तर जाणार नाही ना, अशी भीती ही फिल्म पाहिल्यावर वाटते. 'मदर्स डे' च्या मिनित्ताने तयार केलेली ही फिल्म तशी जुनीच आहे. पण यातील भावना मात्र गेल्या वर्षी काय, या वर्षी काय, किंवा पुढच्या वर्षी काय, जुन्या न होणारया! बरंच काही सांगणाऱ्या आणि बरंच काही विचारणाऱ्या!
https://www.youtube.com/watch?v=XxlujFhJUAo
1.      

स्नेहा केतकर

Sunday, 26 June 2016

मैं कासे कहुं ...........

मैं कासे कहुं ...........

काही काही गाणी मनात घर करून राहतात. हे गाणं असंच !!!!!
माई री, मैं कासे कहुं पीर अपने जियाकी.....................
जिवाची तगमग होतेय, काहीतरी सांगावसं वाटतंय, पण कसं सांगू? अगदी जन्मदात्या आईलाही सांगावं की नाही असा प्रश्न पडतोय!

मला लहानपणापासून हे गाणे अतिशय आवडायचं. सूर मन भारून टाकायचे आणि हुरहूरही वाटायची. गाणे ऐकताना त्यातील आर्तता जाणवायची पण शब्दांचा अर्थ लागला तरीही गाणे पूर्णत्वाने समजले असे वाटायचे नाही.

'दस्तक' या सिनेमातील हे गाणे! मजरूह सुलतानपुरी यांचे शब्द, मदन मोहन यांचे अप्रतिम संगीत आणि तेवढाच अप्रतिम लताचा आवाज! हा सिनेमा आला तेव्हा मी शाळेत होते. 'फक्त प्रौढांसाठी' असलेला हा सिनेमा मी पाहण्याचा प्रश्नच नव्हता. रेहाना सुलतान, संजीवकुमार आणि मदनमोहन यांना या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. माझा आणि या सिनेमाचा संबंध यांतील गाण्यांसाठी होता. या चित्रपटातील सर्वच गाणी लाजवाब! पण 'माई री ' हे गाणे मात्र कळूनही मला कळत नव्हतं. याच गाण्यात म्हटल्याप्रमाणे 'पाकर भी नहीं, उनको मैं पाती' असं वाटायला लावणारे!

काही महिन्यांपूर्वी अचानक 'दस्तक' हा सिनेमा दूरदर्शनवर लागला. यांतील गाण्यांसाठी हा सिनेमा पाहायला बसले. मुंबईतील एका भागात संजीवकुमार आणि रेहाना सुलतान हे नवीनच लग्न झालेले जोडपे राहायला येते. ज्या घरात ते राहायला येतात, त्या घरात पूर्वी एक गाणारी बाई राहत असते. (म्हणजे तवायफ किंवा वेश्या). आसपासच्या लोकांना रेहाना पण तशीच आहे असं वाटतं. घरावर सतत कोणीतरी थाप देतं. खिडक्यांतून अनेक डोळे रोखले आहेत असं या जोडप्याला वाटत रहाते. साहजिकच या तरुण जीवांची कुचंबणा होते.गाण्याची आवड असून गायला तिला सक्त मनाई केली जाते.

'ना तडपने की इजाजत है ना फरियाद की है, घुट के मर जाउं, ये मर्जी मेरे सैयाद की है'

असं व्याकुळ होऊन म्हणत, तंबोरा उराशी कवटाळून ती तरुणी रडते. आणि हे गाणे सुरु होते. त्या दोघांची शारीरिक आणि मानसिक कुचंबणा व्यक्त करणारे!!!!

या नवविवाहित दाम्पत्याला एका घरात राहूनही एकमेकांजवळ येता येत नाही. ' पडी नदिया के किनारे मै प्यासी ' असी दोघांची गत झाली आहे. या गाण्यात जोरजोरात वाजणाऱ्या घंटा आणि सुसाट धावत सुटलेली रेहाना हे दृश्य पडद्यावर पाहताना अंगावर काटा येतो. धावत धावत एका कड्याच्या टोकाशी ती येते. परत मागे फिरून समुद्राच्या दिशेने धावत सुटते. शरीराचा हा आवेग तिला सहन होत नाहीये! घुसमटण्याची परिसीमा झाली आहे.

रेहाना सुलतानचे पाण्याने भरलेले डोळे, कासावीस होऊन तिचे तंबोरयाला कवटाळणे, नकळत गाण्याच्या ओळी ओठांवर आल्या आल्या कोणीतरी खालून आवाज करणे आणि भयभीत होऊन तिचे थरथरणे !!
हे सर्व पाहताना या गाण्याचा अर्थ मला कळला. आईलाही सांगू शकता येणार नाही अशी ही घुसमट!
आतापर्यंत मनाला भिडणाऱ्या सुरांतून अर्थही उलगडू लागला.

'ओस नयन की उनके मेरी लगी को बुझाए ना, तन मन भिगो दे आके ऐसी घटा कोई छाए ना,
मोहे बहा ले जाए ऐसी लहर कोई आए ना ,पडी नदिया के किनारे मै प्यासी !!!'

त्याच्या डोळ्यातल्या दवबिंदुंनी माझे समाधान होत नाही, माझ्या तनमनाला कवेत घेईल अशी कोणती लाट येत नाही, सर्वस्व उधळून द्यावे असा क्षण अजूनही येत नाही, ....................

एका स्त्रीच्या अतृप्त लैगिक इच्छेचे इतके अचूक वर्णन आणि तेही कुठेही मर्यादा न सोडता व बीभत्स न वाटता केलेले मी आजपर्यंत पाहिलेले /वाचलेले नाही. एक माणूस म्हणून तिच्याकडे पाहिल्याने ते चूकही वाटत नाही. हातात तंबोरा असून वाजवायचे नाही, गळ्यात सूर असून गायचे नाही आणि प्रियकर जवळ असूनही त्याच्याजवळ जायचे नाही अशी विलक्षण केविलवाणी अवस्था या गाण्यातून व्यक्त होते.

या गाण्याचे शब्द, संगीत, स्वर, अभिनय आणि चित्रीकरण यांचा एकत्रित अनुभव म्हणजे एक विलक्षण अनुभूती आहे. काळाच्या ओघात टिकणारी ती श्रेष्ठ कला असे म्हणतात. हे गाणे म्हणजे अशीच एक कलाकृती आहे.

----------------------------------------------

Wednesday, 11 May 2016

साहिर !!!!


पोछ्कर अश्क अपनी आंखोसे, मुस्कुराओ, तो कोई बात बने,
सर झुकानेसे कुछ नहीं होगा, सर उठाओ तो कोई बात बने,

"नया रास्ता" या नावाचा एक सिनेमा ४०/४५ वर्षांपूर्वी आला होता. या सिनेमातील हे गाणे ! अगदी नकळत्या वयात कानांवर पडलेले ! पण त्या वेळीही मनाला भिडलेले !

रंग और भेद जात और मझहब, जो भी हो आदमी से कमतर हैं
इस हकीक़त को तुम भी मेरी तरह मान जाओ तो कोई बात बने,

या गाण्यातून कवीला चांगला संदेश, वेगळा संदेश द्यायचा आहे एवढे मला तेव्हा ही कळले.
गाणे आवडले की लिहून ठेवायची माझ्या आईची सवय होती. सुरुवातीला अनुकरण म्हणून केलेला हा उद्योग मला पुढे खूप समृद्ध करून गेला. अशीच आवडलेली गाणी लिहिता लिहिता, मी त्याखाली कवी, संगीतकार, गायक आणि सिनेमाचे नाव ही लिहू लागले. आणि या आवडलेल्या गाण्यांत साहिरचे नाव वारंवार येऊ लागले. या गीतकाराची जातकुळी वेगळीच आहे हे जाणवू लागले.

"नया रास्ता" मधील या गाण्यातही एका भेदाभेदरहित समाजाची कल्पना कवी करत आहे. वास्तव मान्य करणे महत्वाचे आहे तरच आपण ते बदलू शकतो. हक्क मागून मिळत नसतो, तो कधी कधी हिसकावूनही घ्यावा लागतो. तेवढी हिंमत आपल्याला दाखवावीच लागेल असे सांगणारी ही कविता !!!!! विचार करायला लावणारी गाणी ही साहिरची खासियत !

स्वातंत्र्यानंतरच्या काळात भ्रमनिरास झालेल्या तरुण वर्गाचे दर्शन त्याच्या "प्यासा" मधील कवितांतून दिसते.
जिन्हे नाझ हैं हिंदपर वो कहां हैं?
ये दुनिया अगर मिल भी जायें तो क्या हैं?

पैशाला पुजणार्या जगात तो एकटा पडतो.
जाने वो कैसे लोग थे, जिनके प्यार को प्यार मिला
असा प्रश्न त्याला पडतो.

साहिर हा साम्यवादी विचारसरणीचा होता. या त्याच्या विचारांचे दर्शन त्याने लिहिलेल्या गाण्यातूनही घडते. "फिर सुबह होगी" या चित्रपटातील त्याचे "वो सुबह कभी तो आयेगी" हे गाणे आठवते ना? नवे जग निश्चित येईल अशी आशा त्याला होती. "नया दौर" या सिनेमातील "साथी हाथ बढाना" हे गाणे नव्या जगाची दिशा दाखवते. त्याचा आशावाद अगदी साध्या सोप्या शब्दांत व्यक्त करते.

आशावाद जागवणारा साहिर कधी कधी मात्र नैराश्येच्या गर्तेत जातो.
जाये तो जाये कहाँ, समझेगा कौन यहाँ, दर्दभरे दिल की जुबाँ
असे व्याकुळतेने विचारतो.

अशा निराशावादी साहिरनेच -
आगे भी जानेना तू, पिछे भी जानेना तू, जो भी हैं बस यहीं एक पल हैं
असे आशावादी गीत ही  लिहिले आहे.

रात जितनी भी संगीन होगी, सुबह उतनीही रंगीन होगी - असा धीर ही दिला आहे.

प्यार पर बस तो नहीं हैं मेरा, लेकीन फिर भी,
तू बता दे के तुझे प्यार करूं, या ना करूं,
प्रेयसीला विचारून, तिच्यावर प्रेम करणारा हा कोमल हृदयाचा प्रियकर ! आजच्या काळात मैत्रिणीने 'नाही' म्हटल्यावर तिला भोसकणारा, तिचा खून करणारा प्रियकर - या पार्श्वभूमीवर साहिरचे हे हळवेपण उठून दिसते.

काही गाण्यांत त्याची मते इतक्या परखडपणे व्यक्त होतात की अंगावर काटा येतो. "साधना" सिनेमातले "औरत ने जनम दिया मर्दों को" हे असेच एक गाणे ! समाजाचे किळसवाणे रूप कठोरपणे साहिर समाजासमोर आणतो.
मर्दों ने बनाई जो रस्में, उनको हक़ का फर्मान कहा,
औरत के जिंदा जलने को, क़ुर्बानी और बलिदान कहा,
इस्मत के बदले रोटी दी, और उसको भी एहसान कहा
ये वो बदकिस्मत माँ हैं जो, बेटों की सेज पे सोती हैं

पुरुषांनाच काय पण स्त्रियांनाही त्यांच्या जगण्याची जाणीव करून देणारे हे काव्य !

ही कविता मी ऐकली आणि अंतर्बाह्य हादरून गेले. एका पुरुषाने जाणलेले स्त्रियांचे दुःख, त्यांच्या अस्तित्वाची वेदना याहून प्रखरपणे व्यक्त होऊच शकत नाही.

साहिर हा अशा अनेक रुपांत भेटत रहातो. मलाच काय पण अनेकांना आयुष्य समजावत रहातो. धर्माविषयीही त्याची परखड मते होती. "धूल का फूल" मधले त्याचे प्रसिद्ध गाणे आठवते ना?

तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इन्सान की औलाद हैं, इन्सान बनेगा

साहिर हा मानवतावादी होता. कोणताही धर्म हिंसेची शिकवण देत नही यावर त्याचा दृढ विश्वास होता. त्याने लिहिलेली भजने ऐकली की भारतीय संस्कृती त्याच्या रगारगात भिनली होती हे जाणवते.

अल्ला तेरो नाम, ईश्वर तेरो नाम, सबको सन्मती दे भगवान

साहिर जाऊन अनेक वर्षे झाली पण अजूनही तो भेटतच असतो.
रहें ना रहें हम, महका करेंगे,
बनके कली, बनके सबाँ, बाग ए वफा में

त्यानेच म्हटल्याप्रमाणे त्याची गाणी मनामनात दरवळत आहेत आणि राहतील. विचारांना दिशा देतील.

------------------------------------

Sunday, 10 August 2014

सरहद्द अशीही !!!!

कोणत्याही देशाची सीमा बघणे हा एक रोमांचक अनुभव असतो. मी पाहिलेली पहिली ‘सरहद्द’ म्हणजे अमेरिका आणि कॅनडा! “या विंडसर नदीच्या पलीकडे कॅनडा.” असे मला सांगितले, तेव्हा मी अगदी आश्चर्यचकित झाले. म्हणजे तसे फारसे काहीच बदलत नाही भौगोलिक परिस्थितीत! पण तरीही बाकी परिमाणे बदलतातच.
आपल्या मनात ‘बॅार्ड़र’ ‘सीमा’, ‘सरहद्द’ असे म्हटले की, वेगळ्याच भावना येतात आणि डोळ्यांसमोर येते ती भारत-पाकिस्तान सीमारेषा! ६७ वर्षांनंतर देखील ही सीमारेषा धगधगत आहे. तिसऱ्याच देशाच्या माणसाने नकाशावर रेघ काढून केलेले हे विभाजन अजूनही वेदना देते आहे.
बहारिन आणि सौदी अरेबिया या देशांची सरहद्द पाहीली. बहारिन हा नकाशातला चिमुकला ठिपका! सौदी अरेबियाच्या आधी इथे तेल सापडले. पण सौदीच्या राजांनी बहारिनच्या राजाशी करार करून त्यांना मोठ्या प्रमाणावर तेल न काढण्यास सांगितले. त्याची आर्थिक भरपाई अर्थातच सौदी राजे करतात. बहारिन व सौदी दरम्यान समुद्र आहे. तिथे मोठा पूल बांधून आता गाडीने सौदी अरेबियात वा तिथून बहारिन मध्ये जाणे-येणे करता येते. एकूण हा देखील अमेरिका-कॅनडा सारखाच मैत्रीचा मामला आहे.
भारतालाही अनेक देशांच्या सीमा लागून आहेत. अरुणाचल येथे चीनची सीमा लागून आहे तर प. बंगालशी बांगलादेशची सीमा लागून आहे. म्यानमारची सीमा ही भारताला लागून आहे. पण या देशांतील राजकीय स्थिती लक्षात घेता, सहजासहजी जाणे-येणे आतापर्यंत तरी शक्य नव्हते. भारत-नेपाळ सीमेवर जाणे-येणे होत असते. पण ही सीमा पाहण्याचा योग मला अजून आलेला नाही. लडाखला गेलो असताना ‘पॅन गाँन्ग लेक’ चा पुढचा भाग चीनमध्ये येतो हे माहिती होते. पण त्या दिशेने आम्ही नजर फिरविली इतकेच! चीन चा भूभाग दिसणे शक्यच नव्हते.
सिंगापूरला राहत असताना आगगाडीने मलेशियाला जाण्याचा योग आला. पण सिंगापूर इतके लहान आहे की, आम्ही मलेशियात कधी प्रवेश केला ते कळलेच नाही. आसपास हिरवीगार शेती दिसायला लागली आणि सीमा ओलांडल्याची जाणीव झाली.
स्वित्झर्लंड येथे झरमॅट या गावी गेलो असताना, “या डोंगराच्या पलीकडे इटलीची सरहद्द आहे” असे आमच्या बरोबरच्या स्विस जोडप्याने आम्हांला सांगितले. आणि गमतीत पुढे म्हणाले, “ह्या बाजूला अगदी शिस्तशीर वातावरण असते. पण स्कीईंग करत इटलीत गेल्यावर तिथे भारतासारखा गडबड-गोंधळ असतो. लोक गाणी गात असतात, नाचत असतात. आम्हालाही छान वाटते. तिथे थोडा वेळ काढून मग आम्ही परत इथे येतो.” यूरोपातल्या या जवळ जवळ असलेल्या सरहद्दीचे प्रथम आश्चर्य वाटते, आणि मग लक्षात आले की, जेव्हा आपण बंगलोरहून दिल्लीला जातो तेव्हा युरोपच्या हिशेबाने ४-५ देश ओलांडूनच जातो की!!
यावेळी मात्र आम्हाला अचानक एक सरहद्द मैलोगणती पाहायला मिळाली. आम्ही इराण मधील तब्रिझ या गावी गेलो होतो. इराणच्या उत्तरेला हे शहर येते. हजार वर्षांपूर्वीच्या “सिल्क रूट” वरचे हे महत्वाचे ठिकाण! तब्रिझहून दोन तासांच्या अंतरावर जोल्फा हे गाव आहे. या गावातून अरास नदी वाहते. या अरास नदीच्या पलीकडे अझरबैजान आहे. म्हणजे ही पूर्वीच्या रशियाची हद्द! मी अवाक् होऊन पाहतच राहिले. दोन्ही बाजूला बोडके डोंगर आणि मधून वाहणारी ही अरास नदी! दिवसभर आम्ही एक प्राचीन चर्च, एक धबधबा आणि खोराश पास येथला हमाम पाहण्यासाठी गाडीतून भटकत होतो. अरास नदीच्या काठानेच रस्ता जात होता. पलीकडे सतत अझरबैजानचे डोंगर दिसत होते. जोल्फाहून अझरबैजानला ट्रेनने जाता येते. दोन्ही देशांच्या दरम्यानचा “iron bridge” ही आम्ही पाहिला. पण “बॅार्ड़र” म्हटल्यावर जे चित्र डोळ्यांसमोर येते, सैनिक-चौक्या, तारेचे कुंपण असे काहीही इथे नव्हते. आजची ही शांत सरहद्द पाहून बरे वाटले. कारण काही काळापूर्वी ही सरहद्दही धगधगत होती. मला एकदम साहिरचे गाणे आठवले 

मालिक ने हर इन्सान को इन्सान बनाया, हमने उसे हिंदू या मुसलमान बनाया
कुदरत ने तो बख्शी थी हमें एक ही धरती, हमने कहीं भारत कहीं इरान बनाया

साहिरच्या गाण्याशी सहमत होत, खळखळ करीत चाललेली अरास नदी दोन्ही तीरांवर हिरवळ फुलवत होती. अशीच शांतता सर्व सरहद्दीवर असावी अशी आजच्या काळात अशक्य वाटणारी इच्छा करत आम्ही अझरबैजानच्या सरहद्दीचा निरोप घेतला.
मनात मात्र साहिरचेच शब्द होते.............अजूनही तो सगळ्यांना सांगतोच आहे............

नफरत जो सिखाये वो धरम तेरा नही है
    इन्साँ को जो रौंदे वो कदम तेरा नही है.......
***********************

Sunday, 27 April 2014

रस्किन बाँन्ड

रस्किन बाँन्ड

रस्किन बाँन्ड या लेखकाची आणि माझी ओळख तशी ‘उशीरा’ झाली. ‘उशीरा’ म्हणजे रस्किन बाँन्ड यांच्या कथा प्रामुख्याने लहान मुलांसाठी वा लहान मुलांच्या असतात. पण त्यांची – माझी भेट माझ्या चाळीशीत झाली. अर्थात भेट व्हायला कारण माझाच लहान मुलगा होता. आमच्या पुस्तक भिशीत रस्किन बाँन्डचे पुस्तक पाहिल्यावर तो म्हणाला, “ए आई, या लेखकाची एक कथा आमच्या पुस्तकातही आहे. छान आहे.”
मुलाच्या शिफारसीने पुस्तक हातात घेतले, आणि कथांमागून कथा वाचताना मी त्यात कधी गुंगून गेले, मला कळलंच नाही. कथा इंग्रजीत होत्या पण मराठीत असाव्या त्याच पद्धतीने, तशाच आपुलकीने मनाला भिडल्या.

रस्किन बाँन्डचा जन्म भारतातलाच! जामनगर इथला! तेव्हा आपल्यावर ब्रिटीशांचे राज्य होते. रस्किनचे आजी-आजोबा, वडील, काका, सगळेच भारतात रहात होते. वडील रॉयल एअर फोर्स मध्ये होते. रस्किन लहान असतानाच त्याच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. रस्किनचे बालपण त्याच्या आजी-आजोबांजवळ देहरादून मध्ये गेले. रस्किनच्या कथांतील हिमालय वा तिथली गावे ही अशी चाळीस/पन्नासच्या दशकांतील आहेत. त्यामुळे या कथा वाचताना, आपल्याला एखादा जुना ब्लॅक आणि व्हाईट सिनेमा पाहिल्यासारखा वाटतो. जुना भारत डोळ्यांसमोर येतो.

सगळ्या गोष्टी हिमालयातल्या! तिथला निसर्ग जिवंतपणे डोळ्यांसमोर उभ्या करणाऱ्या! रस्किन बाँन्डच्या कथेतील निसर्ग हा त्यांच्या कथेत एक व्यक्तिरेखा म्हणूनही समोर येतो. रविवारी क्रिकेटची मॅच खेळताना रमलेली मुले, त्यांचे वडिल, गावातील इतर माणसे, समोर वाहणारी नदी, डोलणारी शेते, त्यातच मॅच पाहायला नदीतून काठावर आलेली मगर! आणि नंतर उडालेला गोंधळ! सगळेच लोभस आणि मजेदार वाटते. “दी चेरी ट्री” मध्ये रमत-गमत चालणारा राकेश, त्याचे आजोबा, त्यांची बाग हे सगळं वाचताना आपण त्यांच्यापैकीच एक होऊन जातो. जी.एं.ची शब्दकळा जशी प्रभावी आहे, तशीच रस्किन बाँन्डची ही आहे, पण लोभसवाण्या अर्थाने! रस्किन बाँन्डच्या कथेत रमायला आपल्याला आवडते. “Our Trees still grow in Dehra” – या कथेतून तर रस्किन बाँन्डचे सगळे आयुष्यच आपल्यासमोर अलगद उलगडते. कथेच्या शेवटी १५/२० वर्षांपूर्वी रस्किन बाँन्डने आणि त्याच्या वडिलांनी लावलेली झाडे आता बहराला आली आहेत, मोठी झाली आहेत. रस्किन त्यांना पाहतो आणि त्याला वाटतं, की त्या झाडांनी आपल्याला ओळखलं आहे. जणू ती त्याला प्रेमाने जवळ घेत आहेत. मुख्य म्हणजे हे नुसतेच लिहिणे नाही, ही भावना वाचताना ती आपल्याला आत खोलवर जाणवते!

रस्किन बाँन्डच्या कथांतून जाणवणारा वेगळा भाग म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाला तो काळ. तो काळ भारतीयांना आनंदाचा होता. पण ब्रिटीशांच्या जीवनातील प्रचंड उलथापालथीचा काळ होता तो! रस्किन बाँन्डच्या कथांत या काळाचे चित्रण आले आहे. त्यांच्या ‘’Escape from Java” या कथेतील वर्णन वाचून या काळाची कल्पना येते. दुसऱ्या महायुद्धात बेचिराख झालेला, आणि सिंगापूर, जपान, जावा येथून हरलेला इंग्लंड! या सर्व ठिकाणांहून परतणारे ब्रिटीश! “भारताला स्वातंत्र्य मिळाले की आपल्याला भारत सोडावा लागेल. कारण माझी नोकरी जाईल” असे वडिलांनी सांगितल्यावर रस्किन विचारात पडतो. कारण तोपर्यंत भारतातच वाढलेल्या रस्किनला इंग्लंडच परका देश होता.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर रस्किनच्या वडीलांचे मलेरियामुळे निधन होते. आजी आजोबांबरोबर रस्किन बाँन्डला इंग्लंडला जावे लागते. तिथे रस्किन बाँन्ड काही वर्षे राहिले पण रमले मात्र नाहीत. त्यावेळच्या आठवणी लिहिताना, रस्किन म्हणतो, की, “मी अबोल होतो, हे मला इंग्लंडला येईपर्यंत कळलेच नव्हते. कारण भारतात असताना ही गोष्ट मला कधी जाणवलीच नाही.” त्यांच्या कथांत अनेकवेळा गाडीचा प्रवास, बसचा प्रवास याची वर्णने आली आहेत. बोलले नाही तरीही संभाषणात दुसऱ्याला नकळत ओढून घेणारी अनेक भारतीय माणसे त्यांच्या मनात घर करून होती, हे जाणवते.

शिक्षण संपल्यावर मग तरुण रस्किन भारतात परत आले आणि मग ते इथेच राहिले. आज सत्तरीच्या घरात असलेले रस्किन बाँन्ड भारतीयांहूनही अधिक भारतीय आहेत. भारताच्या साहित्य जगताशी निगडीत आहेत. आज राजदरबारी आणि साहित्य जगातही त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या दोन कादंबरीवर सिनेमेही निघाले आहेत. मला तर असं वाटतं, की ते पहिले भारतीय लेखक आहेत जे इंग्रजीतून लिहितात!!!

तुम्ही वाचल्या आहेत का रस्किन बाँन्डच्या कथा? नसतील वाचल्या तर जरुर वाचा आणि परत आपल्या बालपणीचा निरागसपणा अनुभवा!!!
*******************

Thursday, 20 February 2014

अज़नबी शहर के

साधारण तीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. लग्न करून मी एका वर्षाकरिता अमेरीकेला गेले. मुंबईतल्या लहानशा उपनगरातून एकदम अमेरिकेतील डेट्रॉईट शहर हा मोठाच बदल होता माझ्यासाठी! नवे शहर, नव्या पद्धती! घर मिळवणे, सजवणे आणि घरातील सगळी कामे करणे. या नव्या जीवन शैलीशी जुळवून घेतानाच एकदा एका मित्राच्या घरी एक गाणे/गज़ल ऐैकली.

अज़नबी शहर के, अज़नबी रास्ते, मेरी तनहाई पर मुस्कुराते रहे
मै बहोत देर तक यूंही चलता रहा, तुम बहोत देर तक याद आते रहे

गझल एकदम आवडून गेली. जणू माझेच विचार या गाण्यात मांडले आहेत असं वाटलं. तसे पाहिले, तर मी तिथे मजेतच होते. सगळे नवे अनुभव असोशीने घेत होते. गाडी चालवायला शिकणे, गाडी चालविणे या पासून ते नवे मित्र-मैत्रिणी जोडणे – या सगळ्याच गोष्टींची मजा मी घेत होते. पण तरीही कधी कधी एकदम एकटं वाटायचं. त्यावेळी भारतात फोन करणे, म्हणजे खूपच महाग होते. त्यात माझ्या माहेरी फोन ही नव्हता. आजच्यासारखे मेल, स्काईप असे काहीच नव्हते तेव्हा! शिवाय घरात सतत काम करावे लागायचे. दोनच माणसे! पण तेव्हा तो स्वैपाकही मला करताना मोठं कामच वाटायचं. आणि भाजी आणण्यापासून ते जेवण झाल्यावर भांडी घासण्यापर्यंत सगळं आपणच करायचं.

ज़िंदगी भी हमें आज़माती रही, और हम भी उसे आज़माते रहें

अशी स्थिती होती.

डेट्रॉईटमध्ये winter सुरु झाला आणि अधिकच नैराश्य आले. बाहेर जाणे कमी झाले. आणि गेलो, तर फक्त कामासाठीच! मुख्यतः कपडे धुण्यासाठी! आजच्यासारखे तेव्हा घराघरात washer/dryer नव्हते. कपडे धुतल्यानंतर पुन्हा घड्या घालणे, इस्त्री करणे! ही न संपणारी कामे एखाद्या अजगरासारखी मला गिळून टाकतील असे वाटायचे. आणि ही कामे मीच करायची असेही मी मनात धरून चालले होते, त्यामुळे यातून सुटका नव्हती.

तीन वाजल्यापासून बाहेर अंधार दाटून यायचा! रस्त्याभोवती असलेले बर्फाचे ढ़ीग, बोडकी झाडे! सूर्य प्रकाश आपल्याला केवढी ऊर्जा देतो ते तेव्हा मला कळले. आणि या सगळ्या उदास वातावरणात कधी कधी ‘आपला’ वाटणारा नवरा, काही वादांमुळे क्षणात ‘परका’ होऊन जायचा. डोळे भरून यायचे आणि ते पुसायलाही कोणी मायेचं जवळ नसायचं!

ज़ख्म जब भी कोई ज़हन-ओ-दिल पर लगा, ज़िंदगी की तरफ इक दरिचा खुला
हम भी गोयां किसी साज़ के तार है, चोट खाते रहे, गुनगुनाते रहे


या गाण्याने अशी सतत साथ दिली तेव्हा! गाणी, पुस्तके आणि अमेरीकेतील टी.व्ही.ने अक्षरशः तारुन नेले मला या काळात!

आमचा प्रोजेक्ट संपला आणि आम्ही भारतात परतलो. त्यानंतरही अनेक नव्या देशात, नव्या शहरात आम्ही राहिलो. घरे केली आणि सजविली, मित्र-मैत्रिणी जोडले. पण या बदलांशी जुळवून घेताना मला तेवढा त्रास झाला नाही. मात्र ही गझल मधूनच आठवत रहायची.

ही ‘गझल’ आहे, म्हणजे जगजीत सिंगचीच असणार असे गृहीत धरून, हे गाणे मी गेले कित्येक वर्षे शोधीत होते. जगजीत सिंग चा नवा अल्बम आला की त्यातील गाणी तपासून पाहत होते. पण मला हे गाणे कुठेच मिळत नव्हते. आम्हाला दोघांनाही आवडणारे हे गाणे कुठे गेले, काहीच कळत नव्हते. ज्या मित्राकडे या गाण्याची कॅसेट होती, त्याचाही पत्ता नव्हता आमच्याकडे!

पण या नव्या तंत्रज्ञानाला मनापासून धन्यवाद! ”you tube” वर शोधूया, असं म्हणून हे गाणे शोधायला गेले तर एका मिनिटांत सापडले. गाणे पुन्हा पुन्हा ऐकले. डेट्रॉईटचे सगळे दिवस आठवले. गायक आणि कवी हे ‘सलमान अल्वी’ आहेत, हे समजले. अगदी एखादी जिवलग मैत्रीण, अनेक वर्षांनी भेटावी तसे मला वाटले. माणसांप्रमाणेच अशी गाणीही कधी कधी आपली सुहृद बनतात हे जाणवले.

सलमान अल्वींचा पत्ता काही मला माहित नाही. पण त्यांच्या गाण्यात म्हटल्याप्रमाणेच –

तुम बहोत देर तक याद आते रहे

तुम बहोत देर तक याद आते रहे


**************