‘देवबाभळी’चा काटा
भंडाऱ्याच्या डोंगरावर
तुकाराम बुवांना शोधायला आवली जाते. तिथे तिला देवबाभळीचा काटा बोचतो. आवली गर्भारशी असते आणि आता काटा टोचल्याने जखम झालेली असते. तुकाराम बुवा
लखुबाईला आवलीची काळजी घेण्यासाठी तिच्यासोबत काही दिवस थांबायला सांगतात. लखुबाई
म्हणजेच रखुमाईला पांडुरंग, विठ्ठल पण हीच विनंती करतो. विठ्ठलावर रुसलेल्या रखुमाईलाही आवलीची एकूण
अवस्था पाहता ही विनंती नाकारता येत नाही.
दोन देवता, एक देवतास्वरूप असलेला
मानव आणि एक अगदी हाडामासांची, सुखदु:खात, संसारात बुडलेली स्त्री अशी चार पात्रे
या ‘संगीत देवबाभळी’ नाटकात आहेत. नाटकाची संहिता फार तर २५/२७ पानांची आहे. हे
नाटक संगीत, नेपथ्य, प्रकाश
योजना, अभिनय आणि संवाद अशा सर्व पातळ्यांवर मनाला भिडते.
विठुरायाची मूर्ती
स्टेजवर आहे. तुकाराम बुवांचा वावर जवळच आहे असा आभास निर्माण केला आहे. त्यांचे
भजनही ऐकू येते मधूनच. रंगमंचावर आवली आणि रखुमाई उर्फ लखुबाई ह्या दोघीच असतात.
आवली सतत पांडुरंगाला शिव्या घालत असते. बोल लावत असते. त्याच्यामुळे आपली सावकारी
गेली. घरात दारिद्रय आले. नवऱ्याचे लक्ष फक्त पांडुरंग भक्तीत. त्यामुळे संसाराचा
गाडा ओढताना आवलीच्या नाकीनऊ आले आहेत. त्यात गर्भारपण आणि पायाला झालेली जखम!
लखुबाई सध्या मानव
रुपात असली, तरी ती रखुमाई देवी आहे याचा तिला विसर पडलेला नाही. आवली आपल्या
नवऱ्याला सतत बोल लावतेय याचा तिला त्रास होतोय. अशा आवलीचा पाय हातात घेऊन
पांडुरंगाने तिच्या पायांतील काटा काढला, हे कळल्यावर तर संतापाने तिला काही सुचत नाही. त्यातून विठ्ठलानेच तिला
आवलीच्या सेवेसाठी इथे पाठवले, म्हणून नाराज आहे ती!
मंदिरातही ती
त्याच्यासोबत उभी नाही. सर्व भक्तगण विठूच्या भक्तीत एकरूप झालेले! एक स्त्री
म्हणून आणि एक देवी म्हणूनही आपल्या वाट्याला उपेक्षा आली आहे याचा सल तिच्या
मनात आहे. कृष्णजन्मांतही राधा ही जनमानसांत कृष्णासोबत जोडली गेली आहे. सगळे
‘राधेकृष्ण’ म्हणतात. ‘रुक्मिणी-कृष्ण’ काही म्हणत नाहीत. आपण कृष्णावर, विठ्ठलावर इतके प्रेम
करूनही तो ‘स्वयंभू’ आहे, तो आपल्याशी कोणत्याही नाजूक धाग्याने बांधला गेला नाहीये, याची जाणीव झाल्याने ती
विठ्ठलावर किंवा खरं तर स्वतःवरच नाराज झाली आहे. ‘देवी’ असूनही मानवी
भावभावनांच्या या गुंत्यात ती अडकली आहे. त्याच्या पलीकडे तिला जाता आलेले नाही.
विठ्ठल, पांडुरंग, कृष्ण – कोणत्याही नावाने
त्याला हाक मारा, भक्तांत रमणारा, त्यांच्या मदतीला धावून जाणारा असा हा देव आहे. म्हणूनच तो
आवलीच्या मदतीला, तिच्या पायांतील काटा काढायला धावत येतो. पण त्यालाही आपल्या
मर्यादेत राहूनच मदत करता येते. म्हणूनच तो आवलीची काळजी घ्यायला मानवरूप
घेतलेल्या रखुमाईला म्हणजेच लखुबाईला पाठवतो. देव असला तरीही तुकोबांच्या रोजच्या
जगण्यातील गरजा त्याला भागवता येत नाहीत. त्यामुळेच आवलीच्या कडवट बोलण्याचा,
तिच्या संतापाचा त्याला राग येत नाही. या संसारी स्त्रीची व्यथा तो जाणतो. पण
तिची व्यथा आपण दूर करू शकत नाही याचा ‘सल’ त्याच्या मनात आहे.
तुकोबाराय यांना तर
आपल्या पत्नीची घालमेल जाणवतेच आहे. तिच्या मागण्या रास्त आहेत पण आपण त्या पूर्ण
करू शकत नाही. तिला एका साध्या, सुखी संसाराची आस आहे. खायला-प्यायला असावं, गरिबी नसावी अशा तिच्या साध्या मागण्या!
नवऱ्याने आपल्याकडे, आपल्या म्हणण्याकडे लक्ष द्यावे ही तिची माफक अपेक्षा आहे. पण तुकोबा
पांडुरंग भक्तीत रंगलेले असल्याने ते त्यांना जमत नाही, हा त्यांच्या मनातील
सल आहे.
आवली ही साधीसुधी, संसारी स्त्री! पतीच्या
धरसोड वृत्तीमुळे सतत कावलेली असते. सावकारी सोडल्यामुळे गरिबीची स्थिती आलेली.
त्या परिस्थितीला तोंड देत असतानाही तुकोबा काहीतरी चांगलं लिहितात, लोकांना
चांगलं सांगतात, हे तिला जाणवतंय.
पांडुरंगाला सतत बोल लावीत असली तरीही तुकोबांचे मोठेपण तिने मनोमन मान्य केले आहे.
त्यामुळे तुकारामांवर ती रागावली तरी ‘दोन घास त्यांच्या पोटात जावे’ म्हणून ती
धडपडतेय. रागावली तरीही त्यांच्या काळजीपोटी ती त्यांच्या सोबतच आहे. तिच्या
स्वप्नांत तिला तुकोबांच्या भजनाचे कागद इंद्रायणीत बुडलेले दिसतात, पण वाहत वाहत ते नदीभर
पसरलेले ही दिसतात. तुकोबांच्या भक्तीचे वैश्विक रूप तिला जाणवत आहे.
ती लखुबाईला म्हणते, ‘पाऊस येवो न येवो, आपण नांगरणी करत राहायची’.
हे ऐकून लखुबाई सकट आपणही थक्क होतो. कर्मयोगाचे तत्वज्ञान जगणारी ही, म्हटलं तर
साधीसुधी स्त्री आहे. पण तुकोबांच्या साथीमुळे, त्यांच्यावरील विश्वासामुळे आवलीनेही एक वेगळीच उंची गाठली आहे. तिला देव
बाभळीच्या काट्याने जखम झाली आहे, पण तिच्या मनात कोणताही सल नाही. म्हणूनच आवलीची जखम भरून येते. पण या देवबाभळीच्या
काट्याची सल मात्र तुकोबा, पांडुरंग आणि रखुमाई यांच्या मनात उमटते.
‘संगीत देवबाभळी’ हे
नाटक डोळे, कान आणि आपल्या इतर
सर्व जाणीवांसकट पहायचे नाटक आहे. संगीत, नेपथ्य, प्रकाशयोजना, संवाद, गीते/भजने यांनी समृद्ध असा हा भावाविष्कार आहे.
हा विषयही असा आहे, की ज्याची झोळी जितकी मोठी, तितके त्याला हे नाटक गवसेल. सगळ्यांनी याचा अनुभव एकदा तरी अवश्य घ्यावा.
स्नेहा केतकर
फारच सुंदर समजावून सांगितलं आहेस
ReplyDeleteVery well portrayed Sneha! The thought and theme is so appealing, shows the depth in our faith. Even someone like Avalai who is speaking negatively about Vitthal is not just admired by people, but even by the Lord himself. No individual is small and God cares for all, a great way to depict this. Very well presented act, kudos to their entire team and certainly to you for explaining it so well.
ReplyDeleteअतिशय सुंदर रसग्रहण
ReplyDeleteवाटच बघत होते!
ReplyDeleteखूप छान लिहिलयस.
प्रत्येकाला आपापल्या परीने विट्ठल सापडत असतो आणि काहींना न शोधताही!
तिथे आले की नक्कीच बघेन.
Thank you for the write up.
Very well written. The emotional turmoil explained very appropriately.
ReplyDeleteखूप सुंदर लिहिले आहे, अभिनंदन.
ReplyDeleteओघवती शैली, प्रगल्भ विचार - त्यामुळे जमलेली (लेखाची) भट्टी. नाटक बघायच्या यादीत आहे, आता तिथे वर सरकवलंय!
ReplyDeleteफार छान लिहिले आहे स्नेहा ताई 👍🙏
ReplyDeleteउत्तम लक्षण केल्यामुळे हे संगीत नाटक पाहण्याची अधिक ओळ निर्माण झाली आहे खूप छान लेख व घोटी केली संपूर्ण लेख वाचण्यास प्रेरणा देते अभिनंदन
ReplyDeleteKhupch apratim Natak
ReplyDeleteखूप छान 👌
ReplyDeleteखूप सुंदर रसग्रहण..मी सुद्धा हे नाटक बघितलं, तुझं म्हणणं तंतोतंत पटलं
ReplyDeleteखुप छान लिहिले आहे
ReplyDeleteBeautifully described, Sneha! Relived the play through your writing.
ReplyDeleteनाटक समजून घेवून त्यावर विचार मांडण्याची शैली अप्रतिम आहे.खूप प्रगल्भ विचार मांडले आहेत. .. माणिक, एक नाट्य प्रेमी.
ReplyDeleteअप्रतीम. डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं
ReplyDeleteअतिशय सुंदर लेख. मी हे नाटक पाहिले आहे. पण हा लेख वाचल्यावर त्यातील मर्म अतिशय सुरेख रितीने समजले. धन्यवाद.
ReplyDeleteअप्रतिम अभिप्राय लिहिला आहेस.
ReplyDeleteखूपच सुंदर.... नाटकही सुंदर आणि हा अभिप्राय सुद्धा
ReplyDeleteफारच छान मिना हे नाटकच छान आहे मला आवडल.आणि सगळे नविन युवा टीम आहे.आणी वेगळा विचार मांडलाय.
ReplyDeleteकिरण जोग.
Nicely explained
ReplyDeleteखुपचं छान लिहिले आहे भक्ती मध्ये अपार शक्ती आहे
ReplyDeleteNice write up. Would like to see the play
ReplyDeleteउत्तम रसग्रहण !!
ReplyDelete