Monday, 7 April 2025

गोष्ट अमेरिकेची

गोष्ट अमेरिकेची

सगळ्यांना वाटेल की, अमेरिकेची गोष्ट? त्यात काय? आम्हाला माहितेय की! पण मी आताच्या नाही, तर शंभर वर्षांपूर्वीच्या अमेरिकेची गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट सांगितली आहे जॉर्ज आणि हेलेन पापाशविली या जोडप्याने. त्यांनी एक पुस्तक लिहिले आहे. पुस्तकाचे नाव आहे, Anything Can Happen. ही त्या दोघांचीच गोष्ट आहे. हे पुस्तक १९४५ मध्ये प्रकाशित झाले आहे.



साधारण १९२०/२५ च्या आसपास जॉर्जी इव्हानोविच हा रशियाच्या जॉर्जिया भागातून अमेरिकेत येतो. धुक्यात हरवलेल्या अमेरिकेच्या किनाऱ्यावर तो पाऊल ठेवतो. खिशात पैसे नाहीत आणि त्याला जे काय येत असते, त्या कामावर अमेरिकेत पैसे मिळण्याची शक्यता नसते. त्याच्या मनात मात्र उत्साह असतो, आणि पडेल ते काम करण्याची तयारी असते. झुराबेग या आपल्या मित्रासोबत तो कपबशा विसळण्याचे काम करायला सुरवात करतो. पण तिथे ग्लासेस, बशा फुटल्याने मालकीणबाई कामावरून काढून टाकते. इथपासून सुरवात करून अनेक कामे तो करतो. त्याचा हा प्रवास खूप मजेशीर आहे.

जॉर्जीचा अमेरिकेतील मार्ग खडतर आहे. जॉर्जी मनाने खूप चांगला असतो, प्रामाणिक असतो. इतरांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे असे त्याला वाटते. जॉर्जीला पोट भरण्यासाठी नोकरीची गरज आहे. पण त्यासाठी त्याला दुसऱ्याचे पाय ओढायचे नाहीत.

थोडेसे पैसे जमल्यावर तो एक सोनेरी कोल्ह्याची जोडी विकत घेतो. त्यांना दर आठवड्याला तो खाणे-पिणे घेऊन जातो. ती जोडी मग त्याला आवडू लागते. त्या जोडीलाही त्याची ओळख पटायला लागते. मग त्याला त्यांच्या कातडीसाठी/फरसाठी त्यांना मारायचे ही कल्पनाच सहन होत नाही. जॉर्जीचा साधेपणा, भोळेपणा आणि सचोटी या गुणांवर त्याची अनेकांशी मैत्री जमते. अमेरिकेत तीन वर्षे राहिल्यानंतर त्याला आपल्या भाषेत कुणाशी तरी बोलावे अशी आस लागते. तो अगदी बेचैन होतो. त्यासाठी तो पिट्सबर्ग विद्यापीठात ही जातो. ह्या ठिकाणी कोणीतरी जॉर्जियन भाषा जाणणारे असेल असे त्याला वाटते. पण तिथेही कोणीच भेटत नाही त्याला. शेवटी आपली आपल्या भाषेत बोलण्याची उर्मी तो स्वत:शीच बोलून, काम करताना गाणी गुणगुणून भागवत राहतो. आणि एके दिवशी अचानक त्याला आनाबाई भेटते. ती म्हणते, माझे वडीलही अशाच भाषेत बोलतात. आनाबाईच्या वडिलांना भेटून जॉर्जीचा आनंद गगनात मावत नाही. दोघेही रात्रभर एकमेकांशी बोलत राहतात. स्थलांतरितांच्या विश्वातील ह्या अशा हळव्या कोपऱ्यांचेही वर्णन ह्या पुस्तकात आहे.

जॉर्जिच्या ह्या आठवणीत अमेरिकेतील मंदीचाही ओझरता उल्लेख आहे. पहिल्या महायुद्धानंतर चांगल्या आयुष्याच्या आशेने युरोपातील अनेक देशांतील, प्रामुख्याने पूर्व युरोप आणि रशियातील अनेकजण अमेरिकेत स्थलांतरित झाले. स्वभावाने सरळ, साध्या, कष्टाळू आणि प्रामाणिक असणाऱ्या ह्या लोकांनी अमेरिकेला मंदीच्या दिवसांतही साथ दिली. त्यांतारच्या घटना सर्वांनाच माहिती आहेत. दुसऱ्या महायुद्धात दोन्हीकडील देशांना शस्त्रे पुरवत अमेरिकेने अमाप पैसा कमावला. युरोप केन्द्री असलेले जग हळुहळू अमेरीका केंद्री होत गेले. Melting pot मध्ये melt झालेले आजचे कट्टर अमेरिकन यांचे पूर्वज हे स्थलांतरितच होते. उण्यापुऱ्या चारशे वर्षांचा इतिहास असलेल्या अमेरिकेने गेली जवळजवळ शंभर वर्षे साऱ्या जगावर राज्य केले ते ह्या स्थलांतरितांच्या जोरावरच. स्थलांतर केलेला युरोपातील उच्चभ्रू समाज, तेथील उच्च विद्या विभूषित लोक यांनी स्वतः सकट अमेरिकेचाही उत्कर्ष केला. इतकेच काय, तर ज्यांना गुलाम म्हणून अमेरिकेत आणले त्या कृष्णवर्णीय नागरिकांनीही अमेरिकेला समृद्ध करण्यासाठी रक्ताचे पाणी केले.

Anything can happen.... ह्या पुस्तकाची भुरळ ‘पुलं’ना ही पडली. त्यांनी काय वाट्टेल ते होईल या नावाने ह्या कादंबरीचा अनुवाद केला आहे.



इतक्या सहजसुंदर भाषेत हे पुस्तक पुलंनी लिहिले आहे की हा अनुवाद वाटतच नाही. स्वाभिमानी पण प्रेमळ, क्वचितप्रसंगी बिलंदर पण बहुतेकदा शक्यतो सत्याची कास धरणारा जॉर्जी आयव्होनिच मनाला भिडतो. जॉर्जीच्या मते अमेरिका हा असा देश आहे जिथे काहीही घडू शकतं. काहीही होईल. काय वाट्टेल ते होईल. जॉर्जीचे हे आत्मचरित्र अमेरिकेत पोटापाण्यासाठी आलेल्या आणि स्थायिक झालेल्या एका माणसाचा जीवनप्रवास रंगतदारपणे रेखाटते. “सर्वांनी एकत्र बसून जेवावे, खावे, प्यावे, क्षुद्र भेदाभेद विसरावे, आनंदात राहावे या प्रार्थनेवरच हे पुस्तक संपते. हसतखेळत, खातपीत, माणुसकीचे साधेसुधे नियम पाळीत अवघ्यांचा संसार सुखाचा व्हावा अशी इच्छा बाळगणारा जॉर्जी आपणा सर्वच सामान्य माणसांचे विचार बोलतो. दुर्दैवाने आजच्या जगातील लोकांना, हे साधे माणुसकीचे बोल कळत नाहीत. जिथे काहीही घडू शकतं, Anything can happen अशी असणारी अमेरिका आज एका वेगळ्या वळणावर आहे. जगावर जकात कर लावून आपल्या देशाची अर्थव्यवस्था सुधारण्याची त्यांची इच्छा आहे. त्यासाठी त्यांनी उभ्या केलेल्या अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांमधून त्यांनी अंग काढून घेतले आहे. या सर्वाचा काय आणि कसा परिणाम होईल ते येणारा काळ सांगेल.

मला तुम्हांला ह्या हरवलेल्या, १०० वर्षांपूर्वीच्या अमेरिकेची गोष्ट सांगायची होती. ज्यांना जमेल त्यांनी जरूर ह्या अमेरिकेला जॉर्जी सोबत भेट द्या.

स्नेहा केतकर

 

17 comments:

  1. Very nice, will read this book

    ReplyDelete
  2. Nice write up Sneha. Would be interested to read the book by PL... Thanks for sending your article.

    ReplyDelete
  3. Thank you Sneha for the information. Indeed it is a beautiful write up. Would like to read these stories. America was land of all kinds of possibilities and several good things and researches were achieved. Unfortunately it has taken not so glorious turn but we always hope the times will change and good things will prevail!

    ReplyDelete
  4. Thanks for a great review of the book

    ReplyDelete
  5. Thanks for great review, काय वाट्टेल ते 'नक्की वाचते आता.

    ReplyDelete
  6. Ajit Edlabadkar7 April 2025 at 08:17

    Good to learn about this Sneha! Thanks for the synopsys!

    ReplyDelete
  7. Masta. Want to read the book now

    ReplyDelete
  8. Very nice information about America and the book. Surely, I will read the book by P L.

    ReplyDelete
  9. स्नेहा, मी तुझी आभारी आहे. मला जर हे पुस्तकं मिळाल्यावर जरूर वाचेन. ठाण्याला आलेल्याचा हा ऐक फायदा झाला. 👍

    ReplyDelete
  10. Thanks all.....

    ReplyDelete
  11. खूपच रंजक माहिती. छान लिहीला आहेस पुस्तक परिचय.

    ReplyDelete
  12. You have already triggered the interest in me to read the book "Anything can happen". Thanks for sharing the review.

    ReplyDelete
  13. खूप छान पुस्तक परीक्षण स्नेहा! आता दोन्ही पुस्तकं मिळवून नक्कीच वाचेन

    ReplyDelete
  14. Seems like an interesting book! Hope to read it! Thanks!

    ReplyDelete
  15. छान.तू मस्त हसता खेळता आढावा घेतला आहेस या पुस्तकाचा.मी खूप दिवसांपूर्वी वाचलय.आधी मराठी मग मूळ इंग्लिश दोन्ही.मलाही खूप आवडलं होतं.

    ReplyDelete
  16. खूप छान लेख… १०० वर्ष जुन्या अमेरिकेचं वर्णन वाचताना चार्ली चॅप्लिन यांच्या व्हिडिओ ची आठवण झाली

    ReplyDelete
  17. मीना मला तू हेच पुस्तक लायब्ररीतून आणायला सांगत होतीस का पु लचां ,लेख छान आहे.आवडला मला.
    दादा.

    ReplyDelete

Share your views also ---