Friday, 20 December 2024

पुन्हा एकदा पुलं......जावे त्यांच्या देशा

 

पुन्हा एकदा पुलं......जावे त्यांच्या देशा

परवा पुण्याला गेले असताना पुस्तकांच्या दुकानात पुलंची पुस्तके पाहिली. सर्व पुस्तके वाचली असतानाही परत एकदा हाताळाविशी वाटतात. कुठलेही पान उघडून वाचायला लागले तरी ओठांवर हसू येते. जुन्या आठवणी येतात. ह्यावेळी समोर ‘जावे त्यांच्या देशा’ हे पुस्तक आले. पुस्तक चाळताना इटली, फ्लॉरेन्स, हंगेरी, नायगारा – असे ओळखीचे शब्द वाचले आणि एक कुतूहल वाटले. पुलं ह्या सर्व ठिकाणी जवळ जवळ पन्नास वर्षांपूर्वी जाऊन आले आहेत. कारण हे सर्व लेख १९७३ मध्ये प्रकाशित झाले आहेत. त्यावेळी परदेशप्रवास हे एखाद्या परग्रहावर जाण्याइतके दुर्लभ होते. गेल्या पन्नास वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. आता परदेश प्रवास हे अप्रूप राहिलेले नाही. त्यामुळे पुलंना काय वाटले हे मला माझ्या अनुभवांशी ताडून पाहावेसे वाटले म्हणून पुलंचे ‘जावे त्यांच्या देशा हे पुस्तक परत हातात घेतले.

पुस्तकातील पहिला लेख ‘दर्शन हा आहे. सुरवात व्हेनिसच्या वर्णनाने होते. व्हेनिसच्या वार्षिक नौका महोत्सवाच्या दिवशी पुलं तिथे होते. तिथल्या त्या सर्व नौका महोत्सवाचे वर्णन पुलंनी मस्तच केले आहे. व्हेनिस पाहिले असल्याने सर्व डोळ्यांसमोर उभेच राहते. पुलंनी ‘वाईन’ला दिलेला ‘वारुणी’ हा प्रतिशब्द मला फारच आवडला. Red wine ला रक्त वारुणी आणि White Wine ला श्वेत वारुणी! सजवलेले गोंडोला, सुंदर तरुणी, देखणे तरुण आणि पाण्यावर झुलणारी व्हेनिस नगरी..... ह्या सर्व देखाव्याचे इतके मनोहर दर्शन पुलंनी घडवले आहे की ते रसिकांनी जरूर वाचावे. आपल्याला वाटते हेच दर्शन पुलंना घडवायचे आहे. पण खरे दर्शन तर पुढेच आहे.

                                                                the tramp - चार्ली चॅप्लीन

त्याच दिवशी व्हेनिस चित्रपट महोत्सवाचाही शेवटचा दिवस असतो. चार्ली चॅप्लीनचा ‘सिटी लाईट्स’ हा सिनेमा सेंट मार्क्स स्क्वेअरला दाखवण्यात येणार असतो. पुलं तिथे सिनेमा पाहायला म्हणून जातात आणि त्यांना तिथे साक्षात ‘चार्ली चॅप्लीन’चे दर्शन घडते. पुलं सोबत आपणही हा प्रसंग अक्षरश: अनुभवतो. पुलंनी ‘चार्ली चॅप्लीन’चे ‘समाजातल्या underdog चे चित्रण करणारा’ असे केलेले वर्णन तंतोतंत पटले. ‘रस्त्याच्या काठी जगणाऱ्या त्या केविलवाण्या कुत्र्यासारखाच केविलवाण्या डोळ्यांनी पाहणारा असे जेव्हा पुलं चार्ली चॅप्लीनचे वर्णन करतात, तेव्हा पुलंच्या प्रतिभेला दाद द्यावीशी वाटते. चार्ली चॅप्लीनच्या सिनेमातल्या त्या गणंग व्यक्तिरेखेचे इतके अचूक वर्णन दुसऱ्या कुणी केले असेल तर ते मला माहिती नाही. चार्लीच्या दर्शनाने उजळून गेलेल्या प्रकाशात पुलं त्यांच्यासोबत आपल्यालाही नेतात हीच त्यांच्या शब्दांची किमया!

‘निळाई’ हा लेख ही मस्तच. ‘नेपल्स’ला जर इटालियन भाषेत ‘नापोली म्हणत असतील, तर ‘दापोलीचे खरे नाव काय बरं असावे असा एक भाषाशास्त्रीय प्रश्न मनाला चाटून गेला!!!! – ही पुलंची कॉमेंट तर खासच.....त्याचप्रमाणे इटालियन स्पॅगेटीच्या विविध रूपांचे ....मॅक्रोनी, टोटॅलिनी, रॅव्हीओली, कॅनेलोनी....वर्णन करताना पुलं म्हणतात, ‘एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति’ म्हणजे काय हे इटालियन शेवयीची नाना स्वरूपे पाहिल्यावर कळते. हे वाचल्यावर हसू फुटल्याशिवाय राहत नाही. ह्या लेखात एका रेस्तराँमध्ये गेल्यावर माशाचे किती प्रकार आणले ह्यावर पूर्ण परिच्छेद आहे. मत्स्यप्रेमींनी तो जरूर वाचावाच. पुलं अमाल्फी कोस्टवरील सोरेंटो ह्या गावी राहत होते. ह्या परिसराचे वर्णनही वाचण्यासारखे. पण ह्या समुद्राला नारळीच्या वनांचा किनारा नाही....ह्याचे पुलंना वाईट वाटते. 

                                                                नील कुहर

पण ह्या लेखात पुलंनी मुख्यत्वे काप्री बेटाजवळील Blue Grotto ह्या जागेचे वर्णन केले आहे. पुलंना मोहात पाडणारी निळाई इथलीच...पुलंनी या जागेचे मराठीत नील कुहर असे नामकरण केले आहे. या नील कुहरात जाण्यासाठी होड्यांची रांग लागलेली असते. छोट्याशा होडीतून अगदी आडवे होऊनच या नीलकुहरात प्रवेश करावा लागतो. दीडशे फूट लांब, पन्नास फूट रुंद आणि शंभर फूट उंच अशा गुहेत आपण पोचतो. आत शिरायला आणि बाहेर पडायला दोन छोटी नैसर्गिक दारे आहेत. ह्या जागेतून पडणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे दिसणारे नेत्रदीपक दृश्य ह्या जागेला ‘अपूर्व’ बनवते. “सूर्यप्रकाशाचे इथे निळे पाणी झालेले वाटते. त्या निळ्यातील ती चंदेरी झळाळी तर अपूर्व, असा नीलिमाच नव्हे, तर अशी शीतल पण तेज:पुंज शुभ्रताही मी पाहिली नव्हती. असे पुलंनी लिहिले आहे. सूर्यप्रकाश त्या पाण्यात तळापासून शिरतो. परावर्तित प्रकाशाची ही किमया आहे असे म्हणतात. वैज्ञानिक स्पष्टीकरण असले तरीही आपल्या लक्षात राहतो तो भारून टाकणारा अनुभवच. या पुल-अनुभवासाठी तरी ‘निळाई’ लेख जरूर वाचावा.


                                    फ्लॉरेन्स मधील प्रसिद्ध द्युओमो - फ्लॉरेन्स कॅथिड्रल

फ्लॉरेन्स मध्ये भेटलेल्या डॉ.उगुच्चिओनि यांना पुलंनी ‘आद्य शंकराचार्य’ असे म्हटले आहे. कारण लेख वाचल्यावर वाचकांना कळेलच. पण फ्लॉरेन्ससारख्या नितांतसुंदर शहरावरचा लेख मला थोडा निराश करून गेला. मर्दानी लावण्याचा आविष्कार असलेल्या मायकेल अँजेलोच्या जगप्रसिद्ध डेव्हीडचा उल्लेखही या लेखात नाही. उफिझी, अकेडेमिया ह्या जगप्रसिद्ध म्युझियम्सचा उल्लेख नाही. आपल्याला इतिहासात नेणाऱ्या फ्लॉरेन्सच्या गल्लीबोळांची वर्णने नाहीत. द्युओमोचे वर्णन मात्र मस्त केले आहे. फ्लॉरेन्स ह्या कलासक्त नगरीला घडवणाऱ्या ‘मेडिची’चाही उल्लेख नाही. मला वाटते, डॉ.उगुच्चिओनि यांच्यावर आणि फ्लॉरेन्सवर असे दोन लेख लिहायला हवे होते पुलंनी. असो.


                                                               Alps - Jung Frau

उदंड जाहले पाणी या लेखात नायगरा धबधबा, कॅनडातील Thousand islands यांचे वर्णन आहे तसेच रोम मध्ये अचानक झालेल्या मुसळधार पावसाचेही वर्णन आहे. “हिमराशी होऊन आकाशापर्यंत पोहोचणारा आल्पस पाहिल्यावर थोडक्याच दिवसात जलराशींनी पाताळात घेतलेली झेप पहायचा योग आला......” अशा शब्दात नायगाराचे वर्णन पुलं करतात. या लेखात ’jung frau’ या युरोपातील शिखराला पुलं ‘हिमगौरी’ संबोधतात आणि तिला पाहून त्यांना आपल्या ‘कन्याकुमारीची आठवण येते. ते म्हणतात,ही स्विस कन्याकुमारी आपल्या चिरयौवनाचे आव्हान देत एका महापर्वताच्या शिखरावर उभी, तर आमची भारतीय ‘युंगफ्राऊ’ आपल्या त्या भणंग प्रियकराच्या पायी सर्वस्व वाहण्याची समोरच्या महासागराच्या साक्षीने शपथ घेऊन युगानुयुगे तिष्ठत राहिलेली.” तसं पाहिलं तर पार्वती आणि युंगफ्राऊ दोघीही पर्वतकन्याच की! खरं सांगायचं तर हे साम्य मला जाणवले नव्हते आधी. पण या विचारामुळेच परदेशी युंगफ्राऊ मला जवळची वाटायला लागली. या लेखातले पुलंचे आल्प्सच्या भुयारी रेल्वे प्रवासाचे वर्णही खासच!

हंगेरी – माझा नवा स्नेही’ हा लेख खूपच आवडला मला. पुलं ह्या ठिकाणी बरेच दिवस राहिले. बहुतेक ते सांस्कृतिक आदान-प्रदान अंतर्गत तिथल्या सरकारच्या आमंत्रणामुळे गेले असावेत. अशा प्रकारच्या भेटी ७०/८० च्या दशकांत होत असत. मुख्यत: ह्या भेटी सोविएत गटातील देशांत होत असत. हंगेरीत पुलं अनेक ठिकाणी फिरले. छोट्या छोट्या गावांत फिरले. येथील नृत्य, नाटक, संगीत या संदर्भातल्या अनेक घटना पुलंनी या लेखात वर्णन केल्या आहेत. बुडापेस्ट कल्चरल सेंटर पाहून पुलं भारावले नसते तरच नवल. यात चित्र, शिल्प, नाट्य, संगीत, कळसूत्री बाहुल्यांचे खेळ अशा अनेक कला शिकण्याची सोय होती. तेथील नॅशनल लायब्ररीतले संस्कृत भाषा पंडित प्रोफेसर योशेफ बेकेर्डी यांनाही ते भेटले. अगदी खेड्यापाड्यातील कलाकारांनाही ते भेटले. हा लेख आपल्याला ‘हंगेरी या देशाचे दर्शन घडवतो. पण वाचकांनी हे आवर्जून लक्षात ठेवावे की हा पन्नास वर्षांपूर्वीचा ‘हंगेरी’ आहे. साम्यवादी विचारसरणीचा आणि रशियाची नियमावली पाळणारा हा देश होता तेव्हा. आजचा हंगेरी निश्चितच वेगळा आहे.

येथील बालातोन सरोवरात रवींद्रनाथ टागोरांचा पुतळा आहे. ही माहिती मी अमृता प्रीतम यांच्या ‘रसीदी टिकट’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकातही वाचली होती. १९२० साली रवींद्रनाथ बालातोन सरोवराजवळ गरम पाण्याचा झरा आहे, तिथे औषधोपचारासाठी आले होते. प्रकृती सुधारल्याच्या कृतज्ञतेपोटी त्यांनी तिथे लिंडन वृक्षाचे रोप लावले. तिथे जवळच उभारलेल्या रवींद्रनाथांच्या पुतळ्यापाशी त्यांची कविता आणि त्या ओळींचा  हंगेरियन भाषेत केलेला अनुवाद कोरला आहे. याच ओळींचा ‘रसीदी टिकट’ मध्ये दिलेला अनुवाद इथे देण्याचा मोह मला आवरत नाही. पुलंनी केलेल्या अनुवादापेक्षा हा अनुवाद सरस आहे.

                                        बालातोन येथील रवींद्रनाथ टागोर यांचा पुतळा 

ज्यावेळी मी या पृथ्वीवर नसेन

त्यावेळीही माझा हा वृक्ष

तुमच्या वसंत ऋतूला नवी पालवी देईल

आणि रस्त्याने जाणाऱ्या पांथस्थांना सांगेल,

की एका कवीने या भूमीवर प्रेम केलं होतं.

रवींद्रनाथ टागोर

(अनु.-मुरलीधर शहा)

या पुस्तकातील आणखी दोन लेख अमेरिकेवर आहेत. ‘मि.सॅनफ्रान्सिस्को’ आणि ‘एक बेपत्ता देश.

सॅनफ्रान्सिस्को’ शहरावरचा लेख फार सुंदर आहे. मी हे शहर पाहिले नसल्याने एकदा तरी हे शहर पहावे असे नक्कीच वाटले. येथल्या प्रचंड पुलांचे वर्णन, तेथील संध्याकाळच्या दिव्यांची किमया, तिथला तो रोदँचा ‘थिंकर हा जगप्रसिद्ध पुतळा! (मूळ पुतळा माझ्या माहितीप्रमाणे लूव्र म्युझियम मध्ये आहे.) तेथील रहिवाशांनी प्रेमाने जतन केलेली ट्राम, तेथील केबल कार, तेथील नाट्यगृहे, जगभरातील खाद्यपदार्थ खिलवणारे तेथील रेस्तराँ – ह्या सर्वामुळे पुलं ह्या शहराच्या प्रेमात पडले. त्यांच्या मते, हे शहर आपल्याला बिघडवून टाकते, धुंद करते, आणि यासाठी कोणत्याही अंमली पदार्थाची गरज नसते. येथील विविध देशांतील खाद्यपदार्थ देणारी उपाहारगृहे, नाट्यगृहे, सिनेमागृहे, इथल्या ‘वायनरी’, शहरालगतचा सागर तीर आणि या शहराचे हवामान हे देखील इथल्या रहिवाशांना वरदानच आहे. पुलंसारख्या एका रसिक व्यक्तीला जे आवडेल ते इथे आहेच. त्याचप्रमाणे इथली दोन महत्त्वाची विद्यापीठे बर्कले आणि स्टॅनफोर्ड ही देखील ह्या शहराची शान आहेत. खरंतर वाचकांनी हा लेख मुळातूनच वाचावा इतका मस्त आहे.

‘एक बेपत्ता देश हे ‘सॅनफ्रान्सिस्को’सारखे शहर असलेल्या देशाचे वर्णन आहे, हे पचायला जड जाते. अमेरिकेतील व्यसनाधीनता, वृद्ध लोकांचे एकटे जीवन, तरुणाचे बेछूट जीवन, बेताल लोकांच्या हातात असलेली शस्त्रे – त्यामुळे निर्माण झालेल्या समस्या, मरणे स्वस्त पण जगणे महाग असलेला हा देश – पुलंना बेपत्ता का वाटला हे लेख वाचूनच उमजेल.

तर असे हे ‘जावे त्यांच्या देशा हे पुस्तक. रसिकांनी पुन्हां एकदा वाचायला, चाळायला हरकत नाही. आपल्याला आलेले अनुभव एकदा पुलंच्या आठवणींसोबत पडताळून पाहावेत. वाचताना पुलंनी हे देश पन्नास वर्षांपूर्वी पाहिलेत हे मात्र ध्यानात ठेवावे. एक कलासक्त, रसिक माणूस कोणत्याही गोष्टीकडे, जागेकडे, अनुभवाकडे कशा रीतीने पाहतो हे उमगेल. आणि ही उमजही आपल्याला समृद्ध करून सोडेल.

स्नेहा केतकर

Sunday, 17 November 2024

केल्याने देशाटन – जैसलमेर

 


जैसलमेर

जैसलमेर स्टेशनला पोचलो, तर तिथेही स्टेशनचे काम चालू होते. “रेल्वेने ४०० कोटी रुपये स्टेशनच्या नूतनीकरणासाठी दिले आहेत”, असे आमचा ड्रायव्हर आम्हाला अभिमानाने सांगत होता. “तुम्ही पुढच्या वेळी याल नां, तेव्हा स्टेशन अगदी नावे असेल बघा...”

पर्यटनाच्या दृष्टीने जैसलमेर हे राजस्थानातील महत्वाचे शहर आहे. या शहराची लोकसंख्या खूप नाही. थरच्या मरुभूमीत वसलेले हे शहर राज्याच्या एका टोकाला आहे. जैसलमेर हे शहर येथील किल्ल्यामुळे प्रसिद्ध आहे. येथील किल्ला हा जगातील एकमेव living fort आहे. मराठीत आपण त्याला ‘नांदता किल्ला असेही म्हणू शकतो. हा किल्ला जवळजवळ १००० वर्षांपूर्वी बांधला गेला. जैसलमेर येथील राजांना ‘रावल अशी उपाधी आहे. 

जैसलमेर फोर्ट रात्रीच्या वेळी

येथील राजे मूळचे कृष्णाच्या यादव वंशातले होते असे आमच्या गाईडने सांगितले. पहिला राजा जैसल याने हा किल्ला बांधला म्हणून हा किल्ला जैसलमेर या नावाने ओळखला जातो. किल्ल्यातील महालात गेल्या चार-पाच हजार वर्षांपासूनच्या राजांच्या नावांची यादी आहे. हा इतिहास नीट जतन केलेला पाहून आश्चर्य वाटले. या किल्ल्यात सध्याही जवळजवळ चार-पाच हजार लोकं राहतात. यातील काही जुन्या घरांचे छोट्या छोट्या हॉटेलात रुपांतर केले आहे. ही घरे हवेल्यांसारखीच आहेत. त्यामुळे पर्यटकांना ती आवडतातच.

आधीच्या जवळ  जवळ १५० राजांच्या नावांची यादी  

किल्ल्यात राजाचा महालही आहे. अगदी आत्तापर्यंत राजेही याच ठिकाणी राहत होते. पण सध्या राजे मंदिर हवेली या ठिकाणी राहतात. किल्ल्यात दसरा चौक आहे. अजूनही दर दसऱ्याला राजे इथे येतात आणि दसरा साजरा करतात. राजांचा महाल अगदी सुस्थितीत आहे आणि तिथले गाईड तो अतिशय आत्मीयतेने दाखवतात. पूर्वी जैसलमेरचे सर्व रहिवासी किल्ल्यातच राहायचे. ब्राह्मण, व्यापारी असा हा वर्ग होता. जैन लोकांनी राजाला विनंती करून आम्हालाही येथे राहायची परवानगी द्या असे सांगितले. त्यामुळे येथे सात जैन मंदिरेही आहेत. पार्श्वनाथ जैन मंदिर त्यातील नाजूक कलाकुसरीसाठी प्रसिद्ध आहे. जैन मंदिरांसोबत विष्णू, लक्ष्मी व कालीमाता मंदिरेही येथे आहेत. ही माहिती तुम्हांला इंटरनेट/महाजालावर अधिक विस्ताराने मिळेलच.

पार्श्वनाथ जैन मंदिर, नाजूक कलाकुसर केलेले खांब

मी माझ्या लक्षात आलेल्या काही गोष्टी सांगते. किल्ला पाहत असताना माझ्या लक्षात आले की अनेक बंगाली भाषिक पर्यटकही आमच्या सोबत किल्ला पाहत आहेत. आम्ही दिवाळीच्या आधी गेलो होतो म्हणून मला वाटले, की हे बंगाली लोक दुर्गापूजेच्या सुट्टीत येथे आले असावेत. पण तरीही उत्सुकता वाटली, कारण बंगाल आणि राजस्थान ही भारताची दोन टोके आहेत. त्यातही जैसलमेर हे राजस्थानच्या टोकाला आहे. याचा उलगडा आमच्या गाईडने केला. तो म्हणाला, “सत्यजित रे स्वतःच लिहिलेल्या “शोनार केल्ला” ह्या कादंबरीवर ह्याच नावाचा सिनेमाही बनवलेला आहे. बंगाली लोकांचे सत्यजित प्रेम सांगायलाच नको, त्यामुळे प्रत्येक बंगाली माणसाने हा सिनेमा पहिला आहे. त्यामुळे अनेक बंगाली लोक जैसलमेर म्हणजे सोन्याचा किल्ला पाहायला आजही येतात. संध्याकाळच्या सोनेरी उन्हात हा किल्ला दिसतो ही खरोखरच सोन्यासारखा!!! साहित्य, सिनेमा ह्या कलांचा आपल्या मनावर किती खोलवर प्रभाव पडतो हे जाणवले.

अजून एक गम्मत झाली. सकाळी बाहेर पडलो, तर किल्ल्यातील दसरा चौकात मराठी मुलांची गजबज दिसली. आम्ही विचारलं तर समजलं की मिरजेतील एका शाळेची ट्रीप आली आहे. मुलांच्या शिक्षिका आनंदाने म्हणाल्या, “अहो, आता मिरज-जयपूर अशी ट्रेन आहे ना, त्यामुळे आम्ही मुलांना इथे घेऊन आलो आहोत.” नेहमी राजा साजरा करतो त्याच दसरा चौकात मुलांचे मजेत फोटो काढणे चालू होते. लहान वयात केलेल्या अशा पर्यटनाने निश्चितच मनाची कवाडे उघडायला मदत होते.

जैसलमेर किल्ला पाहत असताना एका घराच्या बाहेरच्या भिंतीवर एक आमंत्रण पत्रिका दिसली. घराच्या भिंतीवर आमंत्रण पत्रिका का बरं रंगवली असेल? या प्रश्नावर गाईड म्हणाला, “ही इथली खास पद्धत आहे. पूर्वी किल्ल्यात राहणारे लोक ब्राह्मण किंवा क्षत्रिय असायचे. ह्या दोन्हीही जमाती व्यापार किंवा शेतीच्या कामांत गुंतलेल्या असायच्या. लग्न-मुंज अशा शुभकार्याचे मुहूर्त आपल्या पंचांगाप्रमाणे साधारण एकाच काळात यायचे. मग अशा वेळी सगळ्यांच्या घरी जाऊन आमंत्रण देण्याऐवजी अशी घराबाहेर आमंत्रण पत्रिका रंगवली जायची. लोकंही अनमान न करता आवर्जून एकमेकांच्या घरी शुभकार्याला जात असत.”

सर्वांना आग्रहाचे आमंत्रण 

जैसलमेर हे तसे लहान शहर असले तरीही ह्या ठिकाणी मारवाडी समाज मोठ्या प्रमाणात राहत होता. ह्या वाळवंटातून मोठ्या प्रमाणात व्यापार व्हायचा पूर्वीच्या काळी. त्यामुळे मारवाड्यांच्या सुंदर हवेल्या आहेत ह्या शहरात. या हवेल्यांना तळघर ही असायचेच. व्यापारी असलेल्या मारवाड्यांना माल ठेवायला ह्या तळघरांचा उपयोग व्हायचा. ‘पटवोंकी हवेली’, ‘नाथमल की हवेली’, ‘सालेम सिंग की हवेली’ अशा देखण्या हवेल्या आवर्जून बघण्यासारख्या आहेत. १९व्या शतकात ह्या हवेल्यांचे बांधकाम झाले आहे. या हवेल्या किल्ल्याबाहेर आहेत. इथले मारवाडी थोड्या प्रमाणात अफुचाही व्यापार करत असत. लग्नकार्यात अफुसेवनासाठीही एक दिवस असे, अशी ही माहिती आमच्या गाईडने दिली. ब्रिटिशांनी कलकत्ता आणि मुंबई ही बंदरे विकसित केल्यावर ह्या मार्गावरून होणारा व्यापार बंद झाला.

पटवों की हवेली


जैसलमेर मध्ये मंदिर हवेली, गडीसर तलाव आणि बडा बाग ही ठिकाणेही पाहण्यासारखी आहेत. गडीसर तलाव हा पावसाचे पाणी साठवण्याकरिता बांधून काढलेला तलाव आहे. ‘सरफरोश ‘ सिनेमात गडीसर तलाव, मंदिर हवेली व जैसलमेर शहराचे चित्रण आहे. बडा बाग ही जागा बघण्यासारखी आहे. जैत सिंग यांनी सोळाव्या शतकात या ठिकाणी एक बांध बांधला. त्यामुळे ह्या वाळवंटी प्रदेशात ह्या बांधाच्या आसपास हिरवळ फुलली. जैत सिंग यांच्या मुलाने आपल्या वडिलांच्या सन्मानार्थ इथे एक बाग वसवली व छत्री बांधली. त्यानंतर अनेक राजांनी आपल्या पूर्वजांच्या सन्मानार्थ इथे स्मारके बांधली. इथून सूर्यास्त जरूर बघावा.

‘कुलधरा’ हे एक विलक्षण गांव जैसलमेर जवळ आहे. हे गाव तेराव्या शतकात वसवले गेले होते. ह्या गावात पालीवाल ब्राह्मण समाजाचे लोक रहात असत. ह्या गावाच्या संदर्भात अनेक कथा आहेत. आज ह्या गावात कोणीही रहात नाही. १९ व्या शतकात ह्या गावातील सर्व रहिवासी हे गाव सोडून निघून गेले. इथल्या विहिरी आटल्यामुळे रहिवासी गाव सोडून गेले असा एक समज आहे. दुसरी कथा अशी की, सलीम सिंग ह्या कारभाऱ्याच्या छळामुळे, अत्त्याचारामुळे लोकांनी हे गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला असावा. माझ्या मते पाण्याची कमतरता हे कारण असावे. या गावातील काही घरे, एक चौक, एक मंदिर जतन करून ठेवले आहे. बाकी गाव दगडांच्या राशी असल्यासारखा आहे. संध्याकाळी सहानंतर या ठिकाणी कोणीही येत नाही. काळाच्या ओघात एका नांदत्या गावाचे ओसाड गाव झाले आहे. पण येथील अनेक दंतकथांनी त्याला जिवंतही ठेवले आहे.

कुलधरा
ओसाड गांव

जैसलमेर हे शहर हे मरुभूमीतच असल्याने येथील वाळूतील सफरीसाठी पर्यटक जातातच. याठिकाणी एक रात्र राहण्याचीही सोय असते. दुपारी जैसलमेरहून निघून साधारण ३/४ वाजता आम्ही SAM Sand Dunes ला पोचलो. संध्याकाळभर वाळूत उंटावर, जीपवर बसून सगळे धमाल करतात. वाळूच्या उंच-सखल टेकड्यांवरून जीपने जाण्याची मजा औरच आहे. इथे सर्वजण सूर्यास्ताचा अद्भुत अनुभवही घेतात. सागरतीराप्रमाणेच मरुभूमीतील सूर्यास्तही वेगळाच अनुभव देऊन जातो. रात्री कॅम्पवर राजस्थानी नृत्ये, संगीत यांचा कार्यक्रम असतो. जेवण असते. रात्री तिथे राहून सकाळी सगळे परत जैसलमेरला येतात.

SAM sand dunes 

आमच्यासोबत यावेळी हरयाणातील हिस्सार शहरातील शाळेतील मुलं-मुली ट्रीप करिता आली होती. मुलांची गजबज-गडबड पाहून मस्त वाटत होते. ही मुले सकाळी उठून त्यांच्या बसने तनोट माता मंदिर व भारत-पाकिस्तान सीमा पाहणार होते. ‘Border’ सिनेमा आठवतोय ना? तिथले बरेचसे शूटिंग ह्याच भागात केले आहे.

आपला देश किती विशाल आहे, त्यात किती वैविध्य आहे हे अशा ठिकाणी गेल्यावर जाणवते. मरुभूमीत दिमाखाने उभा असलेला हा नांदता, ‘सोनेरी किल्ला’ पाहण्यासाठी जैसलमेरला एकदा जरूर भेट द्या.

स्नेहा केतकर

Monday, 4 November 2024

केल्याने देशाटन .......जोधपुर

 

केल्याने देशाटन .......जोधपुर

केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार

शस्त्र ग्रंथ विलोकन मनुजा चातुर्य येतसे फार

लहानपणी शाळेत निबंधासाठी, म्हणून किंवा ‘स्पष्टीकरण द्या’ – म्हणून ऐकलेल्या या ओळी किती खऱ्या आहेत याचा प्रत्यय आला. २०२३ च्या ऑक्टोबर अखेरीस जोधपुर-जैसलमेर या शहरांना भेट देण्याचा योग आला. राजस्थानातील जयपूर हे शहर मी पाहिले होते दोन-तीनदा. जोधपुर हे राजस्थानातील दुसरे मोठे शहर. या शहराची ओळख मला फोटोतून आणि सिनेमातून झाली होती. ‘डोर’ नावाच्या नितांतसुंदर सिनेमातून जोधपुर, मेहरानगढ याचे दर्शन झाले होते. मात्र या शहराची तशी खूप माहिती मला नव्हती. त्यामुळे कोरी पाटी घेऊनच मी तिथे गेले. छोटासा आणि औटका विमानतळ आणि गोष्टी वेल्हाळ ड्रायव्हर याने जोधपुर दर्शनाची सुरवात झाली.

प्रत्येक शहरात बघण्याची जी ठिकाणं असतात, तिथूनच पर्यटनाला सुरवात झाली. उमेद भवन, मेहरानगढ, जसवंत थडा, मंडोर गार्डन ही महत्त्वाची ठिकाणे!!!!! जवळजवळ १४५९ सालच्या आसपास बांधलेला हा गड. राठोड वंशाच्या राव जोधा या राजाने हा गड बांधला. ह्या राजावरूनच या शहरालाही जोधपुर हे नाव पडले.

मेहरानगढ हा आसपासच्या सपाट प्रदेशातील ४०० फूट उंचीवरच्या डोंगरावर बांधण्यात आला आहे. राजवाड्याचे एकूण क्षेत्रफळ १,२०० एकर आहे. अर्थात ही माहिती तुम्हांला महाजालावर, म्हणजे आपल्या इंटरनेटवर मिळेलच. हा गढ अगदी सुस्थितीत आहे. राजस्थानच्या राठोड वंशाच्या राजघराण्याच्या अनेक गोष्टी इथे जतन करून ठेवल्या आहेत. याच गडावर मेहरानगढ वस्तुसंग्रहालय ही आहे. या गडाला लागूनच ब्ल्यू सिटी ही आहे. हे शहर जवळ जवळ ३००/४०० वर्षे जुने आहे. ह्या भागात पूर्वी ब्राह्मण वंशाचे लोक राहायचे असे आमचा गाईड म्हणाला. ह्या भागात फिरायचे असेल तर रिक्षातून फिरलेले बरे. कारण इथल्या गल्ल्या इतक्या छोट्या आहेत की गाडी ऐवजी रिक्षा किंवा चालतच फिरलेले बरे. अर्थात इथे गाईड हवाच .. नाहीतर इथल्या भूलभुलैय्यात आपण हरवून जाऊ शकतो. इथली घरे खूप जुनी आहेत आणि बरेचजण ह्या भागातून नव्या भागात रहायला गेले आहेत.

जसवंत थडा ही वास्तु मेहरानगढच्या जवळच आहे. जोधपुरच्या महाराजा सरदार सिंह यांनी आपल्या वडिलांच्या आठवणींसाठी बांधलेली वास्तु आहे. महाराजा जसवंत सिंह दुसरे यांचे अंत्यसंस्कार इथेच झाले होते. १८९९ मध्ये बांधलेली ही वास्तु अतिशय देखणी आहे. घंटाघर ही शहराच्या मध्यभागी बांधलेली वास्तु ही महाराजा सरदार सिंह यांनीच बांधली आहे. याच्या आजूबाजूला सरदार मार्केट ही आहे. हा परिसर अत्यंत देखणा आहे. पण गर्दी, रस्त्यावरचे विक्रेते, कचरा – यामुळे तो तसा वाटत नाही. ‘सिर्फ एक बंद काफी हैं’ या नुकत्याच आलेल्या चित्रपटात जोधपुर शहराचे खूप चित्रण आहे. कारण मुळात अख्खा सिनेमा जोधपुर मध्येच घडतो.

मंडोर गार्डन ही बाग बघण्यासारखी आहे. इथे light and sound show ही असतो. ह्या कार्यक्रमात राजस्थानच्या एकूण इतिहासाचा आढावा घेतला जातो. जोधपुर पासून ९ किमी अंतरावर मंडोर गार्डन आहे. येथील वास्तु अप्रतिम आहेत. सहाव्या शतकात मंदाव्यपुरा येथे प्रतिहारांचे राज्य होते. येथील वास्तुशैली वेगळीच पण अप्रतिम सुंदर आहे. या जागेचा इतिहास मला माहिती नव्हता. म्हणून अनवधानाने या ठिकाणी आम्ही संध्याकाळी पोचलो. पण वाचकांनी मात्र ह्या जागी थोडे आधीच जावे म्हणजे ह्या सुंदर वास्तुंना नीट बघता येईल.


 


मला गवसलेली नवी माहिती म्हणजे, प्राचीन काळात राक्षसांचा राजा रावण ह्या भागात येऊन गेला होता. रावण पत्नी मंदोदरी ही मंडोर येथील राहणारी होती. मंदोदरीचे पिता मयासुर हे उत्कृष्ट वास्तु शास्त्रज्ञ होते आणि ते मंडोर येथील राजे होते. येथील एका ब्राह्मण जातीतील लोकं रावणाला आपला जावई मानतात. रावण आणि मंदोदरीचे लग्नही ह्या ठिकाणीच झाले असे मानतात. दसऱ्याला रावण दहन करण्याची प्रथा उत्तर भारतात अनेक ठिकाणी आहे. मंडोर येथे मात्र ब्राह्मण समाजापैकी एक समाज दसऱ्यानंतर तेरा दिवस सुतक पाळतात. ‘रावण - राजा राक्षसांचा’ ह्या शरद तांदळे लिखित पुस्तकातही ह्या लग्नाचा/ह्या जागेचा उल्लेख आहे. राजस्थानातील उत्कृष्ट वास्तुशैली, आणि मयासुरही इथलाच होता, ही माहिती फारच रंजक वाटली.

जोधपुरने रेल्वेने आम्ही जैसलमेरला गेलो. हा प्रवासही आनंददायी होता. ट्रेन लवकरची होती त्यामुळे लवकर उठून आम्ही स्टेशनवर गेलो. ट्रेन थोडी उशिरा आली पण त्या दरम्यान जोधपुर स्थानक, तिथली स्वच्छता नजरेस भरली. सकाळी स्टेशनची निगुतीने स्वच्छता चालली होती. भारतीय रेल्वे हळुहळू कात टाकत आहे हे जाणवले.

जोधपुर ते जैसलमेर दरम्यान ४/५ स्टेशन्स आहेत. ही स्टेशन्स जोधपुर ते पोखरण दरम्यान आहेत. पोखरण नंतर जैसलमेर स्टेशनच येते.


पोखरण स्टेशन वा पोखरण हे गाव तसे लहानच आहे. लोकवस्तीही कमी आहे. पण प्रत्येक भारतीयाच्या दृष्टीने हा भाग महत्त्वाचा आहे. भारताचा पहिला अणुबॉम्ब, आणि १९९८ मधील न्युक्लीअर अस्त्रांची यशस्वी चाचणी येथेच झाली होती. नुकत्याच आलेल्या ‘परमाणु - The story of Pokhran’ या सिनेमामुळे कोणाच्याही नजरेत न येता ही चाचणी करण्यासाठी कशी रणनीती आखण्यात आली हे देखील समजते. आपल्या वैज्ञानिकांबद्दलचा, सैन्याबद्दलचा अभिमान अधिक दुणावतो. भारतीयांसाठी ही जागा तीर्थक्षेत्राइतकीच महत्त्वाची आहे.

(भाग २ – जैसलमेर.....)

स्नेहा केतकर


Saturday, 12 October 2024

“चौकट” ओलांडताना........

 

“चौकट” ओलांडताना

“चौकट” नावाची एक दहा-बारा मिनिटांची फिल्म आहे. एक छोटंसं गाव, बहुतेक कोकणातलं असावं, कारण पहिल्याच शॉट मध्ये नारळाची झाडं दिसतात. छोटंसं घर, घराचा दरवाजा अर्धाच उघडा असतो. दुसरा अर्धा भाग उघडत नसतो. सकाळची वेळ, घरातली गृहिणी गुणगुणत मन लावून स्वैपाक करत असते. घरासमोर छोटीशी रांगोळी असते. इतक्यात एक माणूस येतो. हाक मारतो. म्हातारा असतो. खायला मागतो. दमलेला दिसत असतो. हातातले काम सोडून गृहिणीला यावे लागते. ती थोडी वैतागते. त्या माणसाचा चुकून रांगोळीवर पाय पडतो. म्हणूनही ती रागावते. थोड्या रागातच ती म्हणते,” अजून पूजाही झाली नाहीये. घरात खायला काही नाही.”

पुन्हा घरात जाते. कामात दंग होते. पुरणपोळी करते. देवघरात येते. देवाची पूजा करण्याआधी, देवघराच्या वरच्या बाजूला असलेल्या चौकोनी खिडकीतून सहज बाहेर डोकावते, तर तो म्हातारा माणूस हळुहळू अंगणातला केर काढत असतो. पालापाचोळा तर खूपच पडलेला असतो अंगणात. शेवटी बाहेर जाऊन ती बाई त्याला म्हणते, “अरे बाबा, नको केर काढूस. नाही जमणार तुला.” पण आत येऊन त्याला शिळी भाकरी-भाजी आणून देते. तो म्हातारा कृतज्ञतेने तिच्याकडे बघतो. ती पुन्हा आत जाऊन पूजा करायला बसते. मनोभावे पूजा करते. फुले वाहते, नैवेद्याचे ताट देवापुढे ठेवते. सगळीकडे एकदा समाधानाने नजर टाकते आणि परत नमस्कार करते.

बाहेर येऊन बघते तर, त्या म्हाताऱ्या माणसाने सर्व अंगण लख्ख झाडून घेतलेले असते. स्वच्छ अंगणाकडे तो ही समाधानाने एकवार बघतो, तिला नमस्कार करतो आणि जायला निघतो. यानंतर त्या गृहिणीच्या मनातले भाव तिच्या चेहऱ्यावर फार प्रभावीपणे उमटले आहेत. त्या माणसाने विस्कटलेली रांगोळीही नीट केली असते. ते ही तिच्या लक्षात येते. एक क्षणभर तिला काहीच सुचत नाही. परत घरात येऊन ती देवघरात जाते. देवघर बघते, थबकते, पण लगेच नैवेद्याचे ताट उचलते आणि धावत बाहेर जाते. जाताना अर्ध्याच उघडलेल्या दाराशी अडखळते, पण जोर लावून ते दार ती उघडते आणि धावत त्या माणसाच्या मागे त्याला बोलवायला जाते.

एवढीच छोटी फिल्म! फिल्ममध्ये न उघडणारे दार, चौकोनी देव्हारा, चौकोनी खिडकी.....अशा अनेक चौकटी आहेत. पण या चौकटी ती ओलांडते.

चौकट शॅार्ट फिल्मची लिंक - https://youtu.be/AKjsT8-8GYM?si=hmfwBwftaq2Nrg45

सारा समाज, त्यातले आपण, अशा अनेक चौकटीत बंदिस्त असतो. या दृश्य चौकटी नसतात. विचारांच्या, चालीरीतींच्या, आपल्या आवडीनिवडीच्या, जाती-धर्माच्या, भाषेच्या, एखाद्या प्रदेशाच्या, अशा अगणित चौकटी!

नायजेरियन-ब्रिटीश लेखक बेन ओक्री जयपूर साहित्य संमेलनाला आला होता. तो म्हणाला, की जन्मल्यापासून आपण तुरुंगात असतो. सुरवात आई-वडिलांच्या संस्काराने होते. मग वागण्याची पद्धत, भाषा, व्यक्त व्हायची पद्धत अशा अनेक जनरीतींच्या चौकटीत आपण बंदिस्त होतो. पण आपण बंदिस्त आहोत हेच कळायला अनेकांना वेळ लागतो. काहींना ते कळतही नाही. आणि मग ह्याच चौकटी आपण अंतिम सत्य आहे असे मानायला लागतो. यावरूनच मतभेद होतात, हे मतभेद टोकाला गेले की युद्धजन्य स्थिती उद्भवते.

सध्या नवरात्र चालू आहे. सर्वत्र शुभ वातावरण आहे. पण जगावर युद्धाची मोठी काळी छाया पसरली आहे. इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाला एक वर्ष झाले आणि रशिया-युक्रेन युद्धाला दोन वर्षे होतील. ही चारही राष्ट्रे आणि त्यांना मदत करणारी राष्ट्रे, अशाच एका चौकटीत अडकलेली दिसतात. युद्धाने प्रश्न सुटतील असेही त्यांना वाटते. पण खरे तर यात गुंतलेल्या सर्वांनी चौकट मोडून वेगळा विचार करण्याची गरज आहे. ही आज सर्व जगाची गरज आहे कारण आजच्या काळात युद्धे, त्याचे परिणाम सीमित राहत नाहीत. त्याचे परिणाम आज न उद्या सर्व जगाला भोगायला लागणार आहेत.

चौकट मोडणे ही नवी कल्पना नाही. भारताने ७५ वर्षांपूर्वी अशी चौकट मोडून, वेगळा विचार करून स्वत:च्या देशाचे विभाजन केले. स्वातंत्र्यासाठी मोठ्ठी किंमत देऊन ते मिळवले. आज विचार करता अनेक विचारवंत हे झाले ते एका दृष्टीने बरेच झाले असे ही म्हणतात. पाकिस्तानची आजची स्थिती बघता ते खोटे ही नाही.

राजीव गांधी म्हणाले होते, की एक रुपया सरकारने दिला की तो लोकांपर्यंत पोचेपर्यंत त्यातले फक्त १५ पैसे उरतात. तेवढेच गरीबांच्या हातात येतात. राजकीय व शासकीय व्यवस्थेतील हा भ्रष्टाचार कसा थांबवावा हे अनेकांना कळत नव्हते. पण जनधन-आधार-मोबाईल आणि तंत्रज्ञान याच्या मदतीने आज लोकांना सरकारची मदत थेट पोहोचते. करोडो सामान्य भारतीय आज बँकेशी जोडले गेले आहेत. सधन लोकांनी गॅस सबसिडी परत करावी आणि त्या पैशातून एका गरिबाला गॅस देण्यात येईल असे सरकारने जाहीर केले तेव्हा अनेकांनी सरकारला मुर्खात काढले. पण आज त्यामुळे अनेकांच्या घरी गॅस आला हे विसरून चालणार नाही.

चौकट मोडण्याचे सर्वात मोठे उदाहरण मला स्त्री म्हणून स्त्री शिक्षणाचे कार्य ज्यांनी केले त्यांचे द्यावे असे वाटते. महर्षी कर्वे, सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले अशा अनेकांनी चौकट मोडून स्त्रियांना शिक्षण द्यायला सुरवात केली. आज भारताच्या भरारीत महिलांचा मोठा वाटा आहे तो ह्या वेगळ्या विचार करण्याच्या धाडसामुळेच, चौकट ओलांडल्यामुळेच!!!!

प्रश्न हा आहे की असा वेगळा विचार करायला कोणी तयार आहे की नाही? किंवा असा वेगळा विचार कोणाला सुचणार तरी आहे का नाही? आणि सुचला तर तो मान्य करायला चौकट मोडून कोणी पुढे येणार की नाही?

आज दसरा आहे. सीमोल्लंघनाचा दिवस!!!! मानवाने असुरी शक्तीवर मिळवलेला हा विजय आहे. तो ही वानरांच्या सहाय्याने.....इथे प्रभू रामांनी एका चौकटीला छेद दिलाच आहे. महाभारतात ह्याच दिवशी पांडवांनी शमीच्या झाडावर ढोलीत लपवलेली आपली शस्त्रे बाहेर काढून त्यांची पूजा केली. आजच्या दिवशी आपण सरस्वतीची पूजा करतो. बुद्धीलाही आपण शस्त्र मानतो. ह्याच बुद्धीच्या साहाय्याने जगभरच्या राजकीय नेत्यांना ह्या युद्धातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळो आणि गरज असल्यास त्यासाठी चौकट मोडण्याचीही त्यांना शक्ती मिळो हीच इच्छा.........

 

स्नेहा केतकर

Wednesday, 18 September 2024

Artificial Intelligence आणि सत्यजित रे

 

Artificial Intelligence आणि सत्यजित रे

सत्यजित रे आणि AI यांचा काय संबंध? रे यांना जाऊनही कितीतरी वर्षे झाली आहेत आता. आणि ते असताना तर AI चा कुठेच फारसा बोलबाला नव्हता. पण ‘जे देखे न रवी, ते देखे कवी या ओळी तुम्ही ऐकल्याच असतील. आज या सगळ्या गोष्टी तुमच्याशी share करण्याचे कारण एक लघु चित्रपट! एक short film. २०/२२ मिनिटांची ही फिल्म. नाव अनुकुल. ही फिल्म सत्यजित रे यांच्या कथेवर बेतलीय.

चित्रपट अर्थातच बंगालमध्ये घडतो. एक प्रौढ शाळामास्तर एका कंपनीतून घरातील काम करण्यासाठी व मदतीसाठी एका यंत्र मानवाला, रोबोला घेऊन येतात घरी! या रोबोचे नाव ‘अनुकुल’. अनुकुल घरातली सर्व कामे करतो. मास्तरांशी गप्पा मारतो. त्याला वाचनाची आवड असते. त्यामुळे तो वाचतो, इतरांचे निरीक्षण करतो, त्याला कधीकधी प्रश्नही पडतात. थोडक्यात हा एक बुद्धिमान यंत्रमानव असतो. सर्व कथा सांगत नाही, कारण तुम्ही सर्वांनी ही फिल्म जरूर बघावी असे मला वाटते.

सत्यजित रे यांना बंगालची भविष्यातील परिस्थिती कशी असेल याचा अंदाज आला होता बहुतेक. म्हणूनच त्यांना ही कथा सुचली असावी. बंगालमधील कामगारांची अरेरावी, त्यांच्या संघटना... त्यामुळे वेठीला धरलेली सामान्य जनता...यावरचा तोडगा म्हणूच त्यांना यंत्रमानव हा पर्याय सुचला असेल कां?

हा अनुकुल मास्तरांना प्रश्न विचारत राहतो. भगवद् गीता वाचताना त्याला हे अनेक प्रश्न पडतात. योग्य काय? अयोग्य काय? हे कसे ठरवायचे? कुणी ठरवायचे? धर्म म्हणजे काय? अधर्म म्हणजे काय? असेही तो विचारतो. याला मास्तर उत्तर देतात, की ते आपल्या मनाला विचारायचे. आपले मन, आपली सदसद्विवेक बुद्धी आपल्याला दिशा दाखवते.

२०-२२ मिनिटांची ही छोटीशी फिल्म अप्रतिम आहे. मोठे प्रवचन ऐकून जे समजते ते ह्या दृश्य माध्यमातून, छोट्या कथेतून समजते. यांत मास्तरांचा एक दारुडा भाऊ आहे, घर कामगार संघटनेचा नेताही आहे. बंगालची सामाजिक स्थिती पाहतां, काही वर्षांनी कामासाठी यंत्रमानव आणावे लागतील हे सत्यजित रे यांना वाटले हेच त्यांचे द्रष्टेपण! काळाच्या पुढचे कलाकारांना दिसते ते असे.

या फिल्ममध्ये मुख्यत्वे बंगाली कलाकार आहेत. दिग्दर्शक सुजय घोष आहे. संपूर्ण टीमचा या छोट्या फिल्ममध्ये महत्त्वाचा सहभाग आहे. त्याशिवाय इतका परिणाम साधणारी उत्कृष्ट फिल्म तयारच झाली नसती. ही short फिल्म २०१७ मध्ये प्रदर्शित झाली आहे. या फिल्मची लिंक मी देत आहे. सर्वांनी ती पहावी असा माझा प्रेमळ आग्रह आहे.

https://youtu.be/J2mqIgdae5I?si=1k4suBL2ZNpjJH9J

फिल्म पाहून तुम्हांला काय वाटले, ते ही जरूर सांगा कॉमेंट करून....

स्नेहा केतकर

Sunday, 1 September 2024

 

मुखवटे आणि चेहरे

ऑगस्ट २०२४ हा महिना अनेक कारणांनी गाजला. आणि गाजतोय. ९ ऑगस्ट २०२४ या दिवशी कलकत्त्यातील राधा गोबिंद कार या सरकारी इस्पितळातील एका ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. ३६ तासांची ड्युटी करून, विश्राम करत असलेल्या या डॉक्टर सोबत हा अघोरी प्रकार घडला. गेले वीस दिवस वर्तमानपत्रात, टीव्हीवर यावर चर्चा चालू आहेत. महाराष्ट्र आणि देशातील इतर भागांतही अशा प्रकारे झालेल्या लैंगिक अत्याचारांबद्दल जनमानसांत राग आहे. त्याच्याही बातम्या आपण पाहिल्या. या संदर्भातही ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली.

मात्र आज वीस दिवस उलटून गेले तरी प.बंगालमधील निदर्शने, मोर्चे थांबण्याचे चिन्ह नाही. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर तेथील जनता चिडलेली आहे. एका सरकारी इस्पितळात, स्त्री मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री असताना तिथे असा प्रकार घडावा? या ठिकाणी महिला डॉक्टरना विश्रांतीसाठी वेगळी खोली नसावी? एखादा Pandoras Box उघडावा तशा अनेक गोष्टी समोर येत आहेत. ममता बॅनर्जी किंवा तृणमूल काँग्रेस सत्तेत येऊन आता तेरा वर्षे झाली आहेत. हे सरकारी इस्पितळ आहे. इथे अशा प्रकारची अव्यवस्था, अनागोंदी कारभार कसा आहे? हा प्रश्न जनतेला पडला आहे. त्यात इतरही अनेक गोष्टीबद्दल संताप आहे. सरकारने संदीप घोष यांची घाईघाईने बदली का केली? कुंपणाने शेत खाल्ले तसे, पोलीस म्हणून ड्युटी करणाऱ्या इसमानेच हे दुष्कृत्य केले. मग त्याला आजपर्यंत ह्या ठिकाणी राजरोसपणे कसे येऊ दिले जात होते? असे अनेक प्रश्न जनतेला पडले आहेत.

ममता बॅनर्जी ह्या जन आंदोलनातून पुढे आलेल्या नेत्या आहेत. लोकांची नस ओळखणाऱ्या नेत्या असा त्यांचा लौकिक आहे. एक प्रभावी महिला मुख्यमंत्री असूनही त्यांच्या राज्यात स्त्रियाच सुरक्षित नाहीत हा एक संदेश या घटनेनंतर सामान्य नागरिकांत गेला आहे. या प्रकरणात ममता बॅनर्जी यांनी कितीही आकांत तांडव केले, अगदी विरोधी पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकार, सीबीआय – यांच्याकडे बोट दाखवले तरीही त्या स्वतःवरची जबाबदारी झटकू शकत नाहीत. नव्हे त्यांना ती झटकता येणारच नाही.

जन आंदोलनातून समोर आलेल्या ममतांना, आज प्रथमच स्वतःला प्रचंड लोकक्षोभाला सामोरे जावे लागत आहे. त्यांना याची सवय तर नाहीच, पण स्वतःची चूक मान्य करण्याइतके मनोबलही त्यांच्याकडे आहे असे दिसत नाही. ममता बॅनर्जी /तृणमूल काँग्रेस यांच्या मुखवट्यामागचा चेहरा सामान्य जनतेपुढे आला आहे. त्यामुळे त्यांच्या पाठीराख्यांचा त्यांच्यावरील विश्वास उडाला आहे.

असाच तडा कलकत्त्याहून दूर असलेल्या केरळ राज्यातील जनतेच्या विश्वासालाही गेला आहे. मल्याळी सिनेसृष्टीतील लैंगिक शोषणाबद्दल जस्टीस हेमा यांनी दिलेल्या अहवालामुळे केरळमध्ये जणू भूकंप आला आहे. यातही हा अहवाल दडपण्याचा प्रयत्न झाला असे दिसते. २०१९ साली दिलेल्या या अहवालाबाबत २०२४ पर्यंत केरळ सरकारने काय केले, हा मुख्य प्रश्न आहे. या अहवाला अंतर्गत AMMA - Association of Malayalam Movie Artistes मधील पदाधिकाऱ्यांकडे संशयाची सुई वळते. Casting couch, लैंगिक शोषण, स्त्रियांना धमकावणे – अशा बाबींचा उल्लेख त्यात आहे. १७ महिला कलाकारांनी आपल्या मुलाखतीत याची कबुली दिली आहे. सध्या अनेक you tube वरील वा टीव्ही वरील चर्चेतूनही अनेक जणी पुढे येऊन हे सर्व सत्य असल्याचे सांगत आहेत. AMMA च्या कार्यकारी समितीने राजीनामा दिला आहे. प्रसिद्ध मल्याळी अभिनेते मोहनलाल यांनी ‘आपण कोणत्याही power group चा भाग नाही‘ असे स्वतःपुरते स्पष्टीकरण दिले आहे.

देशाच्या दोन टोकांना घडणाऱ्या या दोन घटनांचे विश्लेषण करताना, मला जाणवणारे साम्य म्हणजे, या दोन्ही घटनांत मुखवटा फाडून मागचा विद्रूप चेहरा जनतेसमोर आला आहे.

मां, माटी, मानुष अशी घोषणा देऊन, आणि प.बंगाल मधील जुलुमी communist राजवटीला बाजूला सारत, कल्याणकारी राज्य करण्याचे वचन देत तृणमूल काँग्रेस सत्तेवर आली. लागोपाठ तीन वेळा निवडून आल्यावर ममता बॅनर्जी यांचा आत्मविश्वास अधिकच वाढला. आता ह्याला आत्मविश्वास म्हणायचे की उद्दामपणा हे मी वाचकांवर सोपवते. गेल्या काही वर्षात त्यांच्या पक्षाविरुद्ध अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे उजेडात आली. निवडणूक जिंकल्यावरही जे दंगे झाले, त्याचेही त्यांनी समर्थन केले. अनेक बाबतीत मनमानी कारभार, केंद्राशी वैर, सीबीआयच्या अधिकाऱ्यांना मारहाण अशा अनेक गोष्टी त्या बिनदिक्कतपणे करत राहिल्या कारण लोकांचा त्यांना पाठिंबा होता.

जनतेचा विश्वास हा राजकारणात अतिशय महत्त्वाचा असतो. तो कमवावा लागतो आणि तसाच प्रयत्न करून टिकवावाही लागतो. सूज्ञ राजकारणी लोकांची साथ कधीही गृहीत धरत नाही. ममता बॅनर्जी यांनी ती चूक केली आहे. आपण काहीही केले तरीही लोक आपल्यावरच विश्वास ठेवतील असे त्यांना व त्यांच्या नेत्यांना वाटत होते. ममता बॅनर्जीना आता ह्या कारभाराचे खापर कोणाच्याही माथी मारता येणार नाही.

केरळातही असेच झाले. कम्युनिस्ट सरकार हे लोककल्याणकारी असते. Liberal असते, स्त्री-पुरुष समानता यांची पाठराखण करते असे आदर्शवादी विचार मनात ठेवून निवडलेले हे सरकार ....याचा एक वेगळाच चेहरा समोर आला आहे. त्याचप्रमाणे मल्याळम सिनेमा भारतातच नव्हे, तर जागतिक पटलावरही प्रागतिक मानला गेला आहे. वेगळे विषय, कलात्मक हाताळणी, दर्जेदार अभिनय व जागतिक दर्जाचे तंत्रज्ञ हा मल्याळम सिनेमाचा चेहरा आहे. केरळातील साक्षरता, स्त्री-पुरुष समानता ही गृहीतच धरली गेली आजपर्यंत. या वातावरणात काम करणाऱ्या स्त्रियांना, सिनेसृष्टीत अशा प्रकारच्या लैंगिक शोषणाला तोंड द्यावे लागतेय, हे वाचून सामान्य मल्याळी जनता हादरून गेली आहे.

आज प.बंगाल व केरळ येथील जनतेसमोर मुखवट्यामागचे भेसूर चेहरे समोर आले आहेत. ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच तो तोडला ही भावना ह्या जनतेच्या मनात आहे. आता मल्याळी सुपर स्टार मोहनलाल असो वा राजकारणातील स्टार ममता असो .......जनतेच्या प्रश्नांना त्यांना सामोरे जावेच लागेल.

स्नेहा केतकर