“चौकट” ओलांडताना
“चौकट” नावाची एक दहा-बारा
मिनिटांची फिल्म आहे. एक छोटंसं गाव, बहुतेक कोकणातलं असावं, कारण पहिल्याच शॉट मध्ये नारळाची झाडं दिसतात.
छोटंसं घर, घराचा दरवाजा अर्धाच उघडा असतो. दुसरा अर्धा भाग
उघडत नसतो. सकाळची वेळ, घरातली गृहिणी गुणगुणत मन लावून
स्वैपाक करत असते. घरासमोर छोटीशी रांगोळी असते. इतक्यात एक माणूस येतो. हाक
मारतो. म्हातारा असतो. खायला मागतो. दमलेला दिसत असतो. हातातले काम सोडून गृहिणीला
यावे लागते. ती थोडी वैतागते. त्या माणसाचा चुकून रांगोळीवर पाय पडतो. म्हणूनही ती
रागावते. थोड्या रागातच ती म्हणते,” अजून पूजाही झाली
नाहीये. घरात खायला काही नाही.”
पुन्हा घरात जाते. कामात
दंग होते. पुरणपोळी करते. देवघरात येते. देवाची पूजा करण्याआधी, देवघराच्या वरच्या
बाजूला असलेल्या चौकोनी खिडकीतून सहज बाहेर डोकावते, तर तो म्हातारा माणूस हळुहळू
अंगणातला केर काढत असतो. पालापाचोळा तर खूपच पडलेला असतो अंगणात. शेवटी बाहेर जाऊन
ती बाई त्याला म्हणते, “अरे बाबा, नको
केर काढूस. नाही जमणार तुला.” पण आत येऊन त्याला शिळी भाकरी-भाजी आणून देते. तो
म्हातारा कृतज्ञतेने तिच्याकडे बघतो. ती पुन्हा आत जाऊन पूजा करायला बसते. मनोभावे
पूजा करते. फुले वाहते, नैवेद्याचे ताट देवापुढे ठेवते. सगळीकडे एकदा समाधानाने
नजर टाकते आणि परत नमस्कार करते.
बाहेर येऊन बघते तर, त्या म्हाताऱ्या माणसाने सर्व अंगण लख्ख
झाडून घेतलेले असते. स्वच्छ अंगणाकडे तो ही समाधानाने एकवार बघतो, तिला नमस्कार
करतो आणि जायला निघतो. यानंतर त्या गृहिणीच्या मनातले भाव तिच्या चेहऱ्यावर फार
प्रभावीपणे उमटले आहेत. त्या माणसाने विस्कटलेली रांगोळीही नीट केली असते. ते ही
तिच्या लक्षात येते. एक क्षणभर तिला काहीच सुचत नाही. परत घरात येऊन ती देवघरात
जाते. देवघर बघते, थबकते, पण लगेच नैवेद्याचे ताट उचलते आणि
धावत बाहेर जाते. जाताना अर्ध्याच उघडलेल्या दाराशी अडखळते,
पण जोर लावून ते दार ती उघडते आणि धावत त्या माणसाच्या मागे त्याला बोलवायला जाते.
एवढीच छोटी फिल्म! फिल्ममध्ये
न उघडणारे दार, चौकोनी देव्हारा, चौकोनी खिडकी.....अशा अनेक चौकटी आहेत. पण या चौकटी ती
ओलांडते.
चौकट शॅार्ट फिल्मची लिंक - https://youtu.be/AKjsT8-8GYM?si=hmfwBwftaq2Nrg45
सारा समाज, त्यातले आपण, अशा अनेक चौकटीत बंदिस्त
असतो. या दृश्य चौकटी नसतात. विचारांच्या, चालीरीतींच्या, आपल्या आवडीनिवडीच्या, जाती-धर्माच्या, भाषेच्या, एखाद्या प्रदेशाच्या, अशा अगणित चौकटी!
नायजेरियन-ब्रिटीश लेखक बेन ओक्री
जयपूर साहित्य संमेलनाला आला होता. तो म्हणाला, की जन्मल्यापासून आपण तुरुंगात असतो. सुरवात आई-वडिलांच्या संस्काराने होते.
मग वागण्याची पद्धत, भाषा, व्यक्त व्हायची
पद्धत अशा अनेक जनरीतींच्या चौकटीत आपण बंदिस्त होतो. पण आपण बंदिस्त आहोत हेच
कळायला अनेकांना वेळ लागतो. काहींना ते कळतही नाही. आणि मग ह्याच चौकटी आपण अंतिम
सत्य आहे असे मानायला लागतो. यावरूनच मतभेद होतात, हे मतभेद टोकाला गेले की युद्धजन्य स्थिती उद्भवते.
सध्या नवरात्र चालू आहे. सर्वत्र शुभ
वातावरण आहे. पण जगावर युद्धाची मोठी काळी छाया पसरली आहे. इस्रायल-पॅलेस्टाईन
युद्धाला एक वर्ष झाले आणि रशिया-युक्रेन युद्धाला दोन वर्षे होतील. ही चारही
राष्ट्रे आणि त्यांना मदत करणारी राष्ट्रे, अशाच एका चौकटीत अडकलेली दिसतात. युद्धाने प्रश्न सुटतील असेही त्यांना
वाटते. पण खरे तर यात गुंतलेल्या सर्वांनी चौकट मोडून वेगळा विचार करण्याची गरज
आहे. ही आज सर्व जगाची गरज आहे कारण आजच्या काळात युद्धे, त्याचे परिणाम सीमित राहत नाहीत. त्याचे परिणाम आज न उद्या
सर्व जगाला भोगायला लागणार आहेत.
चौकट मोडणे ही नवी कल्पना नाही. भारताने
७५ वर्षांपूर्वी अशी चौकट मोडून, वेगळा विचार करून
स्वत:च्या देशाचे विभाजन केले. स्वातंत्र्यासाठी मोठ्ठी किंमत देऊन ते मिळवले. आज
विचार करता अनेक विचारवंत हे झाले ते एका दृष्टीने बरेच झाले असे ही म्हणतात. पाकिस्तानची
आजची स्थिती बघता ते खोटे ही नाही.
राजीव गांधी म्हणाले होते, की एक
रुपया सरकारने दिला की तो लोकांपर्यंत पोचेपर्यंत त्यातले फक्त १५ पैसे उरतात. तेवढेच
गरीबांच्या हातात येतात. राजकीय व शासकीय व्यवस्थेतील हा भ्रष्टाचार कसा थांबवावा
हे अनेकांना कळत नव्हते. पण जनधन-आधार-मोबाईल आणि तंत्रज्ञान याच्या मदतीने
आज लोकांना सरकारची मदत थेट पोहोचते. करोडो सामान्य भारतीय आज बँकेशी जोडले गेले
आहेत. सधन लोकांनी गॅस सबसिडी परत करावी आणि त्या पैशातून एका गरिबाला गॅस देण्यात
येईल असे सरकारने जाहीर केले तेव्हा अनेकांनी सरकारला मुर्खात काढले. पण आज
त्यामुळे अनेकांच्या घरी गॅस आला हे विसरून चालणार नाही.
चौकट मोडण्याचे सर्वात मोठे उदाहरण
मला स्त्री म्हणून स्त्री शिक्षणाचे कार्य ज्यांनी केले त्यांचे द्यावे असे वाटते.
महर्षी कर्वे, सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले अशा
अनेकांनी चौकट मोडून स्त्रियांना शिक्षण द्यायला सुरवात केली. आज भारताच्या भरारीत
महिलांचा मोठा वाटा आहे तो ह्या वेगळ्या विचार करण्याच्या धाडसामुळेच, चौकट ओलांडल्यामुळेच!!!!
प्रश्न हा आहे की असा वेगळा विचार
करायला कोणी तयार आहे की नाही? किंवा असा वेगळा विचार
कोणाला सुचणार तरी आहे का नाही? आणि सुचला तर तो मान्य
करायला चौकट मोडून कोणी पुढे येणार की नाही?
आज दसरा आहे. सीमोल्लंघनाचा दिवस!!!! मानवाने असुरी शक्तीवर मिळवलेला हा विजय
आहे. तो ही वानरांच्या सहाय्याने.....इथे प्रभू रामांनी एका चौकटीला छेद दिलाच
आहे. महाभारतात ह्याच दिवशी पांडवांनी शमीच्या झाडावर ढोलीत लपवलेली आपली शस्त्रे
बाहेर काढून त्यांची पूजा केली. आजच्या दिवशी आपण सरस्वतीची पूजा करतो. बुद्धीलाही
आपण शस्त्र मानतो. ह्याच बुद्धीच्या साहाय्याने जगभरच्या राजकीय नेत्यांना ह्या
युद्धातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळो आणि गरज असल्यास त्यासाठी चौकट मोडण्याचीही
त्यांना शक्ती मिळो हीच इच्छा.........
स्नेहा केतकर