Tuesday, 30 December 2025

‘धुरंधर’चा चमत्कार.

 

‘धुरंधर’चा चमत्कार.

१९९९ मधील IC814 विमान अतिरेक्यांनी कंदाहारला नेले तो प्रसंग! आपले परराष्ट्र मंत्री, Intelligence Bureau Chief यांच्याशी हातात बंदुकी घेऊन उन्मत्तपणे बोलणारे दहशतवादी! २००१ मध्ये झालेला आपल्या संसदेवरचा हल्ला! पुन्हा एकदा हताश झालेली सरकारी यंत्रणा. या पार्श्वभूमीवर सिनेमा सुरु होतो. या हताशा, निराशेचा अनुभव अनेकांना नुकत्याच झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरही आला असेल. दहशतवादी हल्ला होणं हे सरकारचे अपयश आहे कां? की आतंकवादाचा विजय आहे? नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियातील हल्ल्यानंतरही हेच प्रश्न विचारले जात आहेत.



‘धुरंधर’ ह्या सिनेमात या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला गेला आहे. पाकिस्तान सारखा एखादा देश वर्षानुवर्षे दहशतवादाला पोसूनही आंतरराष्ट्रीय पातळीवर मान उंचावून कसा काय राहू शकतो? ह्या आतंकवादाला पोसणारी यंत्रणा, यासाठी लागणारा अमाप पैसा, शस्त्रास्त्रे, आणि जीवावर उदार झालेली माणसे ही कशी काय जमवतो? ह्या प्रश्नांची उत्तरे अर्थात पाकिस्तानमध्ये आहेत, म्हणून सिनेमा पाकिस्तानात घडतो.



कराची शहरातील लीयारी भाग. १९४७ मध्ये भारतातून पाकिस्तानमध्ये गेलेल्या अनेक मुसलमानांनी ह्या भागात वस्ती केली. यात सिंध, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश अशा भारतातील वेगवेगळ्या भागातून आलेल्या मुसलमानांचा समावेश होता. धर्म मुस्लीम असला तरीही त्यांच्या भाषा, खानपान, चालीरीती भिन्न होत्या. याच भागांतून मुहाजिर कौमी मुव्हमेंट’ ही पाकिस्तानातील राजकीय पार्टी जन्माला आली. येथे पठाण, बलोच ह्या जमातीही होत्या. भारतातील घरदार सोडून पाकिस्तानात आलेल्या मुसलमानांना इथे जगण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. इथे अनेक छोटे गट निर्माण झाले. यांच्यात माऱामाऱ्या होऊ लागल्या. पाकिस्तानातील राजकीय पक्षांनी, राजकारण्यांनी येथील लोकांचा राजकारणासाठी वापर करायला सुरवात केली.


                     कराचीतील (खराखुरा) लीयारी भाग

अर्थात हे भारतातही चालतेच. ‘कंपनी या रामगोपाल वर्मांच्या चित्रपटात मुंबईचा अशाच तऱ्हेचा तोंडावळा समोर आणला आहे. ‘सरकार’ आणि ‘सरकार-२’ यातही राजकारणी, गुन्हेगारी जगत यांची साठगाठ दाखवली आहे. मात्र भारतातील व पाकिस्तानातील परिस्थितीत फरक आहे. या गँगस्टर्सना राजकीय नेतृत्वाने एका मर्यादेपर्यंतच मोठे होऊ दिले. दाऊद सारख्या देशविरोधी कारवाया करणाऱ्या गँगस्टरला भारताबाहेरच अनेक वर्षे राहावे लागत आहे.

पाकिस्तानने मात्र ह्या सर्व समाजविरोधी तत्वांची मदत घेऊन ती भारतविरोधी कारवायात वापरली. अफगाणिस्तानात अमेरिकेने रशिया विरुद्ध लढण्यासाठी शस्त्रास्त्रांचा प्रचंड साठा उपलब्ध करून दिला. रशियाच्या सैन्याची शस्त्रास्त्रे होतीच. ह्या सर्व शस्त्रास्त्रांचा वापर पाकिस्तानने भारतविरोधी कारवायात केला. अल कायदा आणि इतर अनेक मुस्लीम लष्करी चळवळींचे संगोपन ह्याच भागात झाले. पाकिस्तानच्या लष्कराने अफगाणिस्तान मधील अस्थिर स्थितीचा सतत फायदा उठवला. ‘धुरंधर’ सिनेमात पाकिस्तानमधील वेगवेगळे गट, (बलोच, मुहाजिर, पठाण, पंजाबी) या गटांचे नेते, पकिस्तानी ISI आणि सीमेपलीकडील, मुख्यत्वे अफगाणिस्थानातील लढवय्ये गट – अशा सर्वांच्या मिश्रणातून तयार झालेल्या, आणि केलेल्या दहशतवादाचे चित्रण आहे. भारतातील ऐंशी, नव्वद आणि त्यानंतरच्या आतंकवादी हल्ल्यांची आठवण केली तर ह्या गोष्टींची संगती लागेल.

‘धुरंधर’ फारसे भाष्य न करता अनेक घटना पडद्यावर दाखवतो. पुस्तकात असतात त्याप्रमाणे प्रकरण-१, किंवा Chapter -1 असे लिहून अनेक घटनांची एक प्रकारची संगती प्रेक्षकांसमोर ठेवतो. ह्या सिनेमातील अनेक व्यक्तिरेखा ह्या जिवंत/मृत व्यक्तीवरूनच बेतण्यात आल्या आहेत. ह्या सिनेमात ‘काळ’ हाच नायक आहे. त्यामुळे अनेक पात्रे येतात आणि जातात. काही नुसतीच अनेक प्रसंगात हजर असतात. सगळ्यांनी स्वतःची भूमिका चोख बजावली आहे. ज्या व्यक्तीरेखांबद्दल खूप बोलले, लिहिले जात आहे, ते अक्षय खन्ना, संजय दत्त, रणवीर सिंग सारखे कलाकार, हे रहिमान डकैत, चौधरी अस्लम वा हमझा म्हणूनच सामोरे येतात. कोणालाही चटकदार संवाद नाहीत. सिनेमातील घटनांच्या परिघात सर्व वावरतात. सर्वांचा अप्रतिम अभिनय तरीही प्रेक्षकांपर्यंत पोचतो. अंगावर शहारा आणणारे क्रौर्य, ISI च्या मेजर इक्बालचा भारताविरुद्धचा पराकोटीचा तिरस्कार सर्वच कमालीच्या तटस्थपणे दाखवण्यात आले आहे. खनानी ब्रदर्स, हवाला नेटवर्क, भारतीय नकली नोटा छापण्याचा कारखाना, ज्यामुळे या सर्व भारतविरोधी कृत्यांना पैसे पुरवले जात होते, असे सर्व खरे संदर्भ एकत्रित या सिनेमातून समोर येतात. या सिनेमात अजय सन्याल ही व्यक्तिरेखा अजित डोवल यांच्यावरून बेतण्यात आली आहे. त्या व्यतिरिक्त कोणाचेही साम्य ठळकपणे समोर येत नाही. काही संदर्भ येतात. जाणकारांना ते ओळखता येतील.



ह्या सिनेमाचे परिक्षण करताना काही चित्रपट समीक्षकांनी हा चित्रपट मुस्लीम विरोधी आहे, प्रचारकी आहे अशी टीका केली. पराकोटीचे क्रौर्य दाखवणारा सिनेमा म्हणून १ स्टार किंवा दीड स्टार असे rating दिले. पण प्रेक्षकांनी ह्या सिनेमाला चक्क हजार कोटींच्या घरात नेऊन ठेवले आहे. ह्या चमत्कारावर काय बोलावे हे अनेकांना समजत नाहीये. फारसे प्रमोशन वगैरे न करता प्रदर्शित झालेला सिनेमा, तथाकथित समीक्षकांनी अगदी कमी rating दिलेला हा सिनेमा प्रेक्षक चक्क डोक्यावर घेत आहेत. दोनदा-तीनदा बघत आहेत. जवळजवळ साडेतीन तासांचा सिनेमा, item song वगैरे नसलेला, एक प्रकारचे गंभीर वातावरण असलेला सिनेमा – आणि प्रेक्षक या सिनेमाच्या प्रेमात पडले आहेत. या सिनेमाचा दुसरा भाग १९ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. पहिल्या भागात न मिळालेली उत्तरे दुसऱ्या भागात मिळतील अशी प्रेक्षकांना आशा आहे. त्यांची उत्कंठा आताच वाढली आहे. रामगोपाल वर्मा, मधुर भांडारकर ह्या वेगळ्या पठडीतील चित्रपट बनवणाऱ्या दिग्गज दिग्दर्शकांनी मुक्तकंठाने ‘धुरंधर’चे आणि आदित्य धरचे कौतुक केले आहे. त्याच्या दिग्दर्शनाची प्रशंसा केली आहे.

‘जवान, पठान आणि टायगर’ या सिनेमांची चर्चाच अधिक झाली. पण प्रेक्षकांचे प्रेम ह्या चित्रपटांना लाभले असे दिसून आले नाही. आखाती देशांत ह्या सिनेमावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ‘धुरंधर’ने घरच्या प्रेक्षकांच्या जोरावर हजार कोटींचा पल्ला गाठला आहे ही बाब समाधानाची आहे.

सर्वच जगाला कठीण गेलेल्या २०२५ ह्या वर्षाच्या अखेरीस ‘धुरंधर’ने भारतीय चित्रपट सृष्टीला/ चित्रपट उद्योगाला आशेचा किरण दाखवला आहे हे नक्की.

स्नेहा केतकर

18 comments:

  1. Yes. Very well articulated.

    ReplyDelete
  2. Yes. Very well articulated.

    ReplyDelete
  3. धुरंधरच्या हजार कोटींमध्ये आमचे पाचशे अजून जमा व्हायचे आहेत - 'काय तू धुरंधर पाहिला नाही अजून' असं कुणी मित्र लवकरच मला म्हणणार आहे हे नक्की. साडेतीन तासांचा पिक्चर, तोही भारत पाकिस्तान संबंधांवर - घीसापीटा विषय, म्हणून टाळत होतो, पण आता हा लेख वाचल्यानंतर बघायला जायचं धाडस नक्की करेन. हजार कोटींमध्ये पाचशेची भर जरूर घालेन. - अभिजित

    ReplyDelete
  4. Yes very well articulated

    ReplyDelete
  5. अगदी खरंय

    ReplyDelete
  6. चांगल परीक्षण आहे , आणि खर ही , पण तरीही अपुरा वाटतो.शेवट अजुन चांगला हवा होता.

    ReplyDelete
  7. छान , आता सिनेमा बघु का काय असा विचार येतोय , परीक्षण छान

    ReplyDelete
  8. मी सिनेमा बघितला नाही... तुम्ही लिहिलेला अभिप्राय वाचून सिनेमा डोळ्यासमोर उभा राहतो..

    ReplyDelete
  9. खूपच छान लिहिले आहेस. हा सिनेमा मुस्लिम विरोधी नाही, तर पाकिस्तानात काय चालते व त्याचा भारतावर कसा परिणाम होतो हे दाखवण्याचा चांगला प्रयत्न आहे व याला मिळालेल्या यशावरून भारताविषयी प्रेम असणारे भारतीय काही कमी नाहीत हे सिद्ध होते.

    ReplyDelete
  10. Shripad Hundekari30 December 2025 at 07:25

    फारच छान विश्लेषण.

    ReplyDelete
  11. Absolutely fantastic writeup. Brilliant. Second para last line is bull's eye. Superb.

    ReplyDelete
  12. छान लिहिले आहेस

    ReplyDelete
  13. खूपच छान लिहिले आहेस स्नेहा 👌👍👍

    ReplyDelete
  14. शुभांगी देशमाने30 December 2025 at 08:43

    स्नेहा “धुरंधरवर लिहिलेला हा रिव्ह्यू अतिशय नेमका, प्रभावी आणि संतुलित आहे. विचारानं मध्ये खोली आणि भाषेत प्रभाव आहे.”

    ReplyDelete
  15. छान लेख. काही लोकांना यातही राजकारण आणायचे आहे. खुसपट काढतात कशातही.

    ReplyDelete
  16. Watching this movie was an eye-opening experience. It reminds us how important it is to talk about this issue openly, again and again, so that more people understand it. In its own quiet way, the film also reflects the ongoing struggle against terrorism by showing how deeply it affects lives.
    This article does a great job of highlighting these concerns and spreading awareness.

    ReplyDelete
  17. छान परीक्षण, मला वाटते चित्रपट पाहताना जेवढ्या बाबी लक्षात आल्या नव्हत्या त्या तुमच्या लेखामुळे आल्या. धन्यवाद.

    ReplyDelete
  18. फारच सुंदर परीक्षण केले आहेस स्नेहा! चित्रपट अजून पहिला नाही पण तरी नजरेसमोर उभा राहिला.आणि आता कोणतीही कारणं न देता चित्रपट बघायलाच पाहिजे हे अगदी नक्कीच लक्षात आलं आहे.

    ReplyDelete

Share your views also ---